Allergic Cold Symptoms esakal
health-fitness-wellness

Allergic Cold Symptoms : अ‍ॅलर्जीची सर्दी कशी ओळखायची? सर्दीची कोणती आहेत लक्षणे?

सकाळ डिजिटल टीम

आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची ॲलर्जी आहे हे ओळखून त्या पदार्थांपासून दूर राहिल्यास अ‍ॅलर्जीचा त्रास कमी होतो.

-डॉ. सायली फडके, कान, नाक, घसातज्ज्ञ

नेहमी बोलण्यामध्ये अ‍ॅलर्जी (Allergic Cold Symptoms) हा शब्द इतक्या सहजपणे वापरला जातो की, ‘एखाद्या गोष्टीचा आपल्याला होणारा त्रास’ असा त्याचा सहजसोपा अर्थ चटकन समजतो. एखाद्या पदार्थाविषयी शरीराची असलेली अतिसंवेदनशीलता म्हणजे अ‍ॅलर्जी. आता वैद्यकीय परिभाषेत ॲलर्जी म्हणजे काय हे समजून घेऊ या.

एखादा बाह्यपदार्थ शरीरात किंवा त्वचेवर आला तर सर्वसामान्यपणे न होणारी विशिष्ट किंवा विपरीत प्रतिक्रिया जेव्हा एखाद्या व्यक्‍तीच्या बाबतीत होते तेव्हा त्या अवस्थेला ‘अ‍ॅलर्जी’ असे म्हणतात. ज्या बाह्य पदार्थांमुळे अ‍ॅलर्जी होते त्यांना अ‍ॅलर्जन किंवा प्रतिजन असे म्हणतात. हे पदार्थ बहुधा प्रथिन (protein) किंवा संयोजित पिष्टमय (Complex Carbohydrates) स्वरूपाचे असतात.

कोणताही बाह्य पदार्थ शरीरात आला तर आपली रोगप्रतिकारक्षम यंत्रणा त्याला निरुपद्रवी करून टाकते. शरीरात जेव्हा पहिल्यांदा एखादा बाह्य पदार्थ प्रवेश करतो तेव्हा आपल्या रोगप्रतिकारक्षम यंत्रणेमार्फत या बाह्य पदार्थाविरुद्ध प्रतिपिंडे (Antibodies) तयार केली जातात. प्रत्येक विशिष्ट बाह्य पदार्थांसाठी विशिष्ट प्रतिपिंड निर्माण होते. थोडक्यात, लाखो प्रकारची प्रतिपिंडे आपल्या शरीरात तयार होऊ शकतात.

जेव्हा हाच बाह्य पदार्थ शरीरात दुसऱ्‍यांदा प्रवेश करतो तेव्हा या बाह्य पदार्थाला म्हणजेच प्रतिजनाला नामोहरम करण्यासाठी प्रतिपिंडे त्यावर आक्रमण करतात आणि ‘प्रतिजन – प्रतिपिंड’ प्रक्रिया (Antigen-Antibody Reaction) होते. काही व्यक्‍तींमध्ये ही क्रिया विपरीत झाल्यामुळे ‘प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रिया’ सरळमार्गी न होता शरीरातील पेशी त्या विशिष्ट प्रतिजनांसंबंधी अतिसंवेदनशील झाल्याने रक्‍तात विविध प्रकारचे रासायनिक घटक सोडले जातात. त्यांचा विपरित परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे प्रतिजनाचा शरीरात प्रवेश झाल्यावर विशिष्ट लक्षणे दिसू लागतात. याला अ‍ॅलर्जी असे म्हणतात.

अॅलर्जीमुळे होणारी सर्दी ही याच प्रकारची असते. जेव्हा एखादा प्रतिजन नाकामध्ये प्रवेश करतो तेव्हा प्रतिजन प्रतिपिंड प्रतिक्रिया होऊन हिस्टामिन नावाचे रसायन शरीरात स्रवते. त्याचे विपरीत परिणाम जसे की, नाकाच्या ग्रंथींमधून जास्त स्राव स्रवणे (नाक वाहणे), नाकाच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावणे (नाक चोंदणे) इत्यादी दिसून येतात.

अ‍ॅलर्जीची सर्दी कशी ओळखायची?

सर्दी दोन प्रकारची असते. एक अ‍ॅलर्जीची आणि दुसरी विषाणूजन्य. विषाणूमुळे होणाऱ्या सर्दीमध्ये सर्दीसोबतच अंगदुखी, डोकेदुखी, पायदुखी, कणकण, कमी-अधिक प्रमाणात ताप अशी लक्षणे दिसून येतात. अॅलर्जीच्या सर्दीमध्ये शरीराच्या इतर भागात लक्षणे दिसून येत नाहीत.

अ‍ॅलर्जीच्या सर्दीची लक्षणे कोणती आहेत?

सर्दी, शिंका, नाक गळणे, नाकात खाज येणे, नाक लालसर होणे, तोंडात वरच्या भागात टाळूला खाज येणे, घशात खाज येणे अशी अ‍ॅलर्जीच्या सर्दीची लक्षणे असतात. अ‍ॅलर्जीची सर्दी असलेल्या व्यक्‍तींना भविष्यात दम्याचा त्रास होऊ शकतो. दमा म्हणजे फुप्फुसातील अ‍ॅलर्जी म्हणूया. या व्यक्‍तींना दम लागणे, छातीतून घरघर आवाज येणे, कोरडा खोकला येणे, छातीवर दडपण आल्यासारखे वाटणे, कोंडल्यासारखे वाटणे, श्‍वास अपुरा पडणे अशी लक्षणे दिसतात.

ॲलर्जी नेमकी कोणकोणत्या गोष्टीची?

वातावरणातील असंख्य पदार्थांची एलर्जी असू शकते. ही अ‍ॅलर्जी वेगवेगळ्या माणसांना कमी-अधिक प्रमाणात वेगवेगळ्या पदार्थांची असू शकते. हवामानामध्ये झालेला बदल, वातावरणात वाढलेले परागकण, बाहेरील आणि घरातील धूळ, प्रदूषित धूर, सल्फरडाय ऑक्साईडसारखे धोकादायक वायू, कार्बन, अगरबत्ती, बीडी, सिगारेटमुळे होणारा धूर, अनेक दिवस स्वच्छ न केलेल्या अंथरूणावर किंवा कापसाच्या गादीच्या बोंडातील धूळ, वेगवेगळ्या प्रकारचा वास, रंग, परफ्युम्स, डिओडरंटस्, अत्तर, वेगवेगळे खाद्यपदार्थ, थंड पेये, काही विशिष्ट प्रकारची औषधे अशा अनेक पदार्थांमुळे अ‍ॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. घरातील पाळीव प्राणी उदा. कुत्रा, मांजर, कबुतरे, कोंबड्या यांच्यामुळेही अ‍ॅलर्जीचा त्रास होतो. वातावरणातील, जागेतील किंवा खाण्यातील बदल हे याला कारणीभूत असतात. अ‍ॅलर्जी ही आनुवंशिकसुद्धा असते.

प्रतिबंधात्मक उपाय

आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची ॲलर्जी आहे हे ओळखून त्या पदार्थांपासून दूर राहिल्यास अ‍ॅलर्जीचा त्रास कमी होतो. कोरोना काळात बऱ्याच लोकांचा ॲलर्जीचा त्रास केवळ मास्क वापरल्यामुळे कमी आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रदूषित ठिकाणी किंवा रस्त्यावरून जाताना घराची स्वच्छता करताना मास्क वापरणे आवश्यक ठरते. विशिष्ट खाद्यपदार्थांची ॲलर्जी असेल तर ते खाणे टाळावे.

निदान व उपचार

आपल्याला वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित नाक, कान, घसातज्ज्ञांना भेटावे. ॲलर्जीची लक्षणे कमी होण्यासाठी नाकात मारायचे स्प्रे व अँटीॲलर्जिक गोळ्या दिल्या जातात. लक्षणे किती प्रमाणात आहेत त्यावर ही ट्रीटमेंट ठरते. नक्की कोणत्या पदार्थाची ॲलर्जी आहे हे समजण्यासाठी ॲलर्जी टेस्ट केली जाते. त्यामध्ये जवळजवळ तीनशेहून अधिक पदार्थांची त्वचेवर टेस्ट करून आपल्याला कुठल्या पदार्थाची ॲलर्जी आहे हे कळते. त्या पदार्थांच्या vaccines किंवा प्रतिजैविके तोंडावाटे दिली जातात. या ट्रीटमेंटचा कालावधी साधारण एक वर्षे ते तीन वर्षेएवढा असतो. लस घेतल्यानंतर साधारणपणे ८५ ते ९० टक्के ॲलर्जीचा त्रास कमी होतो.

(डॉक्टर चिरायू हॉस्पिटल येथे कान, नाक, घसातज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT