Headache esakal
health-fitness-wellness

Health News : डोकेदुखीचे तब्बल 150 प्रकार असू शकतात; 17 कोटी लोकं या आजाराने त्रस्त

डोकेदुखी (Headache) ही अशी एक समस्या आहे याचा सामना जवळजवळ प्रत्येकाला करावा लागत आहे.

सकाळ डिजिटल टीम

बऱ्याचवेळा डोकेदुखी जीवघेणी नसली तरी जगभर १७ कोटी लोकं या आजाराने ग्रस्त आहेत.

-डॉ. सचिन यादव, मेंदूविकार तज्ज्ञ (sachinyadav१९७१@gmail.com)

डोकेदुखी (Headache) ही अशी एक समस्या आहे याचा सामना जवळजवळ प्रत्येकाला करावा लागत आहे. डोके दुखू लागल्यास आपण सहसा घरगुती उपाय करतो. दुखणे जास्त झाले तरच औषधे घेतो आणि क्वचितच वैद्यकीय सल्ला घेतो. दुखणं थांबलं की, आपण समस्येकडे दुर्लक्ष करतो; पण वारंवार ही समस्या उद्भवली तर हे डोकेदुखीच्या आजाराचे आणि क्वचितप्रसंगी गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.

त्यामुळे डोकेदुखीची नेमकी कारणं काय आहेत हे माहिती असणे आवश्यक आहे. खरं सांगायचे तर डोकेदुखी हा आजार नसून एक लक्षण आहे. हा त्रास इतका सामान्य आहे की, सातपैकी एकजण या डोकेदुखीने त्रस्त असतो असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्युरॉलॉजी आणि इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ न्युरॉलॉजी यांच्या संयोजनाने जनजागृती करण्यासाठी जुलै महिन्याच्या तिसऱ्‍या आठवड्यात जागतिक मायग्रेन सप्ताह (डोकेदुखी) पाळला जातो. या पार्श्‍वभूमीवर समोर आलेली आकडेवारी थक्क करणारी आहे. गेल्या काही वर्षात ८ ते १० टक्के लोकांना डोकेदुखीने ग्रासलेले असते. बऱ्याचवेळा डोकेदुखी जीवघेणी नसली तरी जगभर १७ कोटी लोकं या आजाराने ग्रस्त आहेत. डोकेदुखीचे १५० प्रकार असू शकतात; परंतु त्यातली प्रमुख़ कारणे कोणती हे पाहणे देखील महत्वाचे आहे.

डोकेदुखी प्रामुख्याने २ प्रकारच्या असतात

प्राथमिक डोकेदुखीमध्ये डोकेदुखी ही मुख्य समस्या असते. यामध्ये ताणतणावामुळे होणारी डोकेदुखी ही सर्वात सामान्य आहे तर मायग्रेन (अर्धशिशी) आणि त्यासारख्या डोकेदुखी व ट्रायजेमिनल ऑटिनॉमिक क्लस्टर डोकेदुखी १५-२० टक्के लोकांमध्ये दिसते. यामध्ये मायग्रेन डोकेदुखी १५ टक्के लोकांमध्ये दिसून येते. दुय्यम डोकेदुखी इतर कारणांमुळे होते. उदा. डोक्याला मार लागणे, मेंदूवर, रक्तस्राव, मेंदूतील गाठी, कोणत्याही कारणाने मेंदूला सूज आल्यास इ. बऱ्‍याचवेळा डोकेदुखी मेंदू व कवटी सोडून इतर कारणांमुळे पण होऊ शकते.

सर्दी होणे (यामुळे सायनसमध्ये जंतूसंसर्ग होतो), डोळ्याचे नंबर वाढणे, दातांचे, जबड्यांचे आजार इ. ही काही कारणे आहेत. अनेकदा पित्त झाल्यामुळे डोकेदुखी आहे, असे भासवले जाते; पण असे अनेक अभ्यासात बघितले गेले आहे की डोकेदुखीची कारणे ही इकडेतिकडे न शोधता डोक्यातच शोधली पाहिजेत. त्यामुळे वेळ वाचून उपचार लवकर होण्यास मदत मिळेल व पुढची गुंतागुंत व गंभीर परिस्थिती टळेल.

प्राथमिक डोकेदुखीची लक्षणे

मायग्रेन या आजारात डोक्याच्या एका किंवा दोन्ही बाजूस मध्यम ते तीव्र वेदना होतात. त्या आधी मळमळणे, कमी किंवा भूरकट दिसणे, मूड बदलणे, उलट्या होणे इ. होऊ शकते. काही तास ते २-३ दिवस सतत दुखू शकते. सहसा झोपून उठल्यावर बरं वाटते. ही लक्षणे काही महिन्यातून एकदा किंवा आठवड्यात २ ते ३ वेळा पण होऊ शकतात. कुठल्याही वयोगटात हा आजार होऊ शकतो. कधीतरी हा आजार अनुवंशिक पण असतो. सामान्यत: मायग्रेन गंभीर नसतो; पण क्वचितप्रसंगी मायग्रेनबरोबर आकडी येणे व पॅरालिसिससारखी गंभीर लक्षणे पण दिसतात. तणावाची डोकेदुखी ही सर्वात सामान्य डोकेदुखी आहे. गंभीर नसली तरी त्रासदायक आहे

कपाळापासून ते मान व मानेच्या वरच्या भागात तर पट्टी घट्ट बांधल्यासारखं दुखतं, रोज दुखतं. बऱ्याचवेळा तणावाच्या डोकेदुखीबरोबर मानसिक आजारपण असतात, जसे चिंता, नैराश्य, परिस्थितीला जुळवून न घेण्याची वृत्ती इ. अशा रुग्णांना अनेक महिने किंवा वर्ष डोके सतत दुखते. ही डोकेदुखी उपचारासाठी खूप अवघड असते. ट्रायजेमिनल ऑटॉनॉमिक न्युरॉल्जिया ही डोकेदुखीची कारणे दुर्मिळ आहेत. या आजारात डोक्याची कायम एकच बाजू काही मिनिटे किंवा कायमची दुखते, वेदना अतिशय तीव्र असतात. यामुळे रुग्ण खूप अस्वस्थ होतो. असे कित्येक दिवस सतत दुखू शकते.

या डोकेदुखीमध्ये त्या बाजूच्या डोळ्यामधून पाणी येणे, लाल होणे, डोळा बारीक होणे असे होऊ शकते. अनेक प्रकारच्या डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी अनेक नवनवीन औषधे उपलब्ध आहेत; पण त्यासाठी अचूक निदान होणे महत्वाचे आहे. या सर्व प्रकारच्या डोकेदुखी गंभीर नसतात; पण त्रासदायक असतात. पहिलीच डोकेदुखी -अचानक व प्रचंड दुखणे (मेंदूतील रक्तस्राव). डोकेदुखीबरोबर लकवा, आकडी, दृष्टी कमी होणे ही लक्षणे किंवा ताप असेल तर. थोडीथोडी असलेली डोकेदुखी अधिक तीव्र झाल्यास. वृद्ध आणि बाळंतपणातली डोकेदुख. रक्तदाब व मधुमेह अनियंत्रित असल्यावर होणारी डोकेदुखी. वरील लक्षणे असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला व तपासण्या करणे आवश्यक आहे. वरील धोक्याची सूचना असल्यास त्वरित तपासण्या करायला हव्यात. त्यामध्ये रक्त तपासण्याबरोबर रक्तदाब तपासणे, डोळे व सायनसचे आजार तपासणे पण महत्वाचे आहे.

सर्वात महत्वाच्या तपासण्यांमध्ये सीटीस्कॅन व एमआरआय स्कॅन आहेत. या सर्व तपासण्यांमध्ये दुय्यम प्रकारच्या डोकेदुखी समजू शकतात. त्यामध्ये मेंदूतील रक्तस्राव, लकवा, ट्युमर, सूज, मार लागलेले भाग, विविध रक्तवाहिन्यांचे आजार समजू शकतात. निदान करण्यासाठी एमआरआय स्कॅनद्वारे मोठ्या प्रमाणात निदान होऊ शकते. त्यामध्ये एमआरए आणि एमआरव्ही म्हणजे मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या चाचण्यापण होऊ शकतात. दुय्यम प्रकारच्या डोकेदुखीमध्ये त्या त्या आजाराप्रमाणे उपचार केले जातात. प्राथमिक डोकेदुखीसाठी अनेक प्रकारची जुनी नवीन औषधे वैद्यकीय सल्ल्यानुसारच घेतली पाहिजेत. मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन वेदनाशामक औषधे घेऊन तात्पुरते उपचार करू नयेत. वरती सांगितल्याप्रमाणे गंभीर किंवा धोक्याची घंटा असलेली लक्षणे असतील तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरेल.

(डॉ. चिरायू हॉस्पिटल येथे मेंदूविकार तज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT