चांगले दुधाचे दात हे भविष्यात येणाऱ्या कायमच्या दातांना फायद्याचे ठरतात. प्रत्येक दुधाचा दात पडण्याचे एक योग्य वय असते.
-डॉ. नेहा पाटील, दंतविकार तज्ज्ञ व हिरडी शल्यचिकित्सक
nehathakurrr@gmail.com
लहान मुलांच्या दातांची काळजी घेणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. वयाच्या साधारण सहाव्या महिन्यानंतर बाळाला दुधाचे दात (Milk Teeth) यायला सुरवात होते. अडीच ते तीन वर्षांचे मूल होईपर्यंत तोंडामध्ये दुधाचे दात पूर्णपणे येतात. त्यानंतर वयाच्या सहा किंवा सातव्या वर्षांनंतर दुधाचे दात पडू लागतात व त्या जागी पक्के दात यायला सुरवात होते. वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत सगळे दुधाचे दात पडून त्याची जागा पक्के दात घेतात म्हणजेच साधारण मूल १२ वर्षांचे होईपर्यंत तोंडामध्ये दुधाचे दात असतात. काही पालक दुधाच्या दातांना फारसे महत्त्व देत नाहीत. बघायला गेलं तर दुधाचे दात तितकेच महत्त्वाचे असतात जितके कायमस्वरूपी दात महत्त्वाचे असतात.
लहान मुलांच्या दातांची नीट काळजी घेतली नाही की, त्यामध्ये लवकर कीड लागते. परिणामी, दात दुखणे, दाताला सूज येणे असे दातांचे आजार चालू होतात. जेवताना दात वारंवार दुखणे यामुळे मुलं व्यवस्थित खाणे टाळतात. त्याचा परिणाम मुलांच्या वाढीवर तसेच मुलांच्या विकासावर होतो. लहान मुलांचे संगोपन करताना पालक प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींची विशिष्ट काळजी घेतात. मग ते लहान मुलांच्या आवडीचे खाद्यपदार्थ असो वा खेळणी; पण हे करत असताना आपण मुलांच्या मौखिक आरोग्याचीही तेवढीच काळजी घेतो का? त्यासाठीच लहान मुलांच्या दातांना कीड लागण्याची कारणे, त्यावरील उपाय याविषयी समजून घेऊया.
दुधाच्या दातांना अगदी सहज कीड लागते त्याची कारणे समजून घेतली तर आपण कीड लागण्याचे प्रमाण कमी करू शकतो. ही कारणे खालीलप्रमाणे नमूद केली आहेत.
1) योग्य टूथब्रश व टूथपेस्ट न वापरणे ः अमेरिकन डेंटल असोसिएशनच्या मते, बाळाच्या जन्मानंतर पालकांनी मुलाच्या दातांची स्वच्छता नियमित चालू केली पाहिजे. बाळाच्या हिरड्या स्वच्छ करण्यासाठी सुती कापडाचा वापर करू शकता. मूल सहा महिन्याचे झाले की, दात बाहेर येण्यास सुरवात होते. त्या वेळेस बेबीफिंगर ब्रश वापरून मुलांचे दात स्वच्छ केले पाहिजे. मूल साधारण दीड वर्षाचे झाले की, लहान आकाराचा ब्रश वापरून दात स्वच्छ केले पाहिजे. बऱ्याच वेळेला पालक संभ्रमात असतात की, मुलांसाठी कोणती टूथपेस्ट वापरली पाहिजे. सर्वात प्रथम म्हणजे लहान मुलांसाठी वेगळी टूथपेस्ट उपलब्ध आहे त्याचा वापर केला पाहिजे. मुलांच्या पसंतीप्रमाणे वेगवेगळ्या फ्लेवरचे टूथपेस्ट उपलब्ध असतात. त्यांच्या प्राधान्याप्रमाणे टूथपेस्ट वापरली तर मुलांची दात स्वच्छ करण्याची गोडीसुद्धा वाढते. बऱ्याच वेळेला पालक मुलांसाठी तीच टूथपेस्ट वापरतात जी स्वतःसाठी वापरतात जे अत्यंत चुकीचे आहे.
2) व्यवस्थित ब्रश न करणे ः बऱ्याच वेळेला पालकांच्या दबावामुळे मुलं वरच्यावर ब्रश करतात त्यामुळे दात नीट स्वच्छ होत नाहीत. परिणामी, दातांना कीड लागते. लहान मुलांचे दात हे ब्रश गोलाकार पद्धतीने फिरवून स्वच्छ केले पाहिजे व याकडे लक्ष दिले पाहिजे की, दाताचा प्रत्येक भाग स्वच्छ होईल. जर मुलांकडून व्यवस्थित ब्रश होत नसेल तर पालकांनी मुलांचे दात घासले पाहिजे. जर मुलांना त्यांच्या आवडीच्या कार्टूनचे चित्र असलेला टूथब्रश, चांगल्या फ्लेवरची टूथपेस्ट मिळाली व त्यांना दातांची काळजी का घ्यायची हे थोडक्यात सांगितलं तर मुले नक्कीच लक्ष देऊन ब्रश करतील.
3) किती वेळा ब्रश केला पाहिजे : दिवसातून दोनवेळेला म्हणजेच सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी नित्यनेमाने ब्रश झाला पाहिजे.
4) जास्त गोड पदार्थ खाणे : आजकाल लहान मुलांमध्ये चॉकलेट, केक तसेच चिकट पदार्थ जसे की चीज, मेयोनीज असे खाण्याचे प्रमाण फार वाढत आहेत. गोड व चिकट पदार्थांचे कण दातांवर चिटकून राहतात.
आतापर्यंत जे काही उपाय बघितले ते दातांना कीड लागू नये किंवा दातांची काळजी कशी घ्यावी यासाठी पाहिले; पण दातांना कीड लागली तर काय करावे?
चांगले दुधाचे दात हे भविष्यात येणाऱ्या कायमच्या दातांना फायद्याचे ठरतात. प्रत्येक दुधाचा दात पडण्याचे एक योग्य वय असते. जेव्हा खालून येणारा पक्का दात तयार झाला की, हळूहळू दुधाचा दात सैल होऊन पडून जातो; परंतु जर एखाद्या दाताला खूप जास्त कीड लागली असेल तर तो काढून टाकावा लागतो. जर पक्का दात तयार होण्याआधीच दुधाचा दात काढला तर तिथे स्पेस मेंटेनर (space maintainer)लावून घ्यावा लागतो.
स्पेस मेंटेनर हा खालून येणाऱ्या पक्क्या दातांसाठी जागा राखून ठेवतो. जर फक्त दात काढून घेतला किंवा वेळेआधीच दात खराब झाले आणि त्याची उपचारपद्धती केली नाही तर बऱ्याच वेळेला येणारे पक्के दात हे वेडेवाकडे येतात. परिणामी, भविष्यात त्या ठिकाणी व्यवस्थित ब्रश होत नाही व भविष्यात पक्क्या दातांना कीड लागणे किंवा हिरडीचे आजार अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे डेंटिस्टच्या सल्ल्यानुसार जेव्हा दातांना कमी प्रमाणात कीड असते तेव्हा दातात सिमेंट भरणे, लहान मुलांच्या दातांचे रूट कॅनल व त्यांना कॅपिंग या उपचारपद्धती करता येतात.
हे आपण दातांना कीड लागल्यानंतरच्या उपचारपद्धती बघितल्या; पण सुरवातीला सांगितल्याप्रमाणे लहान मुलांना दातांना कीड लागण्याचे प्रमाण जास्त असते. दातांना कीड लागू नये यासाठी वर्षातून एकदा डेंटिस्टच्या सल्ल्यानुसार दातांना फ्लोराईड अॅपलिकेशन (fluoride application) करून घेता येते. थोडक्यात हे दातांवर सुरक्षित आवरण बनवते ज्यामुळे दातांना कीड लागण्याचे प्रमाण कमी होते. थोडक्यात सांगायचे झाले तर व्यवस्थित पद्धतीने ब्रश करणे, योग्य टूथपेस्ट व टूथब्रश वापरणे, गोड कमी करणे, खाल्ल्यानंतर चूळ भरणे, सहा महिन्यातून एकदा डेंटिस्टचा सल्ला घेणे, फ्लोराईड अॅप्लिकेशन करून घेणे यामुळे आपल्याला मुलांच्या दातांची योग्य काळजी घेता येईल.
(डॉ. चिरायु हॉस्पिटल येथे दंतविकार तज्ज्ञ, हिरडी शल्यचिकित्सक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.