- डॉ. निखिल खेडकर
औरंगाबाद: गजानन एक हुशार इंजिनिअर. यशस्वी नोकरी करताना त्याला जाणवायला लागले की, लोक त्याच्याविषयी चर्चा करत आहेत, त्याचा मोबाईल हॅक करत आहेत, त्याच्या जिवाला धोका आहे. या कारणाने त्याने नोकरी सोडली. घरच्यांवर चिडचिड करायला लागला. कधी स्वतःशीच बोलताना दिसायला लागला. कोणासोबतही मिसळत नव्हता, बोलत नव्हता. आजीने त्याला मांत्रिकाकडे नेले, पण उपयोग झाला नाही. एकदा पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न करताना आईने त्याला वाचवले आणि मनोविकार तज्ज्ञांकडे घेऊन गेली. त्यांनी त्याच्या आजाराचे ‘स्किझोफ्रेनिया’ असे निदान केले.
स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार आहे. हा आजार शंभर व्यक्तींत एकाला होतो. बहुतांशी तरुण वयात होतो व त्याचे परिणाम आयुष्यभर राहतात. स्किझोफ्रेनिया जरी व्यक्तीला झाला तरी त्याचे परिणाम मात्र संपूर्ण कुटुंब, समाजावरही होतात.
आजार कसा ओळखावा?
स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांना पॉझिटिव्ह लक्षणे जसे संशय, भ्रम निर्माण होतात. जसे, लोक माझ्या विरोधात आहेत, मला पाहून हसतात, माझा पाठलाग होतो, मला मारण्याचे षड्यंत्र चालू आहे, माझ्यावर करणी, भानामती केली जाते, माझ्या जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध आहेत आदी. सौम्य भ्रमाची लक्षणे कधी कधी नातेवाइकांना लक्षात येत नाहीत. भास म्हणजे अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टींचा अनुभव येणे. जसे, आवाज, दिसणे, चव, वास, स्पर्श, अस्तित्व. गणेश स्वतःशीच बोलताना बऱ्याचदा दिसायचा. विचारल्यावर सांगायचा, की, ‘मी देवांशी चर्चा करतो, ते माझ्याशी बोलतात’.
या आजारात रुग्णाच्या बोलण्यात व वागण्यातही विचित्रपणा येतो. जसे, विस्कळित - असंबद्ध बोलणे, बोलताना विषयाचे तारतम्य नसणे किंवा स्वतःशी हसणे, रडणे, पुटपुटणे, चेहऱ्याचे, शरीराचे विचित्र हावभाव करणे आदी विचित्र वर्तणूकही आढळते.
बौद्धिक लक्षणेही-
कृष्णा खरं तर ‘बेस्ट एम्प्लॉयी पुरस्कार’ विजेता. परंतु अशात तो फार विसराळू झाला. त्याला कामाचं नियोजन जमत नव्हतं. लक्ष लागत नव्हतं, म्हणून त्याने नोकरी बदलली; पण या बौद्धिक अडचणी वाढत गेल्या. तपासणीत त्याला संशय आणि बौद्धिक लक्षणं आढळली. स्किझोफ्रेनिया या आजारात विसराळूपणा, वेंधळेपणा, कामाचे नियोजन न जमणे, धरसोड, काम वेळेत पूर्ण न होणे, बदललेल्या परिस्थितीशी जुळवून न घेता येणे अशी बौद्धिक लक्षणे इतर लक्षणांसोबत आढळतात.
पॉझिटिव्ह- निगेटिव्ह लक्षणे
काही रुग्णांमध्ये एकलकोंडं राहणं, कमी बोलणं, काहीही करण्याची इच्छा नाहीशी होणं, अस्वच्छ राहणं ही निगेटिव्ह लक्षणे असतात. पॉझिटिव्ह लक्षणं तशी लवकर लक्षात येतात, परंतु निगेटिव्ह व कॉग्निटिव्ह (बौद्धिक) लक्षणे कळण्यास थोडी अवघड असतात. ती लक्षात यायला वेळ लागतो. स्किझोफ्रेनियामध्ये भाव भावना अति बोथट असतात. जसे, आनंदाच्या प्रसंगीही चेहरा सुन्न, दुःखाच्या प्रसंगीही रडू येत नाही. काही रुग्णांमध्ये उदासी, नैराश्य, अति उत्साह अशी टोकाची भावनिक लक्षणे आढळतात. हा आजार व्यक्तीच्या विचारांना, भावभावनांना, वर्तणुकीला बदलतो, बिघडवतो. त्यामुळे त्याचे इतरांशी नाते संबंध बिघडतात.
वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा
अंदाजे दहा टक्के रुग्ण आत्महत्येचा प्रयत्न करतात. काही रुग्णांमध्ये अतीराग, आक्रमकता, तोडफोड, मारणे, अगदी खुनाचाही प्रयत्न करणे अशीही लक्षणे आढळतात. एका रुग्णाला ही सर्वच लक्षणे एकाचवेळी असतील असे मुळीच नाही. आजाराच्या विविध टप्प्यांवर लक्षणे व आजाराचे स्वरूप बदलू शकते. स्किझोफ्रेनिया हा आजार मेंदूतील रासायनिक असंतुलनामुळे तसेच मेंदूच्या पेशींमधील बदलांमुळे होतो. औषधे बरीच वर्षे, कधी कधी आयुष्यभरही घ्यावी लागतात. मेंदूतील बदल औषधांनी नियंत्रणात राहतात. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित उपचार करणे फार गरजेचे आहे. पराग स्किझोफ्रेनियावर मात करून बरा झाला. गोळ्याही चालू होत्या. हळूहळू गोळ्या कमी केल्या. काही काळाने तर बंदही केल्या. औषधोपचार बंद केल्याने त्याचा आजार उफाळून आला. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी कमी किंवा बंद करणे धोकादायक आहे. तीव्र वाढलेली लक्षणे असताना आणि नंतर आजार परत वाढू नये यासाठी इलेक्ट्रो कन्व्हल्जिव्ह थेरपी ही फार उपयुक्त, सुरक्षित, वेदनारहित उपचार पद्धती आहे.
तीव्र लक्षणे कमी झाल्यावर आणि निगेटिव्ह, कॉग्निटिव्ह लक्षणांसाठी औषधोपचारांसोबत पुनर्वसन उपचार पद्धती उपयुक्त आहे. जेणे करून व्यक्ति पूर्वीप्रमाणे घरात कामात आणि समाजात सामावून जाऊ शकतो.
योग्य निदान, उपचार गरजेचे
स्किझोफ्रेनिया जरी गंभीर आजार असला तरी वेळीच योग्य निदान व व्यवस्थित उपचाराने हा आजार बरा होतो. यात औषधी, इंजेक्शन, इलेक्ट्रो कन्व्हल्जिव थेरपी, पुनर्वसन उपचार पद्धती, मनोसामाजिक उपचारांचा एकत्रितपणे उपयोग केला जातो. या उपचारात तज्ज्ञांची भूमिका महत्त्वाची असते. रुग्ण, नातेवाईक, मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, व्यवसायोपचार तज्ज्ञ, पुनर्वसन तज्ज्ञ यांच्या एकत्रित प्रयत्नांनी रुग्ण पूर्वपदावर येऊ शकतो. स्किझोफ्रेनियावर संपूर्ण उपचार घेतलेले अनेकजण जेंव्हा आपले आयुष्य अर्थपूर्ण व उत्तमरीत्या जगताना दिसतात, आपापल्या कार्यक्षेत्रात यश मिळवलेले दिसतात तेव्हा एकच सांगावे वाटते, काळजी घ्या, काळजी करू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.