भारतीय खाद्यसंस्कृती अतिशय मोठी आहे. फळे, भाज्या; डाळी, कडधान्यं यांचा वापर करून तयार केलेल्या अनेक पदार्थांमुळं उत्तम पोषण आपल्याला मिळतं. त्यामुळेच भारतीय हे जनुकीयदृष्ट्या उच्च आणि बुद्धिमान मानले जातात आणि त्याचे कारण आपल्या पोटात जाणाऱ्या पदार्थांच्या वैविध्यामध्येही आहे. मात्र, काळ आधुनिक होत असताना आपण आपले पारंपरिक अन्नघटक, स्वयंपाकाच्या पद्धती, पदार्थांची मिश्रणं आणि खाण्याच्या पद्धती विसरत चाललो आहोत. आपल्या पुढच्या पिढीचं अवलंबित्व रेस्टॉरंट्सवर वाढत चालल्यानं आपले पारंपरिक पदार्थ कसे तयार होतात, हे त्यांना कळणारच नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. या पिढीला आपण आपल्या संपन्न भारतीय खाद्यसंस्कृतीची ओळख करून दिली नाही, तर ही परंपरा नष्ट होण्याचाही धोका आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पारंपरिक खजिन्याकडे दुर्लक्ष
आपली वाटचाल एका धोक्याकडे चालू लागली आहे असं तुम्हाला वाटत नाही का? प्रत्येक भारतीय पदार्थातल्या पोषणाच्या या सगळ्या पारंपरिक खजिन्याकडे दुर्लक्ष करून आपण स्वतःच्याच पायांवर कुऱ्हाड मारून घेत नाही का? स्थानिकदृष्ट्या पिकवलेली आणि सीझनल फळं आणि भाज्या यांच्यामुळे आपल्या आहाराचं पोषणमूल्य वाढत असल्यानं त्यांचं आपल्या आहारात स्थान असलंच पाहिजे. काळ जसजसा पुढं सरकतो आहे, तसं आपण खाण्याच्या पारंपरिक पद्धती, स्वयंपाकाच्या पद्धती आणि अनेक घटक विसरत चाललो आहोत-जे अतिशय महत्त्वाचे आहेत. कडधान्यं भिजत घालून मोड आलेली कडधान्यं वापरणं, आंबवणं यांसारख्या भारतीय स्वयंपाकातल्या कृती अतिशय वेगळ्या असून, त्या विसरून चालणार नाही. अगदी पारंपरिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली खाण्याची पानं पुन्हा घरांत आली पाहिजेत. जेवण झाल्यानंतर पचनासाठी खाल्ल्या जाणाऱ्या पानानं गेल्या काही काळात नवं रूप घेतलं आहे; पण त्याच्या मूळ फायद्यांचा प्रभाव कमी झाला आहे.
‘अन्नाकडे औषध म्हणून बघितलं नाही, तर औषध हेच तुमचं अन्न बनेल,’ असं आपले पूर्वज सांगत असत. भारतीय परंपरा आणि खाद्यविज्ञान हे अन्न आणि अन्नघटकांची मिश्रणं यावर आधारलेलं आहे. आजच्या पिढीला कदाचित सगळ्या पंचेंद्रियांना साद घालणाऱ्या स्वादिष्ट आणि संपूर्ण खाद्यपदार्थांचा आनंदच मिळणार नाही. ‘रेडी-टू-मेक’ आणि ‘रेडी-टू-इट’चा जमाना आपल्या रोजच्या पोषक आहाराला बाजूला सारत चालला आहे. तुम्हाला या पिढीचा भाग व्हायचं आहे की भारतीय अन्न आणि अन्नघटक लुप्त होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत? चॉईस शेवटी तुमचा आहे!
ब्रेड नको; पोहे हवेत!
जोपर्यंत आपण गरमगरम पोहे, त्यावर भुरभुरलेलं नारळाचं ताजं खोबरं आणि कोथिंबीर आणि वर पिळलेलं लिंबू हा जिन्नस नव्या पिढीला देणार नाही, तोपर्यंत ब्रेड आणि जॅमच्या पलीकडेही ब्रेकफास्टचे काही पर्याय आहेत हे त्यांना समजणारच नाही. पोह्यांवर पिळलेला लिंबाचा ताजा रस त्यातल्या ‘व्हिटॅमिन सी’साठी असून, पोह्यांमध्ये असलेलं लोह पचण्यासाठी ते त्यावर घालण्यात हे त्यांना कळणार नाही. आजची नवीन पिढी ही प्रोटिन्स आणि कार्बोहायड्रेट्सचं उत्तम मिश्रण असलेल्या आपल्या पारंपरिक वरण-भाताऐवजी पिझ्झा आणि बर्गरवर जगते आहे. आपले पोहे, इडली, डोसे आणि भाकरी हे सगळे पदार्थ आधुनिक घरांतून लुप्त होऊ लागले आहेत आणि ब्रेकफास्टसाठी त्यांची जागा ब्रेड घेऊ लागला आहे.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.