Nagpur news Take this diet during pregnancy Great for you and your babys health 
health-fitness-wellness

गरोदरपणात घ्या हा आहार; तुमच्या व बाळाच्या आरोग्यासाठी आहे उत्तम

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : गर्भधारणा झाल्यानंतर महिलांना जास्तीत जास्त खायला सांगितले जाते. गरोदर आहात म्हणून खूप खाल्ले पाहिजे असे नाही. किंबहुना संतुलित आहार घेतला पाहिजे. ज्यामुळे तुमची आणि बाळाची जास्तीची पोषणाची गरज भागेल. आहाराचा तक्ता हा भाज्या आणि फळे यांचा समावेश केल्याशिवाय पूर्ण होणार नाही.

तुम्ही तुम्हाला लागणाऱ्या प्रमाणात फळे आणि भाज्या घेतल्या नाहीत तर तुमच्या बाळाच्या पोषणाच्या गरजा पूर्ण होणार नाहीत. कॅनडामधील मुलांच्या विकासाच्या तज्ञांच्यानुसार ज्या स्त्रिया गरोदरपणात जास्त फळे खातात त्या स्त्रियांच्या बाळांचा विकास १२ महिन्यांच्या वयात जास्त चांगला होतो. फळे तुमच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. व्हिटॅमिन्स, खनिजद्रव्ये आणि तंतुमय पदार्थ या सर्व घटकांनी समृद्ध फळे खाल्ल्याने आई आणि बाळास पोषण मिळते. 

फळांमुळे बाळाला लागणारी बीटा कॅरोटीन सारखी पोषणमूल्ये मिळतात. टिश्यू आणि पेशींच्या विकासासाठी त्यांची मदत होते. तसेच प्रतिकार प्रणाली मजबूत होण्यासाठी मदत करतात. फळांमधील व्हिटॅमिन सी हे बाळाची हाडे आणि दातांच्या विकासासाठी महत्त्वाचे असते. तसेच शरीराला हे व्हिटॅमीन पुरेशा प्रमाणात मिळणे आवश्यक असते. कारण, त्यामुळे शरीरात लोह शोषले जाते आणि गरोदरपणात तो महत्त्वाचा घटक आहे.

फॉलिक ॲसिड हे पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहे. तसेच गरोदरपणात ते महत्त्वाचे आहे. त्यामुळे बाळामध्ये मेंदू आणि पाठीच्या कण्यासंबंधित जन्मदोष आढळत नाहीत. तंतुमय पदार्थांनी समृद्ध फळांमुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेशी सामना करता येतो. तसेच लोह समृद्ध फळांमुळे ॲनिमिया होत नाही.

पोटॅशिअम तुमच्या शरीरातील पेशींमध्ये द्रव्य आणि इलेकट्रोलाईट संतुलनासाठी महत्त्वाचे असते. पायांमध्ये पेटके येणे गरोदरपणात खूप सामान्य असते आणि पुरेसे पोटॅशिअम घेतल्यास त्यावर मात करता येते.


खालील फळांचा आहारात करा समावेश

केळी

सर्वांत पहिला क्रमांक केळ्यांचा लागतो. कारण, यामध्ये फोलेट, व्हिटॅमिन सी, बी ६ आणि मॅग्नेशिअम आदी पोषण मूल्यांचा समावेश असतो. फोलेटमुळे जन्मतः मज्जातंतू नलिका दोष आढळत नाही. व्हिटॅमिन बी ६ मुळे सोडिअमची पातळी नियमित होण्यास मदत होते. द्रव्यांच्या असंतुलित पातळीमुळे गर्भवतींमध्ये मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. परंतु, केळ्यामध्ये असलेल्या मॅग्नेशिअममुळे द्रव्याची पातळी संतुलित राखता येते.

किवी

किवीमध्ये व्हिटॅमिन सी, ई, ए, मॅग्नेशिअम, फॉलिक ॲसिड आणि पचनास आवश्यक असणारे तंतुमय पदार्थांचा समावेश होतो. किवीमुळे तुमचे सर्दी खोकल्यापासून सुद्धा संरक्षण होते. तसेच त्यामध्ये जास्त फॉस्फरस असल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका नसतो. तसेच लोह पोषणासाठी सुद्धा मदत होते.

पेरू

पेरूमध्ये असलेल्या पोषणमूल्यांमुळे गरोदरपणात खायलाच हवे असे हे फळ आहे. व्हिटॅमिन सी, इ, आयसो फ्लॅवोनाइड्स, कॅरोटेनॉइड्स आणि पॉलीफेनॉल्स ह्यामध्ये जास्त प्रमाणात असतात. पेरूमुळे पचन चांगले होते आणि बाळाची मज्जासंस्था मजबूत होते.

सफरचंद

गरोदरपणात खावे असे हे सर्वांत महत्त्वाचे फळ आहे. कारण, सफरचंद खाल्ल्याने तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. तसेच जसजसे तुमचे बाळ मोठे होते तसे दमा, एक्झिमा होण्याचा धोका सुद्धा कमी होतो. सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात पोषणमूल्ये असतात आणि त्यामध्ये व्हिटॅमिन ए, ई आणि डी, झिंक ह्यांचा सुद्धा समावेश असतो.

पेअर

पेअरमध्ये फॉलिक ॲसिड जास्त प्रमाणात असते. त्यामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण सुद्धा जास्त असते.

सीताफळ

सीताफळ व्हिटॅमिन ए आणि सी ने समृद्ध असतात आणि ते तुमचे डोळे, केस, त्वचा आणि तुमच्या वाढणाऱ्या बाळाच्या शरीराच्या टिश्यूसाठी आवश्यक असते. हे हंगामी फळ खाण्यास सांगितले जाते. कारण, त्यामुळे बाळाचे आकलनकौशल्य वाढते.

डाळिंब

डाळिंबामध्ये कॅल्शिअम, फोलेट, लोह, प्रथिने आणि व्हिटॅमिन सी असतात. त्यामुळे गरोदरपणात ते खाण्याचा सल्ला दिला जातो.

अवोकाडो

अवोकाडोमध्ये इतर फळांपेक्षा जास्त फोलेट असते. ते व्हिटॅमिन सी, बी आणि के चे उत्तम स्रोत आहे. त्यामध्ये तंतुमय पदार्थ, कोलीन, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आदी घटक असतात. कोलीन तुमच्या बाळाच्या मेंदूसाठी आणि मज्जातंतूंच्या विकासासाठी आवश्यक असते आणि त्याचा तुमच्या बाळाच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो.

आंबा

आंब्यामध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. यामुळे पचनास मदत होते. बद्धकोष्ठता कमी होते आणि किरकोळ संसर्गापासून तुमचा बचाव होतो. तथापि, आंबा हे हंगामी फळ आहे आणि ते वर्षभर उपलब्ध होत नाही.

चेरी

चेरी व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतात. चेरीमुळे सर्दी सारख्या संसर्गाशी सामना करणे मदत होते. चेरीमुळे नाळेला पुरेसा रक्तपुरवठा होतो.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी व्हिटॅमिन्स, तंतुमय पदार्थ, फोलेट यांनी समृद्ध असतात. स्ट्रॉबेरीमध्ये मँगेनीज आणि पोटॅशिअम असते आणि ते बाळाच्या मजबूत हाडांच्या वाढीसाठी मदत करते.

कलिंगड

कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी ६, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम असते. त्यामध्ये खनिजे, तंतुमय पदार्थ सुद्धा जास्त प्रमाणात असतात. शेवटच्या तिमाहीत तुमच्या आहारात कलिंगडाचा समावेश करायला हवा. यामुळे जळजळ, हातापायांना येणारी सूज आणि स्नायूंना येणारे पेटके सुद्धा कमी होतात.

चिकू

चिकूमध्ये खूप जास्त प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स, व्हिटॅमिन ए, कर्बोदके आणि ऊर्जा असते. त्यामुळे चक्कर येणे, मळमळ कमी होते. पचन चांगले होते.

ब्लूबेरी

ब्लूबेरी व्हिटॅमिन सी, फोलेट, कॅल्शिअम आणि तंतुमय पदार्थांनी समृद्ध असतात. ऑरगॅनिक ब्लूबेरी खरेदी करण्यास प्राधान्य द्या कारण कीटकनाशके नसतात.

मोसंबी

पोटॅशिअमचा एक रसाळ स्रोत आहे आणि त्यामुळे उच्चरक्तदाब कमी होण्यास मदत होते. तसेच व्हिटॅमिन सी चा सुद्धा हा उत्तम स्रोत आहे.

द्राक्षे

द्राक्षांमध्ये ग्लुकोज, फ्रुकटोज,फ्लोबॅफीन, गॅलिक ॲसिड, ऑक्झॅलिक ॲसिड, पेक्टिन, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, लोह, फॉलिक ॲसिड आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात जसे की बी१, बी२ आणि बी ६ इत्यादी.

हे पदार्थ खाऊ नका

पपई

पिकलेल्या किंवा न पिकलेल्या पपईमध्ये असलेल्या चिकामुळे कळा सुरू होऊन लवकर प्रसूतीची शक्यता असते. त्यामुळे गरोदरपणात पपई खाणे टाळा.

काळी द्राक्षे

पहिल्या तिमाहीत काळी द्राक्षे खाणे टाळा कारण त्यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि ते तुमच्या बाळासाठी हानिकारक होऊ शकते. तथापि, काळे मनुके हे बद्धकोष्ठतेसाठी चांगले असतात. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत बद्धकोष्ठता होते. परंतु, काळे मनुके खाताना त्याचे प्रमाण योग्य ठेवा.

अननस

अननसामध्ये ब्रोमेलिन असते आणि त्यामुळे गर्भाशयाचे मुख मऊ होते आणि लवकर प्रसूतीची शक्यता असते.

खजूर

खजुरामुळे गर्भाशयाच्या स्नायूंवर परिणाम होतो आणि शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे जास्त प्रमाणात ते खाणे टाळा.

फळे खाताना घ्या ही काळजी

  • कीटकनाशक विरहीत ऑरगॅनिक फळे आणा
  • फळे चांगली स्वच्छ धुऊन घ्या
  • ताजी फळे फ्रिज मध्ये ठेवताना कच्च्या मांसा शेजारी ठेऊ नका
  • जिथे जिवाणूंची वाढ होऊ शकते असा फळांचा भाग काढून टाका
  • बराच वेळ आधी कापून ठेवलेली फळे खाऊ नका किंवा कापल्यानंतर लगेच फळे खा

(वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

संकलन आणि संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT