Brain Hemorrhage Symptoms  esakal
health-fitness-wellness

Brain Hemorrhage Symptoms : मेंदूत रक्तस्राव होण्याची कोणती आहेत कारणे? पेशंटवर काय होतो आघात?

मेंदूत रक्तस्राव होण्याची अनेक कारणे आहेत.

सकाळ डिजिटल टीम

रक्तवाहिनी फाटल्याने किंवा रक्तवाहिनीचा फुगा फुटल्याने, तसेच शिरेमध्ये क्लॉटिंग होऊन धमन्यांमध्ये प्रेशर वाढल्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होतो.

-डॉ. श्रीविजय फडके Email ID:shreemusic@gmail.com

Brain Hemorrhage Symptoms : एखाद्या माणसाला मेंदूत रक्तस्राव (Brain Hemorrhage) झाला आहे, अशी बातमी कळली की नकळत आता याचे काही खरे नाही अशी एक भावना ऐकणाऱ्‍याच्या मनात निर्माण होते. ब्रेन हॅमरेजचे निदान होताच क्षणी घरच्यांच्या मनात रूग्णाच्या पुढील आयुष्याचा चित्रपट सरकन उभा राहतो. मग पेशंटचे काढलेले केस, बेडवर पडलेला, काहीही न बोलणारा, कोणालाही न ओळखणारा, सगळीकडून नळ्या घातलेला अशा रूग्णाचे चित्र सर्वजण पाहत असतात. मात्र प्रत्यक्षात खरचं असे आहे का, जाणून घेऊ या आजच्या लेखात...

मेंदूत रक्तस्राव होण्याची अनेक कारणे आहेत. सगळ्यात महत्त्वाच्या कारणांमध्ये मेंदूला झालेली इजा, वाढलेला रक्तदाब, मेंदूच्या रक्तवाहिन्यांना आलेले फुगे व मेंदूच्या शिरेमध्ये झालेले घट्ट रक्त (Clots) यांचा समावेश होतो. सर्वसाधारणपणे मेंदूमध्ये होणारा रक्तस्राव हा अत्यंत वेगाने व क्षणार्धात होत असतो. रक्तवाहिनी फाटल्याने किंवा रक्तवाहिनीचा फुगा फुटल्याने, तसेच शिरेमध्ये क्लॉटिंग होऊन धमन्यांमध्ये प्रेशर वाढल्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. अपघातामध्ये (Accident) तर डोक्यावरती होणारा आघात हा काही मिली सेकेंदाचा असतो.

आत्ता बोलत असलेला, चालत असलेला माणूसही क्षणार्धात बेशुद्ध पडणे, फिट येणे, प्रचंड डोके दुखणे, अचानक पॅरालिसिस येणे, खूप उलट्या होणे अशी घाबरवून टाकणारी लक्षणे दाखवतो. ही क्षणार्धात होणारी गोष्टही अत्यंत गंभीर असल्यामुळे त्याचे होणारे दुष्परिणाम हे खूप काळापर्यंत पेशंटला (Patient) अत्यंत कठिण परिस्थितीला सामोर जाण्यास भाग पाडतात. बऱ्याचदा कोणतीही पूर्वकल्पना अथवा लक्षणे दिसत नाहीत. तसेच प्रत्येक वेळी वरील सर्व लक्षणे दिसतातच असंही नाही. काही वेळा रक्तस्राव फार प्रमाणात नसल्यास ही लक्षणे थोड्या काळानंतरही दिसायला लागू शकतात. सर्वसाधारणपणे टक्केवारीमध्ये विचार केल्यास ५० ते ६० टक्के पेशंटमध्ये रक्तस्राव डोक्याला आघात झाल्यामुळे होत असतात.

२५ ते ३० टक्के हे रूग्णाचा रक्तदाब वाढल्याने होत असतात. बाकी दहा टक्क्यांमध्ये मेंदूच्या रक्तवाहिन्यांचे आजार व इतर कारणांमुळे रक्तस्त्राव होतो. मेंदू हा कवटी सारख्या टणक व प्रसरण पावू न शकणाऱ्‍या आवरणात जखडून ठेवलेला असल्याने व कवटी आणि मेंदूच्या मधील पोकळी ही खूप कमी प्रमाणात असल्याने, कवटीच्या आतमध्ये झालेला कोणताही रक्तस्राव अगदी कमी प्रमाणात जरी असेल तरी मेंदूवरती प्रचंड विपरीत परिणाम करून जातो. रक्तस्राव जेवढा मोठा तेवढा रूग्णाच्या जीवाला धोका जास्त. बऱ्याचदा रक्तस्राव होऊन प्रथमोपचार मिळून योग्य त्या डॉक्टरकडे म्हणजेच न्युरोलॉजिस्ट किंवा न्युरोसर्जनकडे पोहचेपर्यंत रूग्ण अत्यंत गंभीर अवस्थेला पोहोचलेला असतो. परंतु तरीही लवकरात लवकर उपचार झाल्यास अशा रूग्णामध्ये चांगले रिझल्ट्स मिळू शकतात.

साधारणपणे अशा रूग्णामध्ये उपचार हे अतिदक्षता (आयसीयू) विभागात दाखल करूनच करावे लागतात. कारण वाढलेले प्रेशर, मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने शरीराच्या सर्व अवयवांवरती मेंदूचा सुटलेला ताबा व पेशंटची क्षणाक्षाणला बदलणारी परिस्थिती यावर बारील लक्ष ठेवणे खूप गरजेचे असते. रक्तस्राव कमी करण्यासाठी, सूज नियंत्रणात ठेवण्यासाठी फिट न येण्यासाठी, मेंदूला इजा कमीत कमी पोचावी यासाठी देण्यात येणारी अशी अनेक प्रकारची इंजेक्शन पेशंटच्या सर्व अवयवांचा काळजीपूर्वक विचार करून, अत्यंत सावधानीने द्यावी लागतात. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतरचे ७२ तास हे अत्यंत काळजीची असतात. पेशंटच्या शरीराचा प्रतिसाद , प्रकृतीत होणारे चढ-उतार हे सर्व नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे असते.

प्रत्येक रूग्णामध्ये शस्त्रक्रिया लागतेच असे नाही, परंतु अशा रूग्णामध्ये शस्त्रक्रिया लागेल असे गृहीत धरून शस्त्रक्रियेची सर्व तयारी पेशंट निदान आयसीयुमधून बाहेर येईपर्यंत तरी ठेवावी लागते. कोणाला शस्त्रक्रिया लागेल व कोणाला नाही हे छातीठोकपणे सांगणे अवघड असते. सिटीस्कॅन केल्याशिवाय बऱ्याचदा निर्णय घेणे शक्य होत नाही. त्यामुळे ब्रेन हॅमरेजच्या रूग्णावरील उपचार या हॉस्पिटलमध्ये २४ तास सिटीस्कॅन व न्युरोसर्जन उपलब्ध असेल अशाच ठिकाणी केलेले उत्तम. मेंदूतील रक्तस्राव जवळपास ३० टक्के रूग्णामध्ये पूर्ण पॅरालिसिसला, कोमाला व मृत्युला कारणीभूत ठरतो.

मात्र बाकी ७० टक्के रूग्णाना उपचारांनी व लागल्यास शस्त्रक्रियेने पॅरालेसिस पासून व जीवाच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवता येते. बरेचदा अतिशय लांब चालणारी व कष्टप्रद ट्रिटमेंट घ्यावी लागते. काही पेशंट रुग्णशय्येला खिळूनही राहू शकतात. हॉस्पिटल उपचारांप्रमाणेच पेशंटला फिजिओथेरपी व व्यायाम हेही अतिशय नित्य नियमाने करावे लागतात तरच चांगले रिझल्ट्स मिळतात. घरच्या लोकांचा आधार , उत्तम आहार, पूर्ण विश्रांती, वेळेवरती औषधे घेणे व पुर्नवसन विशेषतज्ञांचा सल्ला घेणे हेही तितकेच महत्त्वाचे ठरते. पुर्नवसनामध्ये रक्तदाब नियंत्रणात ठेवणे व मधुमेह नियंत्रणात ठेवणे हेही अत्यंत महत्त्वाचे असते.

(डॉ. चिरायु हॉस्पिटल येथे मेंदूशल्यविशारद (Nurosurgeon) तज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT