Ayurveda Sakal
आरोग्य

प्रेमाचे आयुर्वेदिक रंग

आयुर्वेद व आयुष्य यांचा घनिष्ठ संबंध आहे. कारण आयुर्वेद हे आयुष्याचे शास्त्र आहे. प्रेमाबद्दल विचार केला तर प्रेम हे शारीरिक, मानसिक व भावनात्मक या तिन्ही स्तरांवर असते.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. मालविका तांबे

फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. प्रेम ही अशी एक भावना आहे जिने या जगातील सर्वांना एकमेकांशी बांधून ठेवलेले आहे. प्रेम व्यक्ती, प्राणी, सजीव की निर्जीव आहे त्याप्रमाणे प्रेमाची परिभाषा बदलून, त्याची प्रेम, जिव्हाळा, माया, स्नेह, वात्सल्य अनुराग अशी वेगवेगळी नावेही होतात. सगळ्यांत महत्त्वाचे असते ते स्त्री-पुरुषांतील प्रेम कारण त्यात सर्जनात्मकता असते, यामुळेच ही सृष्टी व हे आयुष्य पुढे वाढतं.

आयुर्वेद व आयुष्य यांचा घनिष्ठ संबंध आहे. कारण आयुर्वेद हे आयुष्याचे शास्त्र आहे. प्रेमाबद्दल विचार केला तर प्रेम हे शारीरिक, मानसिक व भावनात्मक या तिन्ही स्तरांवर असते तसेच आपल्या स्वास्थ्याची काळजी शारीरिक, मानसिक व भावनात्मक या तिन्ही पातळ्यांवर घ्यावी लागते. प्रेमाची आयुष्यात सुरुवात होते ती शृंगारात्मक असते, बेभान करणारी असते, पित्तासारखी तीव्रतेने उधाण घेतेही.

‘आग दोनों तरफ बराबर लगी है’ असे कळले की आयुष्य बरोबर जगणे सुरू होते, पण कालांतराने हे प्रेम वातासारखे कमी किंवा जास्त होत राहते. काही वर्षे एकत्र राहिले की प्रेमसंबंधांमध्ये कफासारखा ठहराव येतो. अर्थातच प्रेमाच्या प्रत्येक पातळीच्या भावना सुंदरच असतात.

संबंधांमध्ये संतुलन राहण्यासाठी एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा अवाजवी तर नाहीत ना हे समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. आपण जर समोरच्या व्यक्तीची वागणूक, मनातील भावना, प्रकृतीचा प्रकार समजू शकलो आयुष्य सोपे होऊ शकते.

वातदोषप्रधान व्यक्ती

वात म्हणजे वायू व आकाशत्तत्वप्रधान व्यक्ती. यांच्यात वायूमुळे चलत्व गुण व आकाशामुळे असीमितता हा गुण असतो. या व्यक्ती प्रेम करतात ते उफाळून प्रेम करतात, एखाद्यावर रागावले तर त्याच्यापासून लांब निघून जातात. वाताच्या व्यक्ती सर्जनात्मक व कलापूर्ण असतात. त्यामुळे प्रेमाच्या भावनाही ते कलात्मकतेने व्यक्त करतात. यांचे प्रपोजल म्हणजे स्वप्ननगरीतील कुठलेतरी विश्र्व उभारून ठेवतात.

गिफ्ट्स पण सुंदर व कलापूर्ण देतात की मन खूष होऊन जाते. फिरायला जाणे, गप्पा मारणे हे या लोकांना मनापासून आवडते, या व्यक्ती पार्टीला गेल्या तर लक्ष वेधून घेतात. परंतु वातामुळे भावनांमध्ये, मूडमध्ये चढ-उतार मोठ्या प्रमाणावर असतात. कुठलेही काम करायला घेतले की या व्यक्ती ते काम खूप उत्साहाने सुरू करतात, परंतु मध्येच शक्ती संपली की यांचे काम ठप्प होते.

काही दिवस खूप मेसेजची देवाणघेवाण करतील, नाही तर एकदम संपर्क थांबवून टाकतील. वाताच्या व्यक्तीशी प्रेम जुळले तर समोरच्याने एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी की यांच्याकडून सातत्याने कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करू नये, यांच्यात सतत बदल होणे स्वाभाविक असते. काही गडबड झाली तर ही मंडळी खोटंही बोलतात हे लक्षात ठेवावे.

नीट तयार न होता जाऊन वाताच्या व्यक्तीला विचारले की मी कशी दिसते आहे, चेहऱ्यावरची एक रेष इकडेतिकडे न होता या व्यक्ती प्रेमाने उत्तर देतील की या जगातील सर्वांत सुंदर स्त्री तूच आहेस. वाताच्या व्यक्ती फार स्ट्रेस घेतात, लवकर निराश होतात. त्यामुळे प्रेमसंबंधात कुठेही अनावश्यक ताण आला किंवा तुटातूट झाली तर मनाला फार लावून घेतात.

पित्तदोषप्रधान व्यक्ती

पित्तामध्ये अग्नी व जलतत्त्वाचे प्राधान्य असते. पित्ताच्या व्यक्ती खूप रसिक असतात. यांची प्रकृती सर्वांत रोमॅँटिक असते. यांच्या डोळ्यांतूनच प्रेमाची भावना समोरच्यापर्यंत आरामात पोचते. अर्थात हे पित्त या व्यक्तींना प्रबळ इच्छाशक्ती देते, अनुशासन देते आणि त्याचबरोबर राग व संतापही देते.

या व्यक्ती ठरवलेली भेटायची वेळ नेहमीच पाळतात. ठरविलेल्या बेतात काही बदल झाला तर यांना आवडत नाही, तसे झाले तर या व्यक्ती रागावतात, तथापि उशीर झाल्यामागे काही तार्किक कारण असल्याचे समजले तर लगेच शांतही होतात. रसिक असल्यामुळे यांना फुले, सुवासिक अत्तरे आवडतात.

पित्तामुळे यांच्यामध्ये स्पर्धाभाव खूप असतो. त्यामुळे अमुक गर्ल फ्रेंडने असं छान सरप्राइझ दिलं असे उदाहरण दिल्यास पित्ताची मुलगी त्याहून काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करते. या लोकांमध्ये स्पष्टवक्तेपणा असतो. मागेपुढे न बघता सत्य इतरांसमोर मांडणे हे यांच्या स्वभावात असते, त्यामुळे बऱ्याचदा समोरची व्यक्ती दुखावलीही जाते.

खोटे बोलणे यांच्या स्वभावात नसते. त्यामुळे चुकीच्या विषयांवर यांचे मत घ्यायला जाऊ नये. यांना भूक फार लागते, खाण्याच्या बाबतीत चोखंदळ असतात. हृदयाचे द्वार पोटामार्फत जाते ही उक्ती पित्ताच्या व्यक्तींवरून घेतलेली असावी.

पित्ताच्या व्यक्ती वादात, तर्क देण्यात उत्तम असतात. भांडण करण्याची वेळ आली तर पटकन रागावतात त्याचबरोबरीने उपहासानेही बोलतात. पित्त वीर्यशक्तीच्या विरुद्ध असते. वीर्य सौम्य असते तर पित्त तीक्ष्ण असते. आयुर्वेदानुसार यांच्यात मैथुनशक्ती थोडी कमी असते तसेच वीर्यसंबंधी दोष येण्याची शक्यता जास्त असते.

कफदोषप्रधान व्यक्ती

कफप्रकृती ही पृथ्वी व जलमहाभूतातून तयार झालेली प्रकृती. जडत्व असल्याने या व्यक्ती स्थिर व शांत असतात. यांना फारसे बोलायला आवडत नाही, परंतु समोरच्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट नीटपणे ऐकून घेण्याचा गुण यांच्यात असतो. या व्यक्ती अंतर्मुख स्वभावाच्या असतात, थोड्या लाजाळू असतात. गप्पा मारणे, मनातलं व्यक्त करणे हे या प्रकृतीत नसते.

यांना कोणी विचारले की माझ्यावर तुझे प्रेम आहे का, तर पटकन हो म्हणत नाहीत. कोणावर यांचे प्रेम बसले तरी पूर्णपणे आश्र्वस्त झाल्याशिवाय त्याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. कमिटमेंट करणे यांना अवघड जाते, परंतु एकदा कमिटमेंट दिली की या व्यक्ती मागे वळून बघत नाहीत. ठरविलेला बेत कोणी बदलला तर रागावत नाहीत.

या लोकांना रुटिननुसार वागणे आवडते. त्यामुळे यांच्याकडून एकसारख्या गोष्टीची अपेक्षा करता येते. दिलेले वचन पाळायला हे लोक कटिबद्ध असतात. थोडे आरामात राहणे, चांगले अन्न खाणे या गोष्टी यांना मनापासून आवडतात. त्यामुळे यांच्या हृदयाकडे मार्ग पोटातून नक्की जाऊ शकतो.

हे लोक फारसे बोलत नाहीत, परंतु यांच्याबरोबर गप्पा मारताना एखादा साधा मुद्दा आयुष्यातील गहन गोष्टींकडे वळवतात व त्यावर ते चर्चा करू शकतात. यांच्यात वीर्यशक्ती प्रचुर प्रमाणात असते, त्यामुळे मैथुन जास्त प्रमाणात करणे, मुले जास्त प्रमाणात असणे हे गुण आयुर्वेदाने या व्यक्तींचे सांगितलेले आहेत.

अर्थातच सगळ्या व्यक्तींची प्रकृती वात-पित्त, कफ-वात, पित्त-कफ अशी मिश्र असते. प्रकृतीनुसार व्यक्तीचा स्वभाव काय असू शकेल, याची जाणीव झाली की समोरच्याची वागणूक समजते व शंका-वाद टाळता येऊ शकतात.

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कोणालाच कोणासाठी वेळ राहिलेला नाही.

प्रेम टिकवून ठेवण्यासाठी एकत्र संसार करणे किंवा मुलांना जन्म देणे हे पुरेसे नसते. एकमेकांना वेळ देणे गरजेचे झालेले आहे. मानसिकता सकारात्मक ठेवणे यासाठी दोघांनी एकमेकांबरोबर क्रिएटिव्ह वेळ घालवणे आवश्यक आहे. सकाळी दोघांनी मिळून साधारणपणे अर्धा तास योगासने करावीत.

यामुळे प्राणवायूचा पुरवठा होऊन सकारात्मकता व ऊर्जा वाढायला मदत मिळते. कमीतकमी अर्धा तास एकत्र चालायला जाणे उत्तम. हातात हात घालून चालले तर ऊर्जेचा संस्कार एकमेकांवर होण्यास मदत मिळते. दिवसात एखादे तरी जेवण एकत्र घ्यावे. जेवण सात्त्विक, पौष्टिक असले तर ताकद वाढायला मदत मिळते.

शरीरात वीर्यशक्ती उत्तम असली तर आयुष्यात प्रेम टिकून राहायला मदत मिळू शकते. यासाठी आत्मप्राश, मॅरोसॅन, व्हिटासॅन, शतावरी कल्प, स्त्री संतुलन कल्प, चैतन्य कल्प वगैरे आयुर्वेदिक रसायनांचा वापर उत्तम ठरतो. शरीराचे आरोग्य नीट टिकून असले तर वीर्यशक्ती वाढायला मदत मिळते. यासाठी संपूर्ण शरीराला संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेल लावण्याचा फायदा होतो.

रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांच्या तळपायांना पादाभ्यंग केल्यास दिवसभराचा शीण कमी व्हायला तसेच स्नेहबंध टिकून राहायला मदत मिळते. दोघांनी मिळून स्वास्थ्यसंगीत, कॉन्सर्ट ऐकावी. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे नेहमी म्हणत की, संतुलन पंचकर्मासारखे शास्त्रोक्त पंचकर्म दोघांनी वर्ष-दोन वर्षांनी नक्की करावे, ज्यामुळे मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक या तिन्ही स्तरांवर शुद्धी झाल्यामुळे आपापसांतील संबंध सुधारायला मदत मिळते.

व्हॅलेंटाइन डे हा प्रेम करणाऱ्या लोकांना साजरा करण्याचा दिवस. आयुष्य जगायचे असले तर प्रेमाने राहायला पर्याय नाही. या निमित्ताने आपण निश्र्चय करू की आपल्या आयुष्यात असलेल्या प्रेमाच्या व्यक्तीसाठी आयुष्य चांगले जगू या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT