समाजमनामध्ये मणक्याच्या ऑपरेशनबद्दल भीती निर्माण करण्यामध्ये काही ठराविक लोकांच्या प्रयत्नांचाही मोठा वाटा आहे.
-डॉ. श्रीविजय फडके, न्यूरोसर्जन (मेंदूशल्यविशारद)
shreemusic@gmail.com
सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट...रात्री दोन वाजता माझ्या मोबाईलची रिंग वाजली. झोपेतून जागा झाल्याने थोडासं वैतागूनच मी विचारलं कोण आहे? दोन वर्षांपूर्वी मला दाखवलेल्या एका रुग्णाचा फोन होता. मध्यमवर्गीय कुटुंबातील, उत्तम नोकरी असलेल्या आणि सुशिक्षित महिला. बारा तासांपासून लघवीच न झाल्यामुळे घाबरून त्यांनी मला फोन केला होता.
पाठदुखीचा (Back Pain) जुना आजार होता; मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता आजार बळावून पायामधली ताकद व लघवीचा कंट्रोल गेल्याने परिस्थिती फारच गंभीर बनली होती. ऑपरेशनचा सल्ला त्यांनी मानला नव्हता व ऑपरेशन टाळा, या जाहिरातीतील अनेक प्रभावहीन पर्यायांचा वापर त्या करत होत्या; पण आता पर्याय नसल्यामुळे त्या अॅडमिट झाल्या व इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करावे लागले.
मणक्याचे आजार (Spine Diseases) हे फक्त पाठदुखीपुरते मर्यादित नाही. हाता-पायाचे पूर्ण नियंत्रण तसेच लघवी आणि संडासचे नियंत्रणही मणक्यामध्येच असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केल्यास दुखण्याबरोबर हातापायाची ताकद जाण्याचा धोका मणक्याच्या आजारांमधून संभवतो; मात्र वेळेत योग्य उपचार झाल्यास व लागल्यास सर्जरी झाल्यास हे सर्व टाळता येते. मणक्याचे आजार प्रामुख्याने दोन मणक्यामधली गादी सरकल्याने होतात. वयोमानानुसार मणक्यांची झीज होते, गादी खराब होते.
चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे किंवा मार लागणे अशा गोष्टींमुळे खराब झालेली गादी सरकून नसेवरती दाब पडतो व त्यामुळे पाठदुखी चालू होते त्याबरोबर हाडांची झीज, फ्रॅक्चर, दोन मडक्यांमधील सांधे, स्नायू व लिगामेंटचे आजार हे सुद्धा पाठदुखीसाठी कारणीभूत ठरतात. पाठीच्या दुखण्याच्या जवळपास ७० टक्के आजारांमध्ये ऑपरेशन लागत नाही; परंतु ज्या पेशंटमध्ये ऑपरेशन लागते त्यांनी ते वेळेत करून घेतले तर त्याचा फायदा होतोच होतो.
मणक्याच्या आजाराचे योग्य निदान करण्यासाठी एमआरआय तपासणी ही अतिव महत्वाची असते. मणक्यामध्ये ३२ गाद्या असतात व त्यांच्या दोन्ही बाजूने नसा निघत असल्यामुळे कोणत्या बाजूचे व कोणत्या पातळीवरचे ऑपरेशन करायचे हे एमआरआयवरून अचूक समजते. पूर्वीच्या काळी एमआरआयची सुविधा नसल्याने अनेकदा मणक्याच्या शस्त्रक्रिया या जुन्या पद्धतीने, अपुऱ्या निदानाच्या आधारे केल्या जात असत. त्यामुळे मिळणाऱ्या यशाची खात्री नसे. भूल देण्याची पद्धत, त्यामधील औषधे, भूल देण्यासाठी लागणारे मशिन त्यातील काहीच गोष्टी नसल्याने भूल देणेसुद्धा अवघड व जोखमीचे होते; मात्र गेल्या ३० वर्षांत विज्ञानाच्या प्रगतीमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अचूक निदानाची सोय गावागावात उपलब्ध झाली. भूल देण्याची पद्धत खूप सुधारली.
प्रथम टाक्याचे त्यानंतर मायक्रोस्कोपने व आता तर दुर्बिणीने बिनाटाक्याचे मणक्याचे ऑपरेशन शक्य झाले आहे. अर्थात, कोणत्या आजारासाठी कोणत्या प्रकारे ऑपरेशन करायचे हे प्रत्येक पेशंटनुसार ठरवावे लागते. एकच साईजचा शर्ट सगळ्या माणसांना होत नाही तसाच काहीसा प्रकार. हे सर्व झाले तंत्रज्ञानातील प्रगती व मणक्याच्या शस्त्रक्रियांमध्ये झालेली प्रगती; परंतु समाजमनामध्ये मणक्याच्या सर्जरीबद्दल असलेली भीती मात्र अजूनही बऱ्याच अंशी कायम आहे. वर लिहिल्याप्रमाणे १९८५ पूर्वी मणक्याचे ऑपरेशन यशस्वी होण्याची टक्केवारी खूप कमी होती; पण त्यामुळे अयशस्वी झालेली ऑपरेशन्स व त्याबद्दलची भीती लोकांच्या मनामध्ये कायम घर करून राहिली.
अजूनही मी लोकांना मणक्याचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला की, पहिल्यांदा नकारघंटा वाजते. पेशंट कितीही त्रास होत असेल तरी ''डॉक्टर आम्हाला गोळ्या द्या'' हा एकच घोषा लावतात. नातेवाईकांपैकी एकतरी मला निश्चित सांगतो की, अमक्या तमक्याचे ऑपरेशन झाले होते आणि गेली ३० वर्षे तो गादीवरच आहे किंवा अमक्या तमक्याचे ऑपरेशन केलेले आणि तो अजून चालत नाही; मात्र अशी उदाहरणे आजच्या काळात खूप कमी आहेत.
समाजमनामध्ये मणक्याच्या ऑपरेशनबद्दल भीती निर्माण करण्यामध्ये काही ठराविक लोकांच्या प्रयत्नांचाही मोठा वाटा आहे. ‘मणक्याचे ऑपरेशन टाळा’ अशा मोठमोठ्या पाट्या आपण रोज येता-जाता वाचतोच. सूज्ञास सांगणे न लगे, या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने अशा जाहिरातीमागचा हेतू काय असावा, याचा विचार नक्की केला पाहिजे. त्याची हजारो रुपयांची निरूपयोगी, अशास्त्रीय औषधे व उपकरणे विकणे हाच त्याच्या मागचा मुख्य हेतू असतो; परंतु अशा तयार केलेल्या भीतीमुळे रुग्ण ऑपरेशनला घाबरतात आणि कितीही निकड असली तरीही ऑपरेशन करून घ्यायला तयार होत नाही व कालांतराने आपले पाय चालण्याची ताकद लघवी, संडासचा कंट्रोल गमावतात ही त्याच्यातली सर्वात दुर्दैवी बाब.
(डॉ. चिरायु हॉस्पिटल रत्नागिरी येथे न्यूरोसर्जन (मेंदूशल्यविशारद) तज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.