Adolescence Stress esakal
health-fitness-wellness

पौगंडावस्था-तणावपूर्ण संक्रमणाचा काळ; कुमारवयात मुलींमध्ये आढळतात मुलांपेक्षा जास्त भावनिक समस्या!

सकाळ डिजिटल टीम

पालकांनी आजच्या कुमारवयीन मुलांची जीवनशैली समजून घेऊन त्याला संवादातून सकारात्मक पैलू पाडण्याचे काम करावे.

-श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण sajagclinic@gmail.com

कोमलची आई सांगत होती, त्यांची १३ वर्षांची मुलगी खूप हळवी झाली होती. पटकन दुखावली जायची व चिडायची. एरवी हसरी, बोलकी कोमल हल्ली घुम्यासारखी वागायची. आपल्या लेकीतला हा बदल त्यांना समजेनासा होता. काय झालं होतं कोमलला?

वय १३-१९ वर्षे हा वयात येण्याचा काळ समजला जातो. तरी सर्वसाधारण मुलांच्या वाढीची गती कमीजास्त बघता वय ९-२१ वर्षे हा काळ पौगंडवस्था म्हणवतो. सर्वसाधारण शहरी व निमशहरी वातावरणात वाढलेल्या मुलांचा या वयात पालकांविरुद्ध व शिक्षकांविरुद्ध बंड पुकारणे व जोखीम उचलण्याकडे कल असतो. ना धड लहान ना धड मोठे या अडनिड्या वयात, मुलांना वाटते त्यांना मोठ्या माणसासारखे बरोबरीने वागवले गेले पाहिजे. त्यांना त्यांचे निर्णय स्वतंत्र घेऊ दिले पाहिजेत.

या विपरीत पालकांना वाटते मुलांना अजून जबाबदारीची व दुनियादारीची जाणीव नसल्याने ते मुलांना अधिक स्वातंत्र्य देताना घाबरतात. या टकरावातून चिडचिड होणे, मनस्थिती बिघडणे सर्वसाधारण आहे. त्याचबरोबर हल्ली कुमारवयीन मुले सामाजिक माध्यमावर सक्रिय असणे, शैक्षणिक वयात पालकांवर निर्भर असणे व हवे असलेले स्वातंत्र्य हेही मुद्दे संघर्षाची कारणे बनू लागली आहेत.

शेतकरी कुटुंबात व कष्टकरी कुटुंबातील मुले मात्र लवकर कमावती होताना दिसतात. बालपणातून परस्पर प्रौढ वयात पदार्पण करताना दिसतात. कर्मठ, पारंपरिक कुटुंबात धर्माचा पगडा असल्याने दारू पिणे, जुगार खेळणे, लैंगिक स्वैर वागणे सहसा कुमारवयीन मुलांमध्ये दिसत नाहीत. अशा कुटुंबात मुलींची लग्ने लवकर लागतात. त्यामुळे त्यांना पाळी येणे, लग्न लागणे व गरोदर रहाणे यात जास्त अंतर नसते. याचा परिणाम त्यांच्या पुढच्या आयुष्यात झाल्याशिवाय राहत नाही. पौगंडावस्थेत शारीरिक बदल होतातच, पण भावनिक आणि वर्तणुकीतील बदल हे त्या-त्या संस्कृतीनुसार बदलतात.

  • कुमारवयीन मानसिक स्वास्थ्याच्या समस्यांचे प्रमाण इतर वयांतील समस्यांसारख्या असल्या तरी कुमारवयात मुलींमध्ये मुलांपेक्षा जास्त भावनिक समस्या आढळतात.

  • तीव्र मानसिक समस्या सुरू होण्याचे हेच वय असते

  • या वयात आत्महिंसा वाढलेली दिसते.

  • व्यसनाची सुरुवात बऱ्याचदा याच वयात होते.

वाढत्या जागतिकीकरणात पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव भारतासारख्या प्रगतिशील देशातही दिसून येतो. बदलत्या जगात स्वातंत्र्य, नवीन संधी अनुभवणे, मौज करणे अनुभवताना कुमारवयीन मुलांमध्ये कष्टाचे मोल अनुभवणे, स्वयंशिस्त जोपासणे दुर्मीळ होत आहे. यामुळे पुढे प्रौढ झाल्यावर नोकरी टिकवणे, अपयश पचवणे व प्रामाणिक जीवनशैली जोपासणे आजच्या मुलांना कठीण जाते.

पालकांनी आजच्या कुमारवयीन मुलांची जीवनशैली समजून घेऊन त्याला संवादातून सकारात्मक पैलू पाडण्याचे काम करावे. या वयात मुलांना मार्गदर्शनाची गरज असते, परंतु नेमके याच वयात त्यांच्यावर पालकांचा कमी व मित्र-मैत्रिणींचा प्रभाव जास्त असतो. तरीही योग्य संवाद व सहृदय वातावरणात मुलांशी चर्चा आणि जबाबदारीच्या जाणीवेत त्यांना स्वातंत्र्य अनुभवू द्यावे. त्यांच्या जीवनशैलीला कुठलेही नकारात्मक लेबल लावू नये. टोचून बोलू नये. जोखिमीच्या वागण्याबद्दल जसे व्यसन, लैंगिक कृती तसेच मित्र, कौटुंबिक जबाबदाऱ्या अशा महत्त्‍वाच्या विषयांवर मैत्रीने, बरोबरीच्या भावनेने चर्चा करून त्यांना विचार प्रवृत्त करावे. त्यांच्या भविष्यातील स्वप्नांचा आजच्या वागण्याशी सांगड घालण्यास मदत करावी. कुमारवयातील मुलांना त्यांचे ऐकून घेतलेले आवडते. त्यांच्यावर जबाबदारी दिल्यानेच ते जबाबदार होतात, हे लक्षात घ्यावे.

पौगंडावस्थेतील आपले मुल आपल्या समजण्यापालीकडे वागत आहे. याचा पालकांना बऱ्याचदा खूप ताण येतो व त्यांनी आपल्या मानसिकतेकडे दुर्लक्ष करू नये. पालक विवेकाने वागले तरच मुलांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतील. शिक्षकही मुलांशी योग्य संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करू शकतील. पालकांनी आपल्या मुलाशी संवाद वाढवण्यासाठी शिक्षक, मित्र तसेच मुलाच्या प्रिय व्यक्तींची मदत घ्यावी. अशावेळी समुपदेशन हा उत्तम मार्ग ठरतो.

कोमलच्या शिक्षकांकडून व मैत्रिणींकडून कळले की, शाळेतील काही मुलं समाजमाध्यमावर तिच्या दिसण्यावरून चिडवत होते व भावनिक छळ करीत होते. कोमलला तिच्या रूपाबद्दल गंड निर्माण झाला होता. तीव्र ताणामुळे ती स्वतःवर ब्लेडने जखमा करून राग व्यक्त करीत असे. कोमलला व तिच्या पालकांना समुपदेशानतून सावरायला मदत झाली. कोमलच्या शाळेत पोलिसांकरवी सायबर बुलिंगचे सत्र घेऊन त्याबाबत जागृती केली गेली. कोमलच्या शाळेत जीवन शिक्षण उपक्रमातून सर्व कुमारवयीन मुलांची जाणीव जागृती करण्यात आली. त्यामुळे कोमलसारख्या इतर मुलांनाही या अवघड वळणावर स्वतःला कसे जपावे, याबद्दल मार्गदर्शन मिळाले. कोमल आता नववीत आहे. अजूनही अधीमधी ती भावनाविवश होते; पण आता ती स्वतःला लवकर सावरू शकते. कोमल आणि तिच्या आईचे नाते पुन्हा हसू लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

Ajit Pawar यांच्यामुळे आमच्या पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

Voter Registration : मतदार नोंदणीसाठी एकाच्याच नावावर भरले तब्बल ४६२ अर्ज, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT