गाडी चालवताना रस्ता सरळ नसेल, पण मोकळा व विनाअडथळ्यांचा असेल, तर चालकाला प्रवासात आनंद मिळतो, तसेच, कोणतीही कामगिरी करताना ती सोपी नसली, तरी मनाचे स्पीड ब्रेकर वारंवार येण्याने कौशल्य व बुद्धिमत्ता असूनही कर्तृत्व सिद्ध करण्यात बाधा निर्माण होते. आपण आपल्या क्षमतेला पूर्ण न्याय देऊ शकत नाही. हे मनाचे अडथळे कोणते? लोक काय म्हणतील! कोणी टीका केली तर! निर्णय चुकला तर! - असे विचार.आपला विचार आणि कृती पडताळून पाहण्यात गैर काहीच नाही किंबहुना ते करायला पाहिजेच. सर्व बाजूंनी विचार व्हायला हवा, पण ॲसेसमेंट करता करता आपण जजमेंटपर्यंत पोहोचतो. स्वतःलाही जज करतो आणि इतर लोक काय म्हणतील या विचारांचाही अतिरेक करतो. याची सवय लागत पदोपदी आपलेच पाय खेचत राहतो. अशाने कालांतराने आपला आत्मविश्वास कमी होत जाऊन नकारात्मकता व न्यूनगंड निर्माण होऊ लागतो.
- स्वतःवर शंका घेण्याचं मूळ आपल्या बालवयात दडलेलं असतं. लहानपण मानसिक दृष्ट्या असुरक्षित आणि प्रतिकूल परिस्थितीत गेलं असल्यास मोठेपणीही असुरक्षितता वेगवेगळ्या रूपाने डोकं वर काढून पाय खेचत राहते. यावर मात करता येणं शक्य आहे. सोपं नाही, पण शक्य नक्कीच आहे!
- इतर काय म्हणतील हे महत्त्वाचं होऊन बसतं, याचं कारण एक तर आपलाच आतला आवाज दुबळा असतो आणि दुसरं म्हणजे स्वतःपेक्षा दुसऱ्याने सांगितलेलं ते प्रमाण वाटतं व दिलासा मिळतो, म्हणजे परिणामांचं ओझं वाहण्याची क्षमता विकसित झालेली नसते.
- सारखा कोणाचा तरी टेकू लागतो, बरोबर कोणीतरी असावं असं वाटतं, कोणाकडून तरी दुजोरा मिळावा, की मी जे करतेय ते बरोबर आहे का? जेवढा विश्वास समोरच्यावर आहे तेवढा स्वतःवर का नाही?
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
- ज्यांना असं सतत ‘validation’ लागतं त्यांना त्याचा त्रास नक्कीच होत असतो. समजत असतं की आपल्याला सक्षम व्हायला हवं. या आतल्या आवाजाला भक्कम करण्याची पहिली पायरी म्हणजे सर्वप्रथम स्वतःमधील गुण आणि सामर्थ्य ओळखा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला पूर्णपणे जाणून घेत नाही, स्वतःला स्वीकारत नाही, स्वतःवर प्रेम करत नाही आणि स्वतःचा आदर करायला लागत नाही, तोपर्यंत हे सर्व बाहेरूनही मिळणार नाही. स्वतःचा शोध घेणे खूप महत्त्वाचं आहे आणि एकदा आपण स्वतःला सापडलो की लांबपर्यंत साथ देणारा खजिना सापडल्यासारखं वाटतं.
- आपल्यातील सामर्थ्य व क्षमतेची ओळख तुम्हाला पटली, की त्याच्यावर प्रचंड मेहनत घ्या आणि त्यांना विकसित करा. लोकमान्य टिळकांची प्रकृती बालवयात नाजूक असायची. त्यांनी शालेय शिक्षणामध्ये एक वर्षाचा खंड घेऊन पूर्ण लक्ष फक्त शरीर कमावण्यासाठी दिले आणि मग शिक्षण पूर्ण करून पुढील राष्ट्र कार्यास वाहून घेतले. थोर व्यक्तिमत्त्वांकडून आपण काय शिकायचं हे समजलं तर इतिहास फक्त पुस्तकांमध्ये कैद राहणार नाही. शक्य तितका स्वतःबरोबर वेळ घालवा, काही काळ एकटे राहा आणि फक्त व्यक्तिमत्त्व विकास हे एकच ध्येय ठेवा. ज्यातून तुमची प्रगती होत नाही त्या सर्व गोष्टींना दूर ठेवा.
- सर्वांत अगोदर स्वतःबरोबर असलेल्या नात्यावर लक्ष द्या. तुमची आतली तयारी आणि सक्षमीकरण होत जाईल तसं बाहेरून देखील संधी चालत येऊ लागतील. याच आंतरिक भक्कमपणातून जे काही कराल ते शेवटपर्यंत निभावण्याचीही ताकद येऊ लागेल. आपले प्रयत्न शंभर टक्के केले की उरलेला भार वाहण्यासाठी मदतीचे हात आपोआप उठतात. आपण आधीच मदत मिळावी आणि कोणीतरी आपला भार वाहावा याची अपेक्षा ठेवतो आणि या चाचपडण्यात अनेक वर्षे वाया जाऊ शकतात.
श्रद्धावान् लभते ज्ञानम्
व्यावहारिक पातळीवर स्वतःचे व्यक्तिमत्त्व सक्षम करण्यासाठी सुरुवातीपासून डोळस प्रयत्न करायला हवेत. जसे नाजूक वेलीला वृक्षाचा आधार घ्यावा लागतो, लहान मुलांना पायात जोर नसतो तेव्हा वॉकरच्या आधाराने चालायला लागते तसे वेळोवेळी वयाच्या त्या त्या टप्प्यावर स्वतःला घडवायला काहीतरी इन्स्पिरेशन असेल अशा ग्रंथांचा, व्यक्तींचा, राष्ट्र पुरुषांच्या विचारांचा आधार घ्यावा. भारतीय संस्कृतीत व अध्यात्म शास्त्रात अशी अनेक श्रद्धास्थाने आहेत, त्यांचेही आधार घेत स्वतःला घडवावे. कारण भगवद्गीतेने म्हटलेच आहे ‘श्रद्धावान् लभते ज्ञानम्...’ अशानेच आपण नक्कीच एक सक्षम व्यक्ती बनू शकतो.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.