Corona cancer and diet sakal
health-fitness-wellness

कर्करोगापासून वाचायचंय? 'या' गोष्टींचा आजच आहारात करा समावेश

सकाळ वृत्तसेवा

कॅन्सर हा अतिशय गंभीर आजार असून त्यावर लवकर उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होण्याचे प्रमाण जास्त असते. रोगाची स्टेज वाढलेली असेल, तर कॅन्सर ठीक होण्याचे प्रमाण कमी होते.

- डॉ. दिलीप निकम

आहार आणि लठ्ठपणा

असंतुलित आहार, जंक फूड, खाण्याच्या वेळा न पाळणे आणि व्यायाम न करणे इत्यादी कारणांमुळे वजन वाढायला लागून लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणा वाढला की, इच्छा असली तरी व्यायाम करता येत नाही. मग हे दुष्टचक्र सुरू होते, ज्यातून बाहेर पडता येत नाही. मासिक पाळी बंद झालेल्या स्त्रियांमध्ये १० किलोपेक्षा जास्त वजन वाढल्यास शरीरातील एस्ट्रोजन (estrogen) मध्ये वाढ होते. त्यामुळे स्तनाचा आणि गर्भाशयाच्या (endometrium ) कॅन्सरचे प्रमाण वाढते. लठ्ठपणामुळे स्तनाचा आणि गर्भाशयाचा (endometrium ), सर्व्हायकल (cervical ), स्वादुपिंड व पित्ताशय इत्यादी कॅन्सर होतात.

चीनमधील वुहान येथे १२ डिसेंबर २०१९ रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळल्यापासून संपूर्ण जगभरात जनजीवन विस्कळित झाले आहे. संपूर्ण हेल्थ सिस्टीम कोलमडून पडली आहे. नॉन कोविड रुग्णाचे अतिशय हाल झाले आहेत. मागील दोन वर्षांत झालेली लॉकडाऊन किंवा फिरण्यावर असलेली बंधने यामुळे इतर आजारांनी त्रस्त असलेले रुग्ण दवाखान्यात पोहोचू शकले नाहीत, उपचाराविना मृत्युमुखी पडले. यादरम्यान कॅन्सर रुग्णांचे अतोनात हाल झाले.

इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’तर्फे ‘ग्लोबोकॅन २०१८’ नावाने, कर्करोगाविषयीची जागतिक पातळीवरची माहिती प्रसिद्ध करण्यात येते. त्यानुसार २०१८ मध्ये, जगभरात नवीन भर पडलेल्या कॅन्सरपीडितांचे प्रमाण १८० लाख, तर कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण ९६ लाख इतके आहे आणि यामध्ये फक्त आशियामधून ४८ टक्के कॅन्सर रुग्ण आढळतात.

दरवर्षीची आकडेवारी पाहता भारतात साधारणपणे १२ लाख नवीन कॅन्सर रुग्णांची नोंद होते, परंतु मागील दोन वर्षांत महामारीमुळे बरेच रुग्ण रुग्णालयात पोहोचू शकले नसल्यामुळे ते आता ॲडव्हान्स स्टेजमध्ये रुग्णालयात आढळत आहेत किंवा उपचाराअभावी मृत्यू पावले आहेत. आतादेखील बऱ्याच शासकीय रुग्णालयांत केवळ तातडीच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे कॅन्सर रुग्णांची शस्त्रक्रिया प्लॅन असल्या कारणाने होऊ शकत नाही आणि खासगी रुग्णालये आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने बरेच रुग्ण उपचार घेऊ शकत नाहीत. रुग्णालयात भरती होण्यापूर्वी कोविड चाचणी बंधनकारक आहे. चाचणी खेडोपाडी उपलब्ध नाही किंवा रिपोर्ट येण्यास दोन दिवस लागतात. कधी कधी केमोथेरपीचे उपचार दर आठवड्यात असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी उपचारापूर्वी चाचणी करणे रुग्णांसाठी एक मोठे दिव्य असते. रेडियो थेरेपी कॅन्सर उपचारांचा मोठा भाग असतो आणि रुग्णाला दररोज उपचारासाठी एक ते दोन महिने रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात दररोज प्रवास करणे, पोलिसांची परवानगी घेणे, रेल्वेचे तिकीट मिळवणे इत्यादी कसरतीचे असते. शिवाय प्रवास करताना कोविड होऊ नये म्हणून स्वतःची काळजी घेणे गरजेचे असते. या सर्व त्रासामुळे बरेच कॅन्सर रुग्ण उपचार पूर्ण करीत नाहीत आणि मग रोग पुन्हा होतो किंवा कधी कधी रेडिओ थेरपीचे उपचारादरम्यान रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आल्यास उपचारामध्ये खंड पडतो, जे रुग्णांसाठी ठीक नसते. कॅन्सर रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती रोगामुळे किंवा दिल्या जाणाऱ्या उपचारांमुळे कमी असते. त्यामुळे त्यांना कोविड इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. कॅन्सर तथा कोविडमध्ये रुग्णांनी अतिशय सकस आहार घेणे गरजेचे असते.

सकस आहार शरीराच्या वाढीसाठी, तसेच उत्तम आरोग्यासाठी अतिशय गरजेचा असतो. सकस आहार न मिळाल्यामुळे कुपोषण होऊन लहान मुले मृत झाल्याच्या घटना आपण नेहमी वर्तमानपत्रातून वाचत असतो. शरीरातील पेशींच्या वाढीसाठी लागणारी ऊर्जा, मेद, प्रथिने, क्षार इत्यादी गोष्टी अन्नामधून पुरविल्या जातात. कॅन्सर आणि आहार यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून तपासणी केली असता असे लक्षात येते की, काही अन्नपदार्थ कॅन्सरजन्य आहेत, तसेच कॅन्सर रुग्णांमध्ये वजन कमी होणे, भूक कमी लागणे इत्यादी गोष्टींमुळे उपचारावर परिणाम होतो.

कॅन्सरजन्य पदार्थ कुठले आहेत?

थोडेथोडके नव्हे तर तब्बल ३५ टक्के कॅन्सर आहाराशी निगडित असून आहारामध्ये बदल केल्यास तेवढ्या प्रमाणात कॅन्सर कमी करता येऊ शकतो.शरीराला लागणाऱ्या कॅलरीज् या कार्बोहायड्रेट्स, मेद व प्रथिने यापासून मिळतात. मेद किंवा चरबीतून मिळणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा कमी असले पाहिजे. आहारात चरबीचे प्रमाण जास्त, तेही प्राण्यांच्या चरबीचे असेल तर स्तन, कोलोन, प्रोस्टेट व गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते.

शाकाहारी लोकांमध्ये मांसाहारी लोकांपेक्षा आठ टक्के कॅन्सर कमी प्रमाणात आढळतो. त्यामुळे शुद्ध शाकाहारी आहार केव्हाही उत्तम.

पश्चिमात्य आहार विरुद्ध भारतीय आहार

पश्चिमात्य आहारामध्ये चरबीयुक्त अन्न मांस, मटण, अंडी, डेअरी प्रॉडक्ट चीज, बटर, तसेच स्वीट्स, चॉकलेट इत्यादी रिफायनरी कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप असते. त्यामुळे कॅन्सरचे त्यातल्या त्यात अन्ननलिकेच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. भारतीय आहारामध्ये फळे, भाजीपाला, कडधान्ये, मासे, पोल्ट्री चिकन इत्यादी गोष्टी असतात. त्यामुळे कॅन्सरचे प्रमाण कमी आहे.

कॅन्सरचा रुग्ण पहिल्यांदा डॉक्टरकडे तपासणीस येतो, तेव्हा ४० टक्के रुग्णांमध्ये वजन कमी झाल्याचे आढळते. रोगाची व्याप्ती जशी वाढेल तसे ते प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत जाते. एकूण वजनाच्या १० टक्के वजन कमी झाले असेल किंवा महिन्याला अडीच ते तीन टक्के वजन कमी होत असेल, तर उपचाराच्या दृष्टीने काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. वजन कमी होणे हे फक्त उपचारासाठी त्रासदायक नसून त्यामुळे रुग्णाला अशक्तपणा येतो, चिडचिड, एकलकोंडेपणा वाढतो. या सर्वांचा परिणाम म्हणून जीवन नकोसे वाटते.

कॅन्सरमध्ये वजन कमी होण्याची काय कारणे

भूक न लागणे, पौष्टिक अन्न न खाणे, अन्ननलिकेत बिघाड होणे, शरीरातील संतुलन बिघडणे, उपचाराचे दुष्परिणाम- जसे चव बदलणे, उलटी होणे, मळमळणे, तसेच मानसिक संतुलन ढळून जेवण न करणे इत्यादी कारणांमुळे वजन कमी होते. कॅन्सर पेशींकडून काही पदार्थ तयार होतात. या सर्वांचा परिणाम म्हणूनदेखील वजन कमी होते.

कॅन्सर झाल्यानंतरचा आहार

‘अरे, काही होत नाही रे... झाला तर पाहू या...’ या आपल्या भारतीय मानसिकतेनेच आपले जास्त नुकसान केले आहे. पौष्टिक आहार घ्यावा, दररोज फिरायला जावे, असे कितीही डॉक्टरांनी सांगितले तरीही कोणी मनावर घेत नाही. एखादा डॉक्टर फारच मागे लागला तर आपण डॉक्टर बदलू, पण स्वत:ला नाही बदलणार; परंतु एकदा का कॅन्सर झाला की, मग रुग्ण काहीही करायला तयार होतात, डॉक्टर सांगेल ते पथ्य पाळतात. या सर्व मानसिकतेचा विचार करून कॅन्सरचे उपचार चालू असताना आहारामध्ये बदल करून कॅन्सर पूर्णपणे बरा करता येऊ शकतो का? या प्रश्नाची उकल करण्याकरिता बऱ्याच पश्चिमात्य देशांनी संशोधन केले असून त्याचे उत्तर दुर्दैवाने नाही, असे आहे.

आता तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्की पडेल की, पौष्टिक आहाराची गरज नाही का? इथे अजिबात गोंधळून जाण्याची गरज नाही. पौष्टिक आहार कॅन्सर उपचाराचा अविभाज्य घटक आहे. शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडीओथेरेपी उपचार शरीरास हानिकारक असतात. त्यामुळे उपचारादरम्यान पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते.

कोणते पथ्य पाळावे?

बऱ्याच रुग्णांची तक्रार असते की, उलटी होणार असल्यासारखे वाटते, भूक लागत नाही, पोट भरल्यासारखे वाटते. मी माझ्या रुग्णांना नेहमी एकच पथ्य सांगतो. ते म्हणजे ‘भरपूर जेवण घ्या, तळलेले तेलकट, तिखट पदार्थ वर्ज्य करा. आपल्याकडे बऱ्याच रुग्णांना दिवसातून दोन किंवा तीन वेळा जेवण्याची सवय असते. ती उपचारादरम्यान थोडीशी बदलून दर दोन-तीन तासांनी छोटी-छोटी जेवणे घेतल्यास रुग्णांना फायदा होतो.’

अहो, डॉक्टर आम्ही नेहमी जेवणासाठी मागे लागतो. पण हा / ही जेवत नाही, अशी नातेवाईकांची प्रेमळ तक्रार असते. ते खरेही आहे, परंतु आपण रुग्णाची मानसिकता समजून घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा रुग्णांची इच्छा असूनदेखील त्रास होत असल्याने त्यांना खाता येत नाही. अशा वेळी रुग्ण आणि नातेवाईक या दोघांनी समजूतदारपणा दाखवणे गरजेचे असते. माझा नातेवाईकांना इतकाच सल्ला आहे की, रुग्ण म्हणजे लहान मूल समजावे व त्याच्या कलाने घ्यावे.

केमोथेरपीचे उपचार घेताना आहार बदलावर विशेष लक्ष द्यावे व उपचाराच्या सुरुवातीलाच आपल्या डॉक्टरशी बोलून काही पथ्ये असल्यास विचारून घ्यावीत. केमोथेरपीच्या काही औषधांसोबत विशिष्ट आहार चालत नाहीत.

रेडीओथेरपीचे उपचार घेताना काही विशेष पथ्याची गरज नसते. भरपूर जेवण घ्यावे. तळलेले तेलकट, तिखट पदार्थ वर्ज्य करावे. प्रमाणापेक्षा थंड किंवा गरम खाऊ नये. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आहारतज्ज्ञांकडून आहाराचे वेळापत्रक बनवून घ्यावे व त्याचे पालन करावे. उपचारादरम्यान बऱ्याच रुग्णांना नाकातून किंवा पोटातून नळी टाकलेली असते. अशा वेळी मिक्सरमध्ये अन्न बारीक करून दोन-अडीच लिटर दिवसाला रुग्णास द्यावे.

वजन वाढविण्यासाठी कोणते उपचार करावे?

कॅन्सरचे उपचार सुरू करण्यापूर्वी आहाराचे महत्त्व रुग्णांनी व नातेवाईकांनी समजून घेणे फार गरजेचे आहे. वजन कमी होण्याचे नेमके कारण माहीत झाल्यास त्याप्रमाणे उपचार करता येऊ शकतात. उपचारादरम्यान पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते.

काय खावे?

आहारामध्ये फळे, भाजीपाला, कडधान्ये, मासे इत्यादी गोष्टी खाण्यास प्राधान्य द्यावे. यामध्ये कॅन्सरजन्य गोष्टींवर मात करणारे अॅंटिऑक्सिडन्टस्, मिनरल्स, फायबर, पोटॅशियम, कॅरोटिन, व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे कॅन्सरचे प्रमाण कमी असते.

(लेखक बॉम्बे हॉस्पिटलमध्ये कॅन्सरतज्ज्ञ व रेडीओथेरपीचे विभागप्रमुख आहेत.)

docnik128@yahoo.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT