लहान मुलांमध्ये होणाऱ्या बेंबीच्या हर्नियामध्ये नाभीच्या ठिकाणी रडल्यामुळे सूज येते. प्रौढांमध्ये नाभीच्या ठिकाणी सूज दिसते. ही सूज खोकताना किंवा पोट ताणले गेल्याने वाढते. कधी कधी वेदनासुद्धा होतात.
Hernia Disease Symptoms : हर्निया हा आजार शरीरातील एखादं अंग अधिक वाढल्याने होतो म्हणजेच शरीराचा एखादा भाग जर सामन्यापेक्षा अधिक वाढला तर तो हर्निया आहे. हा शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो; पण प्रामुख्याने पोटात होणारा हर्निया बघितला जातो. हर्निया पुरुष, स्त्रिया तसेच लहान मुलांनासुद्धा होऊ शकतो. सामान्यत: लठठ व्यक्तींमध्ये हा आजार आढळतो. हर्निया होतो तेव्हा शरीरातील ऊती, इंद्रिय किंवा इंद्रियाचा भाग शरीर पोकळीतून बाहेर येण्याच्या स्थितीत असतो.
साधारणत: हे पोटाच्या (Stomach) भागावर जास्त आढळून येते. हे जन्मजात किंवा नंतर उद्भवलेले असू शकते. बाहेर आलेल्या भागाला उदराच्या भिंतीमध्ये शिरून त्या भागाला पीळ बसू शकतो. पसरलेल्या भागाला हर्निया सॅक म्हणतात आणि त्यात आतडे किंवा पोटाच्या उदराच्या किंवा बेंबीच्या चरबीच्या बाहेरील कडा समाविष्ट असतात. या विषयी आज अधिक जाणून घेऊ.
सर्वसाधारणपणे हर्नियाचे पाच प्रकार आढळतात. १. इंग्वायनल हर्निया २. फेमोरल हर्निया ३. अंबेलिकल हर्निया ४. व्हेंट्रल हर्निया ५. हायटस हर्निया. इंग्वायनल व फेमोरल हर्निया हे दोन्ही प्रकार जांघेमध्ये आढळतात. अंबेलिकल हर्निया हा नाभीसंबंधित असतो. व्हेंट्रल हर्निया हे शस्त्रक्रियेनंतर झालेल्या चिरेमधून किंवा टाक्यांच्या खुणांमधून झालेल्या हर्नियाला म्हणतात. हायटस हर्निया हा प्रकार मुख्यत: पचनसंस्थेचा (Digestive System) विकार आहे. इतर हर्नियाप्रमाणे यामध्ये कोणताही भाग वाढल्याचा दिसून येत नाही. अन्ननलिका आणि जठर या मधले जोड कमकुवत झाल्यामुळे अन्न आणि पित्त उलट फिरतं व म्हणून रुग्णांना पचनाचा त्रास होतो.
हर्नियाची लक्षणे : हर्नियाची चिन्ह व लक्षणे भिन्न असतात जसे की, रुग्णामध्ये उभं राहिल्यावर खोकल्यावर किंवा पोटावर ताण आल्यावर जांघेमध्ये किंवा नाभीमध्ये फुगा येतो; परंतु वेदना नसतात. आडवे झोपल्यानंतर हा फुगा नाहीसा होतो यामुळे रुग्ण डॉक्टरकडे दाखवायला उशीर करतात. काही रुग्णांमध्ये वेदना, जळजळीची जाणीव, दाब विशेषकरून तीव्र शारीरिक हालचाली करतेवेळी ताणल्याच्या संवेदनांचा अनुभव होतो. पोटाच्या ताणलेल्या स्नायूंच्या वेदनांना हर्निया रोग कारणीभूत असतो. या रुग्णांमध्ये आतड्याला किंवा पोटातल्या चरबीला फास बसतो. त्यांना खूप तीव्र वेदना होतात, उलट्या होतात व त्यांची तब्येत खालावते. अशा रुग्णाला त्वरित ऑपरेशनची गरज असते.
लहान मुलांमध्ये होणाऱ्या बेंबीच्या हर्नियामध्ये नाभीच्या ठिकाणी रडल्यामुळे सूज येते. प्रौढांमध्ये नाभीच्या ठिकाणी सूज दिसते. ही सूज खोकताना किंवा पोट ताणले गेल्याने वाढते. कधी कधी वेदनासुद्धा होतात. हायटस हर्नियामध्ये रुग्णाला छातीमध्ये जळजळ होणे, मळमळणे, दुखणे, दाब वाटणे, खाल्लेलं अन्न वर येणे व उलट्या होणे, अशी सगळी लक्षणं दिसून येतात. कधी कधी छातीत दुखणं एवढं तीव्र असते की, हृदयविकार असल्याचा भास होतो. व्हेंट्रल हर्नियामध्ये टाक्यांच्या ठिकाणी स्राव येणे किंवा सूज येणे, दुखणे ही लक्षणे दिसून येतात.
ट्रीटमेंट ः हर्नियाच्या उपचारांमध्ये शस्त्रक्रिया हा एक मुख्य उपचार आहे. यात हर्नियातील संचित पोटात टाकले जाते किंवा पूर्णपणे काढले जाते व स्नायूमधील पोकळी ही एक विशिष्ट जाळी वापरून बंद केली जाते व कमजोर स्नायूंना आधार दिला जातो. शस्त्रक्रिया दोनप्रकारे केली जाऊ शकते, एक म्हणजे टाक्याची खुल्या पद्धतीने आणि दुसरी म्हणजे लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीने. पेशंटच्या प्रकृती व हर्नियामधील कॉम्प्लिकेशन्सचा आढावा घेऊन डॉक्टर कोणती पद्धत अवलंबायची हे ठरवतात. लहान मुलांमधील हर्नियाच्या शस्त्रक्रियेमध्ये जाळी बसवली जात नाही व स्नायूंना बळकटी देण्यासाठी टाके घातले जातात.
हायटस हर्नियामध्ये औषधोपचार हा प्रथम पर्याय निवडला जातो. पित्तनाशक औषधे त्याचबरोबर प्रोकायनेटिक औषधे यांनी रुग्णाला आराम मिळतो. अनेक वर्ष औषधोपचार करून पण या रुग्णांना आराम मिळत नाही, अशांमध्ये शस्त्रक्रिया हा पर्याय ठेवला जातो.
जीवनशैली व्यवस्थापन ः कोणतीही वस्तू योग्य पद्धतीने कशी उचलावी यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच वजन उचला. आपले वजन वाढू देऊ नका. वजन वाढल्यास समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. जर वजन जास्त असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा. तज्ञांकडून योग्य आहार प्लॅन करून घ्या. अपचन तुमच्या वेदना, त्रास आणि आजार वाढू शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये पचनक्रिया बिघडू देऊ नका. आहारात फायबरचं प्रमाण अधिक वाढवा.
सोबतच हलक्या पदार्थांचे सेवन करा. जेवण झाल्यावर आडवे होणे व भारी शारीरिक क्रिया टाळाव्यात. तिखट, आंबट पदार्थ, धूम्रपान टाळावे. हर्नियापासून बचाव करण्यासाठी मलाशयाची योग्य प्रकारे स्वच्छता करा, जाडेपणा आणि वजन वाढू देऊ नका. प्रोटीन आणि व्हिटामिन सी सप्लिमेंटचे सेवन करा, पोटाच्या मासपेशींवर अधिक दबाव टाकणारी कामे करू नयेत, पोटाची व अपचनाची समस्या असेल तर वेळीच उपाय करा, धूम्रपान व मद्यपान टाळावे.
(डॉ. चिरायु हॉस्पिटल येथे शल्यचिकित्सक आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.