मुलांच्या भावनिक समस्या बऱ्याचदा चिंता किंवा नैराश्यात रूपांतरीत होऊ शकतात.
-श्रुतिका कोतकुंडे सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण sajagclinic@gmail.com
आपल्या समाजात गैरसमज आहे की, मुलांना नैराश्य येऊ शकत नाही. मोठ्यांप्रमाणे मुलांमध्येही नैराश्य दिसून येते. मुलांमधील (little Children) नैराश्याची लक्षणे ओळखणे सोपे नाही कारण, ते भावना शब्दात व्यक्त करू शकत नाहीत. जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे किंवा अभ्यासातील समस्येमुळे किंवा शाळेतील समस्येमुळे मुलांना नैराश्य येऊ शकते.
अधेमध्ये उदास वाटणे नैराश्य (Depression) नव्हे, तर जर सातत्याने दोन आठवडे मूल उदास दिसू लागले व त्याच्या स्वाभाविक वागण्यापेक्षा वेगळे वागू लागले तर ही नैराश्याची सुरुवात असू शकते. आजच्या आभासी जगातील इन्स्टा, ट्विटर यातून येणारे दडपण व छळवणूकही नैराश्याची कारणे असू शकतात. नैराश्य हा एक आजार आहे व इतर आजारांसारखे त्याच्यावर उपचार आहेत.
सौरभची आई (Mother) मला सांगत होती की, हल्ली सौरभ खूपच एकलकोंडा झाला होता. तो मित्रांसोबत खेळत नाही, बाहेरचे कोणी घरी आलेले त्याला आवडत नाही. आई खूप वेळ बाहेर गेलेली त्याला आवडत नाही, लगेच चिडतो किंवा रडू लागतो. १० वर्षाचा सौरभ अभ्यासात ठीक होता; पण शाळेतही कोणात मिसळत नाही, असे शिक्षक सांगत. आपल्या मुलाच्या वागण्यातील बदल बघून सौरभची आई चिंतित झाली होती. सौरभला नैराश्य आले होते. कोविडमध्ये त्याचे आवडते काका वारल्यानंतर सौरभ थोडा अलिप्त होत गेला आणि हळूहळू कोषात जाऊ लागला होता. काय झालं होतं सौरभला?
मूल जसे शरीराने व बुद्धीने वाढू लागते तेव्हा ते विविध समस्यांना सामोरे जाताना अडखळू शकते. त्यामुळे विविध समस्यांना तोंड देताना मुलांना कधी उदास वाटले, भीती वाटली किंवा चिडचिड झाली तर मोठ्यांना आश्चर्य वाटू नये. मुलांना अशा भावना वाटल्या तर ते स्वतः गोंधळून जाऊ शकतात आणि त्यांची भावनिक तगमग बऱ्याचदा वागण्यातून दिसते. मुलांच्या भावनिक समस्या बऱ्याचदा चिंता किंवा नैराश्यात रूपांतरीत होऊ शकतात. मूल खेळात किंवा आवडीच्या गोष्टीत रस घेत नाही, सतत थकलेले वाटते, कंटाळलेले वाटते, रेंगाळत राहते, चिडचिड करते, चुळबुळ करते, खूप झोपते किंवा झोपतच नाही. जेवत नाही, उदास दिसते, सतत तक्रार करते की, त्याचे कोणी ऐकत नाही. त्याची कोणाला फिकीर नाही किंवा सतत हिरमुसल्यासारखे असते, मित्रांमध्ये मिसळत नाही, लोकांपासून दूर राहू लागते.
अभ्यासात, खेळात मुलाचे लक्ष लागत नाही. विसरत राहते, सतत पोटदुखी, डोकेदुखीबद्दल तक्रार करते इत्यादी लक्षणे मुलांमध्ये दिसू शकतात. चांगला अभ्यास करणारे मूल अभ्यासात मागे पडू लागते. शाळेला जाण्यास नकार देते किंवा क्वचितप्रसंगी आत्महत्या किंवा मृत्यूबद्दल बोलू लागते. पालकांनी मुलाशी भावनिक जवळीक साधावी. मुलाशी त्याच्या भावनांबद्दल समस्यांबद्दल बोलतं होण्यासाठी मदत करावी. मुलाची नैराश्याची भावना नाकारू नये. घराच्या किंवा शाळेच्या परिस्थितीत काही बदल झाला असल्यास त्याचा मागोवा घ्यावा. मुलाची सतत टीका करू नये, मुलाला सतत टोचून बोलू नये.
मुलाला आपल्या मित्रांसोबत खेळण्यास, मजा करण्यास प्रोत्साहित करावे. मुलाला समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करावे. त्याला धीर येण्यासाठी प्रयत्नशील राहावे. गरज पडली तर मार्गदर्शन घ्यावे. मूल मोठं होत असताना बऱ्याच गोष्टी त्याला ताण आणणाऱ्या किंवा कठीण वाटू शकतात. याचा त्याच्या स्वभावावर व वर्तणुकीवर परिणाम होऊ शकतो. पालकाचा किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, परीक्षेतले अपयश, कौटुंबिक हिंसाचार किंवा शारीरिक, मानसिक, लैंगिक छळही त्याची कारणे असू शकतात.
(लेखिका मनोविकारतज्ज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.