सोलापूर : कुंभारी येथील अश्विनी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाने विडी कामगार, शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबत कर्नाटकातील रुग्णांसाठी उपचार योजना राबवत वैद्यकीय संशोधनांना चालना दिली आहे.
अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने सातत्याने सोलापूर शहरातील विविध वयोगटातील आजारावरील उपचार व संशोधनाचे कार्य चालवले आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाने विडी घरकुल भागातील विडी कामगारांचे आरोग्य या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या कामगारांचे पोषण, आहार, आजार यावर सातत्याने विद्यार्थी संशोधन करत असतात.
महाविद्यालयाने महानगरपालिका व जिल्हा परिषदेशी सामंजस्य करार करून कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाशी विविध उपक्रम जोडले आहेत. त्यामुळे या आजारांच्या रुग्णांचा शोध लागणे व उपचार यातील कालावधी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
याच पद्धतीने क्षयरोगाचे रुग्ण शोध मोहीम व उपचार सेवा देखील याच पद्धतीने चालू आहे. या आजाराचे राज्य व केंद्राचे नियंत्रण कार्यक्रमात विद्यार्थी योगदान देत असतात.
या महाविद्यालयाला वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्र जोडलेले आहे. या केंद्रांच्या माध्यमातून देखील ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवा पुरवली जाते. गर्भवती मातांचे आरोग्य, पोषण व नियमित तपासण्यामध्ये देखील योगदान दिले जाते.
कुंभारी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी नियमित आरोग्य तपासण्या केल्या जातात. त्यात आढळलेल्या गंभीर आजारांच्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा देखील मिळवून दिली जाते.
या महाविद्यालयाची रक्तपेढी देखील अद्ययावत आहे. महिन्याला किमान ५०० ते १००० असे रक्तपिशव्यांचे संकलन केले जाते. या रक्त पिशव्या शहर व शहराबाहेरील रुग्णांपर्यंत पोचवण्याचे काम केले जाते.
कर्नाटक राज्यातील रुग्णांची संख्या मोठी आहे. या रुग्णांना कर्नाटक सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळावा म्हणून संस्थेने कर्नाटक सरकारशी सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्य योजनांचा लाभ मिळणे शक्य झाले आहे. रक्तदान, अवयवदान व इतर सामाजिक आरोग्य विषयक चळवळीत विद्यार्थी योगदान देतात.
महाविद्यालयाने कुंभारी परिसरातील सामाजिक आरोग्य चळवळीत सातत्याने योगदान दिले आहे. शासकीय योजना, आजार नियंत्रण कार्यक्रमाच्या द्वारे कुष्ठरोग, क्षयरोग आदी आजारांच्या रुग्णांचा शोध करुन त्याचा उपचार केला जातो. कुपोषणाच्या समस्येवर देखील
तपासणी मोहिमा घेतल्या जातात. विविध संस्थांशी सामंजस्य करार करुन आरोग्य सेवांचा विस्तार केला गेला आहे.
- डॉ. सुहास कुलकर्णी, अधिष्ठाता, अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, कुंभारी (ता.द.सोलापूर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.