मुलांमध्ये शैक्षणिक अक्षमता टाळण्यासाठी पालकांनी मुलांसोबत बोलावे, पुस्तके वाचावीत, गोष्टी सांगाव्यात, मुलांना गोष्टी बनवण्यास, वाढवण्यास प्रोत्साहन द्यावे.
-श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण sajagclinic@gmail.com
शैक्षणिक अक्षमता किंवा लर्निंग डीसॉर्डर एक मानसिक स्थिती आहे. यामध्ये ठराविक प्रकारची माहिती प्राप्त करण्यास, समजून घेण्यास व वापर करण्यास अक्षमता असते. याचा परिणाम मुलाच्या शिक्षणावर, दैनंदिन जीवनावर तसेच खेळण्या वावरण्यावरही होतो. सर्वसाधारण बघता १० टक्के मुलांमध्ये अशाप्रकारची शैक्षणिक अक्षमता किंवा लर्निंग डीसॉर्डर (Learning Disorder) आढळते.
काही वर्षांपूर्वी तारे जमीपे नावाचा सिनेमा आला होता. त्यातील पालक आपल्या मुलाला अभ्यास करत नाही म्हणून बोर्डिंगमध्ये टाक. वास्तविक मुलगा हुशार असतो; पण त्याला शैक्षणिक (Educational) अक्षमता डिस्लेक्सिया असते. काही प्रमाणात सारखा असला तरी खूप वेगळ्या प्रकारे वाढत असतो. वाडीच्या टप्प्यांमध्ये काही कौशल्य शिकण्यामध्ये बाधा निर्माण होऊ शकते, ज्यामुळे अक्षमता निर्माण होतात चित्र व रंगसंगतीचे अफलातून ज्ञान असलेला ईशान अक्षर व अंक ओळखमध्ये मात्र मागे पडताना दिसतो तसेच खेळत असताना धांद्रटपणामुळे त्याला त्याचे मित्र खेळायला घेत नाहीत.
या सर्वांमुळे तो बाबांच्या रागाचा व आईच्या काळजीचा विषय ठरतो. ईशानचा आत्मविश्वास ढासळतो व तो नैराश्यात जातो. पुढे चांगला शिक्षक त्याला लाभतो व तो त्याला विविध संवेदना वापरून शिकण्यास मदत करतो. हळूहळू ईशान इतर मुलांच्या बरोबरीला यायला लागतो. मेंदूच्या (Brain) सुरवातीच्या वाढीच्या टप्प्यांमध्ये मज्जासंस्थेत काही दोष निर्माण झाल्यामुळे लर्निंग डीसॉर्डर किंवा शैक्षणिक अक्षमता निर्माण होते. अनुवंशिकता ही काही प्रमाणात दिसून येते. शैक्षणिक अक्षमता ही बौद्धिक अक्षमता नव्हे. या मुलांचा बुद्ध्यांक सर्वसाधारण असतो तसेच हा काही शारीरिक आजार नव्हे. तब्येत पाहून याची लक्षणे ओळखता येत नाहीत.
या स्थितीची ओळख बऱ्याचदा मूल शाळेत जायला लागल्यावर, नवीन गोष्टी शिकू लागल्यावर दिसून येते. इतर कारणे म्हणजे भाषाज्ञान अवगत होण्यात श्रवणदोष, दृष्टीदोष आकार आणि स्वरामध्ये गोंधळ होणे, विविध स्वर जोडण्यामध्ये गोंधळ होणे, एकसारख्या दिसणाऱ्या अक्षरांमध्ये गोंधळ होणे तसेच मुलाला हवे तसे प्रोत्साहन न मिळणे. मुलांमध्ये आणि पालकांमध्ये संवाद नसला तर मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होत नाही. त्याच प्रमाणात शिक्षक शिक्षणाची गोडी लावण्यात असमर्थ ठरल्यामुळे शैक्षणिक अक्षमतेचे साधारणतः ३ प्रकार असतात -वाचनदोष किंवा डिस्लेक्सिया, लिखाण दोष किंवा डिसग्राफिया, गणितातील दोष किंवा डिसकॅल्कुलिया.
अशा मुलांना दिशा निर्देश समजून घेणे, अक्षरओळख व आकडेमोड समजण्यास व लक्षात ठेवणे जड जाते तसेच शब्द व मजकूर लक्षात ठेवणे, वाक्य तयार करणे जड जाते. काही प्रमाणात स्वतःच्या बुटाची नाडी बांधणे, शर्टची बटणे लावणे ज्या गोष्टींमध्ये एकाग्रता लागते त्या गोष्टी अशा मुलांना जड जातात. या स्थितीची माहिती नसल्यामुळे, पालकांना लक्षणे न कळल्यामुळे पालक व शिक्षकांना वाटते की, मूल मुद्दाम आळस करते आहे, खोड्या करत आहे, अभ्यासाकडे लक्ष देत नाही आहे. त्यामुळे पालक व शिक्षक मुलांना रागवतात, मारतात. अशामुळे मुलांचा आत्मविश्वास ढासळतो. ते चेष्टचे विषय बनतात, एकटे पडत जातात. मुलांमध्ये शैक्षणिक अक्षमता टाळण्यासाठी पालकांनी मुलांसोबत बोलावे, पुस्तके वाचावीत, गोष्टी सांगाव्यात, मुलांना गोष्टी बनवण्यास, वाढवण्यास प्रोत्साहन द्यावे. चित्र, आकार रंग अशी रोचक पुस्तके, साहित्य हाताळण्यास द्यावे.
मुलांसोबत विविध खेळ खेळावेत, रंगकाम करावे म्हणजे पालकांना आपल्या पाल्याची गती आणी आवड कळेल. ते कुठे अडते ते कळेल. जर वयानुरूप त्याची प्रगती होत नाही असे वाटले तर डॉक्टरांशी चर्चा करावी. मानसोपचार तज्ज्ञाकडून, रेमेडियल एज्युकेटर, ऑक्युपेशनल थेरेपिस्टकडून त्याची चाचणी करून घ्यावी व त्याला कसे शिकवावे, हे पालकांनी समजून घ्यावे तसेच शाळेतील शिक्षकांशी संवाद साधून मुलाला चिडवण्यात येणार नाही, मुलाला वाचनासाठी लिखाणासाठी मदत मिळेल, असे पाहावे. धांदरट मुलांसाठी खेळ हे उत्तम थेरपी ठरते. मुलांसोबत पालकांनी चेंडूने खेळावे, धावणे, उड्या मारणे, झोका घेणे अशा गोष्टी केल्यामुळे मुलांचा तोल सावरतो व स्नायूंची पकड उत्तम होते ज्याचा पुढे लिखाणामध्ये उपयोग होतो.
वास्तविक पाच ते सहा वर्षापर्यंत फक्त तोंडी अभ्यास घेण्यात यावा कारण, तोपर्यंत मुलांचे हाताचे छोटे स्नायू पूर्णपणे विकसित झालेले नसतात. अतिलिखाणामुळे मुले कंटाळतात व अभ्यासाचा दुस्वास करू लागतात. लिखाणदोष असणाऱ्या मुलांना जास्त वेळ मिळावा, त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल, हे शिक्षकांनी बघावे. शैक्षणिक अक्षमता ही एक मानसिक स्थिती आहे. त्यामुळे त्याला काही ठराविक उपचार नाहीत. जेव्हा पालकांच्या लक्षात येते की, मुलाला वारंवार शिकवून समजत नाही तेव्हा त्वरित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. योग्य तंत्राने व मार्गदर्शनाने वाचनकौशल्य, लेखनकौशल्य व गणितकौशल्य सुधारू शकते. मुलांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी त्यांना ज्या कलांमध्ये, खेळांमध्ये गती आहे जसे चित्रकला, गाणी, वाद्य वाजवणे, त्यास प्रोत्साहन द्यावे.
पालक व शिक्षकांनी संयम दाखवावा व मुलांना इतर मुलांप्रमाणे प्रोत्साहन द्यावे व त्यांचा आत्मविश्वास वाढवावा. शैक्षणिक अक्षमतेमध्ये मुलांचा दोष नाही, हे समजून मुलाला जर आत्मविश्वास दिला तर त्याच्यामध्ये दडलेला अल्बर्ट आईन्स्टाईनही घडू शकतो, हे लक्षात घ्यावे. अल्बर्ट आईन्स्टाईनला डिस्लेक्सिया होता ज्यामुळे त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले होते; परंतु त्याच्या आईने त्याच्यावर विश्वास दाखवल्यामुळे, त्याच्यावर योग्य मेहनत घेतल्यामुळे तो एक वैज्ञानिक म्हणून नावावरूपास आला. आपल्या मुलांमधलं वेगळेपण ओळखूया, त्याला मुभा देऊया, स्वतंत्र अवकाश देऊया त्याला त्याच्या गतीने वाढण्यास, फुलण्यास, बहरण्यास...
(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.