डोळे, एक महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. डोळ्यांनी आपल्याला सुंदर जग पाहण्याचा आनंद घेता येतो. डोळ्यांची आपण काळजी घेतोय का? जरूर विचार करून पहा.
- डॉ. अंबरीष दरक
डोळे, एक महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. डोळ्यांनी आपल्याला सुंदर जग पाहण्याचा आनंद घेता येतो. डोळ्यांची आपण काळजी घेतोय का? जरूर विचार करून पहा.
धकाधकीच्या दैनंदिन जीवनात डोळ्यांवर फार ताण आणत आहोत. बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, विश्रांतीची कमतरता याचा डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. याशिवाय कॉम्प्युटर, स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब अशा उपकरणांचा मोठ्या प्रमाणावरील वापराचा दुष्परिणामही डोळ्यांवर होत आहेत. जसे की, ‘कॉम्प्युटर व्हीजन सिन्ड्रोम.’ यात डोळ्यांना कोरडेपणा येणे, त्यावर ताण येऊन डोळे दुखणे, डोळे लाल होणे, डोकेदुखी जाणवणे, चष्म्याचा नंबर येणे अथवा तो वाढणे अशी लक्षणे जाणवतात.
मोतीबिंदूविषयी थोडे सारेच जाणतात. उतारवयात, मधुमेह असणाऱ्यांमध्ये, धूम्रपान व दारूचे सेवन करणाऱ्यांमध्ये मोतीबिंदू आढळून येतो. नव्या जीवनशैलीमुळे मोतीबिंदू होण्याचे वाढलेले प्रमाण व कमी वयात मोतीबिंदूचे उद्भवणे याविषयी जागरूकता येणे आवश्यक आहे. डोळ्यांतील नैसर्गिक भिंग (लेन्स) धूसर झाल्यामुळे मोतीबिंदू झालेल्या व्यक्तींना अस्पष्ट किंवा धूसर दिसणे, चष्म्याचा नंबर वारंवार बदलावा लागणे, रंग फिकट दिसणे, रात्रीच्यावेळी विशेष त्रास होणे अशी लक्षणे जाणवतात.
अशी घ्या डोळ्यांची काळजी...
1) डोळ्यांच्या आरोग्यासाठी संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिटॅमिन ए, सी व ल्युटीन, झिआकझानथिन, अँटी ऑक्सिडंटयुक्त पदार्थ जसे की, गाजर, बीट, पपई, लिंबूवर्गीय फळे, आवळा, हिरव्या पालेभाज्या, बदाम, अक्रोड यांचा आपल्या आहारात समावेश करावा.
2) एकूणच डोळ्यांच्या आरोग्यासाठी किमान आठ तासांची शांत झोप व विश्रांती अत्यंत आवश्यक आहे.
3) आपल्या दैनंदिन कार्यामध्ये आणि आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी काम करताना आपल्या डोळ्यांची काळजी घेणे आणि दुखापतीची शक्यता असल्यास त्यादृष्टीने डोळ्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.
4) ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘ऑनलाइन लर्निंग’ यासारख्या अपरिहार्य परिस्थितीमध्ये स्क्रिनटाइमचे व्यवस्थित नियोजन करावे. मनोरंजनासाठी स्क्रीनचा वापर काटेकोरपणे टाळावा.
२०-२०-२० सूत्राचा अवलंब करावा. स्क्रीनचा सतत दीर्घकाळासाठी वापर करताना दर २० मिनिटांनंतर, किमान २० सेकंदासाठी तरी, साधारण २० मीटर अंतरावर पाहावे, जेणेकरून डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळेल.
5) सर्व वयोगटातील व्यक्तींनी वेळोवेळी नेत्रविकारतज्ज्ञांकडून डोळ्यांची व चष्म्याच्या नंबरची तपासणी करून घ्यावी. यामुळे डोळ्यांच्या विकारांचे, मोतीबिंदूचेही वेळीच निदान होईल. डोळ्यासंबंधित कोणतीही समस्या असल्यास नेत्रविकारतज्ज्ञांकडून रीतसर तपासणी करून त्यांच्या सल्ल्यानुसारच उपचार घ्यावेत. त्यांच्या सल्ल्याशिवाय औषधे किंवा ड्रॉप्स टाकणे टाळावे.
6) दारू, सिगारेट, तंबाखू आदी व्यसनांपासून दूर रहावे.
7) मधुमेह, रक्तदाब यासारखे आजार असल्यास त्यावरील औषधोपचार नियमित घेऊन त्यांना नियंत्रणात ठेवावे.
मोतीबिंदूविषयी विशेष नमूद करण्यासारखे असे की, वेळीच निदान झाल्यास मोतीबिंदूपासून मुक्ती मिळवणे सोपे आहे. मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया हाच एकमेव उपचार आहे. परंतु, अद्ययावत तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक मशिन्स, लेझर, शस्त्रक्रियेच्या सुलभ पद्धती, लेन्सेस उपलब्ध आहेत. फेकोइमल्सिफिकेशन तंत्राचा वापर करून फेमटोसेकंड लेसरच्या साहाय्याने केलेली मोतीबिंदू शस्त्रक्रिया अवघ्या २०-३० मिनिटांत होणारी, भुलीच्या इंजेक्शनविना केवळ डोळ्यात ड्रॉप्स सोडून करण्यात येणारी, ब्लेडलेस पद्धतीची असून याद्वारे अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित कृत्रिम लेन्स डोळ्यामध्ये बसविल्यास रुग्णाला चष्म्याशिवायच स्पष्ट दृष्टी प्राप्त होऊ शकते.
(लेखक नेत्रविकारतज्ज्ञ व नेत्रशल्यचिकित्सक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.