योगा पासून "योग" पर्यंत sakal
health-fitness-wellness

International Yoga Day 2022 योगा पासून "योग" पर्यंत

योगाचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, वैयक्तिक आणि आध्यात्मिक असे

देवयानी एम., योगप्रशिक्षक

ऋषिमुनींनी केलेल्या संशोधनांतून, स्वतःवरील प्रयोगातून, तपश्चर्या व साधनेतून तयार केलेल्या अनेक ग्रंथांद्वारे आपल्या जीवनाचे युजर मॅन्युअल बनवले, ज्याचे नाव ‘योगशास्त्र’. योगाचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, वैयक्तिक आणि आध्यात्मिक असे सर्व पैलू पतंजली मुनींनी अष्टांग योगात सांगितले आहेत. समाजात कसं वागावं, वैयक्तिक सवयी कशा असाव्यात, शारीरिक-मानसिक उन्नतीसाठीची साधने, एकाग्रता, ते अगदी शरीर-मन-बुद्धी-अहं यांच्याही पलीकडं जाण्याचा मार्ग अशी व्यापक रेंज कव्हर केली आहे. हे आपल्या आयुष्याचं युजर मॅन्युअल नाही, तर अजून काय आहे?

या वर्षी आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आसनांपलीकडचा ‘योग’ समजून घेण्याकडे वाटचाल करूया. योगाचे व्यायामापलीकडील योगदान अमाप आहे. ‘योगा’पासून ‘योग’पर्यंत येऊया. शरीर-मनाची, विचार-कृतींची, संयम-समाधानाची व मानव-निसर्गाची एकसंधता, एकात्मता आणि आपल्या आयुष्याचे पूर्णत्व हे योगशास्त्राच्या अभ्यासानं व नियमित सरावानं साध्य होणार आहे. या ५००० वर्षांचा वारसा असलेल्या योगशास्त्राला अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय योग दिन.’

योग दिनाचे महत्त्व

२१ जून या दिवसाचे विशेष महत्त्व असे, की तो दिवस वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो. उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. या काळात सर्व जिवांना जगवणारी सौरऊर्जा सर्वाधिक प्रभावशाली असते. या ऊर्जेतून सकारात्मकता आणि आत्मविकास वृद्धिंगत व्हावा यासाठी योग दिवसाचे प्रयोजन. कोणताही दिवस साजरा करण्यामागे त्या विषयाच्या ज्ञानाचा प्रसार, सर्वांमध्ये ऐक्यभाव, आनंद आणि कृतज्ञता व्यक्त व्हावी हा आहे. कुठल्याही गोष्टीचे महत्त्व आपल्याला पटलेले असते, तेव्हा ती आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनते, पण मधून-मधून त्यांना उजाळा दिला की त्यांचं महत्त्व टिकून राहतं.

जीवनशैली

‘योग’ ही जीवनशैली आहे, असं आपण ऐकून आहोत. म्हणजे नक्की काय? याचा अर्थ असा की रोज एक तास विविध आसनं, सूर्यनमस्कार, प्राणायाम, क्रिया, ध्यान करणं तर अत्यंत महत्त्वाचं आहेच, परंतु त्याबरोबरच दैनंदिन आयुष्य योगिक तत्त्वांवर जगण्याचा प्रयत्न करणं याला जीवनशैलीचा भाग होणं म्हणता येईल. ही तत्त्वे वर पाहिल्याप्रमाणं अनेक योगग्रंथांत शिकायला मिळतील. ‘योग’ करणं आणि ‘योगमय’ राहणं या दोन्हींचा विचार असावा. शरीराच्या कवायतीप्रमाणं मनाची मशागत, बुद्धीला धार आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी काही वेळ बाजूला काढावा. रोज काहीवेळ तरी ‘स्वाध्याय’ म्हणजे कामापलीकडील आणि करमणुकीपलीकडील विषयांचा अभ्यास करावा. मनाचा ओलावा टिकून ठेवणारा आणि ‘मी-माझं’च्या पलीकडे नेणारा, व्यापकता वाढवणारा अभ्यास कशाने होईल असे वाचन करा. मनाला शिस्त लागली तर दिवस शिस्तशीर जाईल, आणि तसंच आयुष्यही! अशाने आपण ना व्याधींचे अधीन होतो, ना मनाचे गुलाम. शिस्तबद्ध आयुष्य आपल्या आनंदाच्या आड येत नाही किंबहुना आनंदाच्या खऱ्या व्याख्येपर्यंत घेऊन जातं.

(लेखिका योग थेरपिस्ट आणि‘योग ऊर्जा’च्या संस्थापिका आहेत.)

महत्त्व अष्टांग योगाचे

महर्षी पतंजलींनी योग दर्शनशास्त्रात ‘अष्टांग योग’ सांगितला. शरीरातील प्रत्येक अंग जसे आवश्यक आणि उपयोगी आहे, तसेच योगातील अष्टांगांची आवश्यकता आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी ही आठ अंगे.

अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे पाच ‘यम’ (social code of conduct) म्हणजेच योगिक तत्त्वांवर जीवन जगत असताना समाजात आपलं वर्तन कसं असावं याचं मार्गदर्शन यात आहे.

शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान असे पाच ‘नियम’ (personal code of conduct) म्हणजेच वैयक्तिक आयुष्यात पावित्र्य टिकवण्यासाठी काय करावं याचं मार्गदर्शन.

पुढे शारीरिक पातळीवर आसने व प्राणायाम कशी करावी आणि नुसती कवायतीसारखं न करता योगात कशी अभिप्रेत आहेत, ते सांगितलं. मनाच्या पातळीवर प्रत्याहारानं इंद्रियांना आत वळवून आलेली अंतर्मुखता आणि धारणेमध्ये आपले चित्त एकाच ठिकाणी बांधून ठेवल्यासारखे स्थिर ठेवणं ही ध्यानापर्यंत पोहचण्याची पूर्वतयारी आहे.

‘ध्यान’ ही प्रक्रिया आहे आणि ‘समाधी’ ही स्थिती आहे. समाधी ही ध्यानाची पक्वावस्था आहे. धारणा आणि ध्यान या दोन्हीमध्ये ध्यान करणारा (ध्याता) आणि ज्याचे ध्यान करत आहोत ते (ध्येय) या दोन्हीची जाणीव असते. मात्र, समाधीमध्ये ‘मी ध्यान करत आहे’, आणि ‘ज्याचे ध्यान करत आहे’ हे दोन्ही गळून जातात आणि फक्त शुद्ध जाणीव राहते.

आज हे कराच...

आजच्या दिवशी स्वतःला प्रोजेक्ट म्हणून बघा, आणखी प्रगती कशी करता येईल, मी ‘better version of myself’ कसा होईन यासाठी धडपड सुरू करूया. यासाठी खालील दशसूत्रीचा अंगीकार करा.

सकाळी लवकर उठा. जगाचा कारभार सुरू होण्याआधी काही तास मिळाले तर कल्पना करा आयुष्यात किती पावलं पुढे जाल.

शरीर कमावण्यासाठी रोजचा १ तास देणं अनिवार्य आहे.

प्राणायाम आणि ध्यानाला वेळ काहीही झालं तरी रोज काढाच.

रोज वाचन, अभ्यास, स्वाध्याय हवाच. २५ पानं वाचल्याशिवाय मी झोपणार नाही असा नियम करा. रात्री फोनवर काहीतरी पाहण्यापेक्षा बेडच्या बाजूला कायम पुस्तक ठेवा.

जेवणाच्या-झोपण्याच्या वेळा कटाक्षाने पाळा. ज्यावर शरीर अवलंबून आहे त्याच्याशी खेळ करू नका.

दीर्घकाळ बसून काम करणाऱ्यांनी आरोग्याची विशेष काळजी घ्या. दर २ तासाला उभं राहून संपूर्ण शरीर स्ट्रेच करा.

घरात शांततेचं, आनंदाचं वातावरण

टिकवण्याचा प्रयत्न करा.

छोट्याछोट्या गोष्टींमध्ये मन अडकवून मोठ्या ध्येयापासून लांब नेणाऱ्या विषयांना जास्त महत्त्व देऊ नका. रोल मॉडेल्सचे आयुष्य समोर ठेवून स्वतःला घडवा.

नोकरी, व्यवसाय, घरातील जबाबदाऱ्या, करमणूक याही पलीकडे आयुष्य आहे, त्याचा विकास करण्यासाठी रोज थोडातरी वेळ बाजूला काढा.

स्वतःपलीकडेही जग आहे हे विसरता कामा नये. त्यात इतर माणसं, विशेषतः आपल्याला सेवा पुरवणारे, आजूबाजूचे प्राणी, पक्षी, झाडं, पर्यावरण यांचा स्वार्थी वापर आपल्याकडून व्हायला नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC HSC Exam : मोठी बातमी! बारावीची ११ फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

Kolhapur School Incident: शाळेचं गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू! कोल्हापुरात घडली हृदयद्रावक घटना

Ambernath Crime: आईच बनली वैरीण! नवजात बाळाला 17 व्या मजल्यावरुन फेकले, हृदय पिळवटून टाकणारी घटना

पुन्हा चालणार सलमान - करिश्माची जादू; मोठ्या पडद्यावर पुन्हा प्रदर्शित होणार 'बीवी नंबर 1'

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निकालापूर्वीच घडामोडींना वेग; नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT