Listen sakal
आरोग्य

ऐका जरा

आयुर्वेदामध्ये शिर अर्थात मानेच्या वरच्या भागाला उत्तमांग म्हटलेले आहे. कारण तेथे मेंदू तर असतोच, बरोबरीने महत्त्वाची सगळीच ज्ञानेंद्रिये याच जागी असतात.

प्रशांत पाटील

- डॉ. मालविका तांबे

आयुर्वेदामध्ये शिर अर्थात मानेच्या वरच्या भागाला उत्तमांग म्हटलेले आहे. कारण तेथे मेंदू तर असतोच, बरोबरीने महत्त्वाची सगळीच ज्ञानेंद्रिये याच जागी असतात. या ज्ञानेंद्रियांना जपणे सोपे जावे यासाठी कदाचित ही व्यवस्था असावी. बाहेरच्या जगात, वातावरणात व एकूणच आजूबाजूला काय चाललेले आहे हे कळण्यासाठी ज्ञानेंद्रिये खूप महत्त्वाची असतात. याच ज्ञानेंद्रियांमधील एक महत्त्वाचे इंद्रिय आहे ते म्हणजे कान. कान ऐकण्याचे काम करतात.

कर्णेंद्रियाचा अर्थात कानाच्या रचनेचा विचार केला तर बाहेर दिसणाऱ्या भागाना कर्णपाळी म्हटले जाते व जेथे ऐकू येते त्या कानाच्या आतल्या भागाला कर्णपीठ म्हटले जाते. कानाच्या भागाबद्दल सांगत असताना आयुर्वेदामध्ये कर्णशश्कुली, कर्णपुत्रक असे दोन भाग सांगितलेले आहेत.

त्याचबरोबरीने तेथे तरुणास्थी असते, सिरा असतात, धमन्या असतात, पेशी असतात व सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे विदुर मर्म असते, अगदी साध्या सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर आपले श्रवणेंद्रिय कुंडली मारल्यासारखे गोलाकार नळीसारखे व पोकळ असते. त्यामुळे त्यावर आकाशतत्त्व व वातदोषाचे प्रभुत्व जास्त प्रमाणात असते.

कानाची पाळी सगळीकडून येणारे आवाज एकत्र करून कानाच्या आत जाऊन केंद्रित करायला मदत करते. येथे अनेक मर्मेही असतात. म्हणून हलक्या हाताने कानाच्या पाळीवर मसाज केल्याने किंवा थोडे तेल लावल्याने रिलॅक्स व्हायला मदत मिळते हा अनेकांचा अनुभव आहे. कान टोचणे हे एक महत्त्वाचे ॲक्युपंक्चर आहे.

कर्णेंद्रिय वातदोषाशी संबंधित असल्यामुळे शरीरात कुठलाही वाताचा दोष उत्पन्न झाला तर कानात वेगवेगळ्या प्रकारचे त्रास सुरू होऊ शकतात. कर्णशूल (कान दुखणे), कर्णनाद (टिनिटस), बाधिर्य (ऐकू न येणे), कर्णकंडू (खाज सुटणे), क्रिमिकर्णिका (कानात किडे होणे), कर्णपाक (पू होणे), कर्णशोथ, कर्णार्श, कर्णार्बुद वगैरे नाना प्रकारचे आजार कानामध्ये होऊ शकतात. दोषांच्या संलग्नतेच्या अनुसार पित्त, वात व कफज कर्णरोग सुद्धा होऊ शकतात.

यातही बाधिर्य व कर्णनाद या दोन्ही आजारांची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर दिसते. आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे की, जेव्हा वातदोष एकटा किंवा वातदोष कफाने आवृत्त होऊन कानातील धमन्यांमध्ये अवरोध उत्पन्न होतो तेव्हा बाधिर्य येते. जेव्हा असंतुलित वा प्रकुपित वात कानाच्या वाहिन्यांत जाऊन थांबतो तेव्हा कानात ढोल, झांज वा शंखनादासारखे आवाज यायला लागतात त्याला कर्णनाद म्हणतात.

कानात दोष येण्यामागची कारणे

अवश्यायजलक्रीडा-कर्णकण्डूयनैर्मरुत्‌ ।

मिथ्यायोगेन शस्त्रस्य कुपितोऽन्यैश्र्च कोपनैः ।। ....सुश्रुत उत्तरतंत्र

१. लहान वयापासूनच सतत सर्दी, खोकला, घसा सुजणे, निरनिराळ्या प्रकारची इन्फेक्शनस् होण्याची प्रवृत्ती असणे.

२. परिवारामध्ये कर्णबाधिर्य वा कर्णनाद यांचा इतिहास असणे.

३. कानात रचनात्मक बिघाड असणे.

४. मधुमेह वा अन्य रोगामुळे कर्णेंद्रियांची कार्यक्षमता कमी होणे.

५. शारीरिक आघात होणे म्हणजे कुठल्याही प्रकारचा अपघात होणे, कानात सतत इअरबडस्, पिना, क्लिपा वगैरे घातल्याने इजा होणे.

६. कर्णेंद्रियांची ऐकण्याची क्षमता कमी होईल अशा प्रकारची औषधे घेणे.

७. मोठा आवाज ऐकणे, ध्वनिप्रदूषण असलेल्या जागेत सतत राहणे.

८. कानात हेडफोन्स घालून सतत मोठ्या आवाजात गाणी ऐकणे.

९. वातदोष वाढेल अशा प्रकारचा आहार व विहार ठेवणे. उदा. रात्रीच्या जेवणात जास्त प्रमाणात कडधान्यांचा समावेश असणे, रात्रीचे जागरण करणे, योग्य ती काळजी न घेता थंड वाऱ्यात बाहेर पडणे, पायात गरम मोजे वगैरे न घालणे.

१०. सतत मोबाइलचा वापर करणे हेही सध्याच्या काळात बाधिर्याचे कारण ठरते आहे.

११. वय वाढल्यामुळेही शरीरात वातवृद्धी होत असते, त्यामुळेही इंद्रियांची कार्यशक्ती कमी होताना दिसते, त्यामुळेही बाधिर्य येण्याची शक्यता असते.

१२. पोहून झाल्यावर कान नीट कोरडे न करणे.

कानाची काळजी

कानाची काळजी घेण्यासाठी जन्म झाल्यापासूनच आयुर्वेदामध्ये कानात तेल घालायला सांगितलेले आहे. जेथे जेथे वाताचे असंतुलन होण्याची शक्यता असले तेथे तेथे तेलाचा वापर करणे उत्तम असते. कानात तेल घालू नये असे सध्या सगळीकडे सांगितले जाते. पण आयुर्वेदिकरीत्या सिद्ध केलेले तेल कानात घालण्याने श्रोतेंद्रियाला मदत होते. संतुलन श्रुती तेलाचा अनुभव आजपर्यंत अनेकांनी घेतलेला आहे.

कानाने कमी ऐकू येण्याची तक्रार असणाऱ्या ८०-८५ च्या व्यक्तीनींही संतुलनचे श्रुती तेल वापरल्यावर फरक पडल्याचे सांगितले आहे. कानात तेल टाकणे याला आयुर्वेदात कर्णपूरण असे म्हटले जाते. रोज कानात १-२ थेंब तेल घालणे उत्तम असतेच, पण शक्य असल्यास वैद्यांकडे जाऊन कर्णपूरण उपचार करून घेणेही उत्तम असते.

यामुळे कानाच्या रोगांना तर प्रतिबंध होतोच, बरोबरीने कान स्वच्छ राहायला मदत मिळते, मन्यास्तंभ (मान आखडणे) हा त्रास कमी होतो, नसांचे पोषण होते, चक्कर वगैरेंची प्रवृत्ती कमी व्हायला मदत मिळते, मन शांत होऊन चांगली झोप यायला मदत होते असा लोकांचा अनुभव आहे. याचबरोबरीने कानाच्या आजूबाजूला संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल लावल्याचा फायदा होतो.

  • वैद्यांकडून स्थानिक स्वेदन करून घेणेही फायद्याचे ठरते.

  • आहारात तुपाचा वापर नियमित करणे तसेच अमृतशर्करायुक्त पंचामृत, आत्मप्राश, धात्री रसायन वगैरे रसायनांचा वापर नियमित करणे चांगले.

  • नियमितपणे नस्य करणे, शिरोपिचू करणे, शिरोधारा करणे, फार त्रास असला तर शिरोबस्ती करणे हेही कानाच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जाते.

  • याचबरोबरीने काही सूचनांचे पालन करणे उत्तम

  • शक्यतो हलक्या आवाजात बोलावे, जास्त बोलणे टाळावे.

  • कानांना गार वारा लागू देऊ नये. विशेषतः सकाळी थंडीच्या वेळेत व थंडीच्या ऋतूत कानांना टोपी असलेली जास्त बरे.

  • मोबाइलवर फार वेळ बोलणे टाळणे बरे, शक्यतो वायर असलेल्या होडफोन्सचा वापर केलेला बरा.

  • टीव्ही पाहताना वा संगीत ऐकताना आवाज कमी ठेवावा.

  • जास्त ध्वनिप्रदूषण असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. अशा ठिकाणी जाणे गरजेचे असेल तर कानात कापसाचे बोळे घालावे.

  • विमानाचा प्रवास जास्त प्रमाणात होत असला, जेणेकरून सतत कानावर पडणारे हवेचा दाब बदलत असला, तर कानात कापसाचे बोळे घालणे उत्तम.

  • कानातून कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन जाणवत असले, कानातून स्राव होत असला तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक असते.

कुठल्याही इंद्रियाने आपले १०० वर्षे काम व्यवस्थित करत राहणे हे अपेक्षित असते, त्यामुळे इंद्रियांची काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी असते. ही सगळी काळजी घेतल्यास आपल्या श्रोत्रेंद्रियांचे कार्य व्यवस्थित चालण्यात नक्की मदत मिळू शकते. एक महत्त्वाचे की कानाने चांगल्या गोष्टी ऐकून त्यांचे पालन करणे इष्ट, पण जेव्हा व्यक्ती ऐकून न ऐकल्यासारखे करते तेव्हा मात्र त्याला कुठलाच इलाज नसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT