डोळ्यापुढे अंधारी येऊन चक्कर येणे हा प्रकार आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी तरी आला असेलच. ही चक्कर किती धोकादायक आहे का तिच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते याबद्दल आपण आज माहिती घेऊयात.
डोळ्यापुढे अंधारी येऊन चक्कर येणे हा प्रकार आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी तरी आला असेलच. ही चक्कर किती धोकादायक आहे का तिच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते याबद्दल आपण आज माहिती घेऊयात.
चक्कर अथवा सिनकोपी यामध्ये एखादी व्यक्ती काहीतरी करत असताना किंवा एक्दम रात्री उठल्यावर किंवा खूप वेळ बसून उठल्यानंतर एकदम डोळ्यापुढे अंधारी येऊन तात्पुरती भोवळ येते. काही वेळा तोल जाऊन पडण्याचीही शक्यता असते. साधारणपणे काही सेकंदांमध्ये परत शुद्धी येते. यामध्ये फिटसारखे झटके येत नाहीत. काही वेळातच व्यक्ती ही पूर्ववत झालेली असते. याच्यानंतर माणूस पूर्णपणे शुद्धीवर येतो आणि तो गोंधळलेल्या अवस्थेत नसतो. काही स्वरूपाच्या फिट्समध्ये अशा स्वरूपाची लक्षणे दिसतात; पण त्यामध्ये हा प्रकार काही मिनिटे लांबतो आणि त्या चक्करनंतर ती व्यक्ती काही मिनिटे संभ्रमावस्थेत असते.
बऱ्याचदा सिनकोपी ही क्वचितच येते आणि ती जास्त धोकादायक नसते; पण याची वारंवारता जर खूप असेल, तर मग मात्र याचा सखोल अभ्यास करण्याची गरज असते. अशा वेळी चक्कर ही कार्डियाक अरेस्टची पूर्वसूचना असू शकते. चक्कर येऊन पडल्यास गंभीर दुखापतही होऊ शकते. थोडक्यात चक्कर ही बहुतांशी प्रमाणात धोकादायक नसते; पण ती वारंवार येत असल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क करणे आवश्यक आहे. काही वेळी आपल्याला अशी एक कल्पना अथवा काही लक्षणे येतात, ज्यामुळे अंदाज येऊ शकतो, की आता आपल्याला चक्कर येणार आहे. याला ‘पूर्व सिनकोपी’ असे म्हणतात. यामध्ये डोके हलके वाटणे, डोळ्यांसमोर पुसट दिसणे, छातीत वेगाने धडधड होणे इत्यादी लक्षणे जाणवू शकतात.
चक्कर/ सिनकोपी कशामुळे?
काही कारणास्तव जर मेंदूचा रक्तपुरवठा तात्पुरता कमी अथवा बंद झाला तर चक्कर येते. याची नानाविध कारणे आहेत.
व्हेजोव्हेगल सिनकोपी किंवा रिफ्लेक्स सिनकोपी : यालाच आपण चक्कर असे म्हणतो. यामध्ये काही रिफ्लेक्समुळे हृदयाची गती मंदावते आणि रक्तदाब कमी होतो. ही बऱ्याचदा उभा असताना येते. हे चक्कर काही कारणांमुळे येऊ शकते. यामध्ये रात्री लघवीसाठी उठणे, खूप वेळ उभे राहणे, इंजेक्शन घेणे, रक्त पाहणे इत्यादी गोष्टी ट्रिगर म्हणून होऊ शकतात. शौचासाठी खूप जोर लावणे, जोरात खोकल्याची उबळ येणे, लघवीला उभे राहणे (पुरुषांमध्ये), जोरात पोटामध्ये काळ येणे, वजने उचलणे इत्यादी कारणांमुळे रिफ्लेक्स सिनकोपी अथवा चक्कर येऊ शकते. या स्वरूपाची चक्कर ही धोकादायक नसते. यातील ट्रिगर आपण टाळले, तर या चक्करपासून सुटका होऊ शकते. शक्यतो याला जास्त काही औषधे अथवा तपासण्यांची गरज भासत नाही. काही वेळ मान जोरात झटकल्यास अथवा घट्ट कॉलर घातल्यास कॅरोटिड रक्तवाहिनीवर दाब येऊनही चक्कर येऊ शकते.
गंभीर कधी?
काही वेळा हृदयाची गती अरिदमियांमुळे खूप जोरात अथवा अत्यंत मंद होते, तेव्हाही चक्कर येते आणि ही चक्कर गंभीर असते. याचे पर्यवसान हे मृत्यूमध्येही होऊ शकते. यामध्ये बऱ्याच वेळा धडधड किंवा पल्पिटेशन हे लक्षण प्रामुख्याने बघावयास मिळते. तसेच हृदयाच्या आतमध्ये एओर्टिक व्हॉल्व्ह नावाची झडप असते, जिच्या अरुंद होण्यामुळेसुद्धा चक्कर येऊ शकते. याला एओर्टिक स्टेनोसिस असे म्हणतात.
निदान कसे करावे?
1) ईसीजी आणि संबंधित चाचण्या : यामध्ये अरिदमियांचे निदान होऊ शकते. यामध्ये काही दिसले नाही, तर डॉक्टर आपल्याला २४ ते ७२ तास ईसीजी मॉनिटर- होल्टर लावण्यास सांगू शकतात. यामध्ये चक्करीच्या करणांविषयी काही सुगावा लागू शकतो. तसेच काही वेळेस एक्सरसाइझ टेस्ट किंवा स्ट्रेस टेस्टदेखील केली जाऊ शकते .
2) टिल्ट टेबल टेस्ट : यामध्ये आपल्याला एका टेबलावर झोपविले जाऊन, ते टेबल तिरके केले जाते आणि त्याचा आपल्या रक्तदाब आणि हृदयाच्या नाडीच्या गतीवरील परिणाम याचा अभ्यास केला जातो. ही चाचणी रिफ्लेक्स सिनकोपीच्या निदानासाठी उपयुक्त असते.
3) मेंदूतज्ज्ञांचा सल्ला : काही वेळा चक्कर मेंदूच्या कारणांमुळेही येऊ शकते. अशा वेळी फिट किंवा तात्पुरता पक्षाघात (पॅरालिसिस) निदान करण्यासाठी मेंदूतज्ज्ञांची मदत घेतली जाऊ शकते. ते आपल्याला ईईजी किंवा एमआरआय तपासणी करण्यास सांगू शकतात.
उपचार
रिफ्लेक्स सिनकोपीला बऱ्याचदा काही उपचारांची आवश्यकता नसते. ज्या गोष्टींमुळे चक्कर येते अशा गोष्टी टाळणे, टिल्ट ट्रेनिंग व्यायाम, भरपूर पाणी पिणे इत्यादी गोष्टींमुळे चक्कर टाळता येते. गंभीर स्वरूपाच्या चक्करींमध्ये - अरिदमियांचे उपचार करणे, पेसमेकर अथवा आयसीडी बसविणे, कॅथेटर अब्लशन इत्यादी उपचारांचा समावेश होतो. एओर्टिक स्टेनोसिस असेल, तर तो बदलण्याची शस्त्रक्रिया करणेदेखील आवश्यक असते.
पण बहुतांशी प्रमाणांमध्ये चक्कर/ सिनकोपी हे खूप गंभीर प्रकरण असते. तरीही त्यावर लक्ष ठेवून जर काही वेगळे वाटल्यास, त्याची वारंवारता वाढल्यास, घरात अकस्मात मृत्यूची हिस्टरी असल्यास आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा. प्राथमिक सीपीआरचे प्रशिक्षण असणे आजकालच्या जगात अत्यावश्यक आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.