डॉ. विजय रमणन
कर्करोगाचा उच्चार झाल्याबरोबर रुग्ण आणि त्याच्या जवळच्या नातेवाइकांच्या पायाखालची जमीन सरकते, परंतु मुख्य प्रश्न हा आहे की, कर्करोगाला आपण प्रतिबंध करू शकतो का? आपल्या आहारात बदल करून, खाण्याच्या सवयी बदलून, वेगन डाएट याचा नेमका फायदा होता का? या प्रश्नांची उत्तरे पाहूयात.
१. आहारातून कर्करोग टाळता येतो का?
सात्त्विक आहारातून काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करता येतो. मात्र, कर्करोगाला प्रतिबंध होईलच, हे खात्रीशीरपणे सांगता येत नाही. सहजतेने मिळणारे प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ कमी करून, ताजी फळे, पालेभाज्या, विविध प्रकारचे धान्य आहारात असावी.
२. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी आहार कसा असावा?
भरपूर फळे, पालेभाज्या, धान्य, प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स यांचा समावेश आहारात करावा. विशेषतः ब्रोकोलीसारख्या भाज्या महत्त्वाच्या ठरतात.
३. कोणते पदार्थ टाळावे?
लाल (रेड) आणि प्रक्रिया केलेले मांस, साखर असलेली पेये आणि प्रक्रिया केलेले पदार्थ याचे अतिसेवन करू नये. तसेच, अतिप्रमाणात मद्यपान.
४. साखरेने कर्करोगाच्या पेशी वाढतात का?
साखरेमुळे कर्करोग होत नसला तरीही त्यातून लठ्ठपणा वाढण्याचा धोका असतो. त्याचा थेट परिणाम म्हणजे कर्करोगाची जोखीम वाढते.
५. कर्करोग टाळण्यासाठी पूरक आहार घ्यावा का?
चौरस आहारातून शरीराला पोषकद्रव्ये मिळणे आवश्यक असते. काही रुग्णांमध्ये विशिष्ट प्रकारच्या पोषकद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी पूरक आहार सांगितला जातो.
६. कर्करोगाचा उपचार सुरू असताना वजनाचे व्यवस्थापन कसे करावे?
कर्करोगाविरोधातील लढाई फक्त शारीरिक नसते, तर मानसिक आणि भावनिकही असते. या सगळ्यावर संतुलनासाठी सात्त्विक आहार महत्त्वाचा ठरतो.
७. शाकाहारासारख्या विशिष्ट आहारामुळे कर्करोग होण्याचा धोका कमी होतो का?
आहार आणि कर्करोग यावर जगभरात संशोधन सुरू आहे. परंतु, त्यातून निश्चित कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. कोणत्याही एका आहारातून कर्करोग बरा करता येतो, हे सिद्ध झाले नाही. आधुनिक काळात ‘फास्टिंग मिमीकिंग डायट’ (एफएमडी) हा एक उपवासाचा प्रकार पुढे आला आहे. पारंपरिक उपवास पूर्ण दिवसभर करतो. मात्र, यात ६०० उष्मांकापर्यंतचे पौष्टिक पदार्थ खाऊ शकतो.
८. कर्करोगातून बरे झालेल्यांचा आहार कसा असावा?
कर्करोगाविरोधातील लढाई यशस्वी केलेल्यांनी संतुलित आहार घ्यावा. दररोज सक्रिय राहावे. नियमित तपासण्या कराव्यात. जीवनाची गुणवत्ता चांगली ठेवण्याची ही त्रिसूत्री आहे.
९. उपचारांचे दुष्परिणाम आणि आहार याचा संबंध असतो का?
कर्करोगाच्या उपचारासाठी केमोथेरपी, रेडिएशन दिले जाते. त्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांचा आणि आहाराचा जवळचा संबंध असतो. संतुलित आहारामुळे मळमळ, थकवा आणि कमी होणारे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. पचण्यास हलका आहार, थोडं परंतु पौष्टिक खाणे आणि भरपूर पाणी पिणे यातून दुष्परिणामांची तीव्रता कमी होऊ शकते. तसेच, पाण्यावर उपवास करण्यातून कर्करोगाच्या वाढीवर नियंत्रण मिळण्याची शक्यता असते. तसेच, उपचार पद्धतींचे दुष्परिणामही कमी होतात.
१०. आहारात काय खावे?
गव्हापेक्षा बाजरीला प्राधान्य द्यावे.
११. फळे आणि दूध
चीनमध्ये झालेल्या अभ्यासानुसार दुधातील प्रथिनांमुळे कर्करोग होण्याचे प्रमाण वाढते. तसेच, आहारात हंगामी फळांचा समावेश करावा. कारण, फळांमध्ये फॅक्टोज असतो. चयापचयावर त्याचा परिणाम होतो. त्यातून कर्करोगाच्या पेशी टिकून राहण्याची शक्यता असते. सुकामेवा किंवा मध यालाही हे लागू पडते.
(लेखक हिमॅटोलॉजिस्ट आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.