आपण पहिल्या लेखात सकारात्मक विचारसरणीबाबत माहिती घेतली. या भागात ताणतणावाचे व्यवस्थापन पाहणार आहोत.
१. ताणाचा स्त्रोत शोधणे
मन शांत करून आपल्याला ताणाचे उगमस्थान शोधायला हवं. गरज भासल्यास तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. मन शांत करून त्रयस्थपणे, साक्षीभावाने आपल्या सवयी, भावना, विचार न्याहाळायला हवेत. स्वत:ला काही प्रश्न विचारता येतील
मी नेमका/नेमकी कशामुळे अस्वस्थ आहे?
अस्वस्थतेमुळे शारीरिक आणि मानसिक काय त्रास होतो आहे?
कोणते नकारात्मक विचार आत्ता त्रास देत आहेत? ज्या गोष्टींमुळे मला ताण येतो आहे.
त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहता येईल का?
परिस्थिती सतत बदलत असते. ती बदलण्यासाठी आणि मला अनुकूल होण्यासाठी काय करावं?
या प्रश्नांनी उत्तरं एका वहीत लिहिता येतील. त्याला आपण ‘स्ट्रेस जर्नल’ म्हणू. आपल्या लक्षात यायला लागेल की एकतर मुळात ताण निर्माण करणारी परिस्थिती मी बदलू शकतो किंवा तसं शक्य नसेल तर माझी नकारात्मक प्रतिक्रिया बदलू शकतो. ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’मध्ये A''s महत्वाचे असतात. १. Avoid the stressor २. Alter the stressor ३. Adapt the stressor ४. Accept the stressor.
अनावश्यक ताण टाळणे महत्त्वाचे. आयुष्यात ताण निर्माण होणं अनिवार्य असलं तरी त्याचे स्त्रोत आपण निश्चित टाळू शकतो.
ताणतणाव नियोजनासाठी
अ) अतिशय नम्रपणे ‘नाही’ म्हणायला शिकणं. वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यात, स्वत:च्या क्षमता आणि मर्यादा ओळखायला शिकायच्या आणि झेपेल तेवढीच जबाबदारी घ्यायची. म्हणजे अतिरिक्त ताण टाळता येईल. व्यावसायिक आयुष्यात हे नेहमीच शक्य होईल असे नाही. परंतु प्रांजळपणे शक्य तिथं हे स्पष्ट करावं. आपल्या क्षमता वाढवणं आणि स्वत:शी प्रामाणिक राहणंही तितकंच महत्त्वाचं. हे ताण टाळण्यासाठी आहे, काम नाही.
ब) अनावश्यक गोष्टी टाळव्यात. त्रासदायक, नकारात्मक विचारसरणीच्या लोकांशी कामाव्यतिरिक्त गप्पा, मन उद्विग्न करणाऱ्या टी.व्ही मालिका, गॉसिपिंग आदी.
क) सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. आपल्याबाबतीत खूप चांगल्या गोष्टी घडल्या आहेत आणि पुढे घडतील याची खात्री बाळगणे. इतरांकडून कसल्याही अपेक्षा न ठेवणे. म्हणजे अपेक्षाभंगाचे दुख हा मुद्दाच निर्माण होत नाही.
ड) स्वत:च्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन करावे. कामाचे व वेळेचे व्यवस्थापन, ठरवलेली कामे वेळेवर करणे, स्वत:च्या मूल्यांशी शक्यतो तडजोड न करणे.
इ) व्यक्त होत राहावं. मनातील ताणाचा निचरा करावा. जिव्हाळ्याच्या व्यक्तीशी किंवा तज्ज्ञांशी बोलून मन मोकळं होणं महत्त्वाचं आहे.
ई) तणावयुक्त मन सतत एकतर भूतकाळातल्या आठवणींमध्ये व्यग्र असतं किंवा भविष्यकाळातल्या काळज्यांमध्ये. मनाला वर्तमान क्षणात ठेवणं तणावमुक्तीसाठी महत्त्वाचं आहे. नियमित शारीरिक, मनाचे व्यायाम, संगीत आणि ध्यानधारणा अपरिहार्य आहे. त्यामुळं शरीरात सेरोटेनीनसारखी उपयुक्त संप्रेरके नैसर्गिकरीत्या स्त्रवतील. त्याने ताण कमी व्हायला मदत होईल. मनाच्या व्यायामात ‘स्ट्रेस जर्नल’ लिहिणे, आपल्याला आवश्यक अशा सकारात्मक स्वयंसूचना देणे, गरज भासल्यास आपल्या मेकअपप्रमाणे तज्ज्ञांनी सुचवलेले व्यायाम करणे, गायडेड इमेजरीज, स्वस्थतेची तंत्रे शिकणे आवश्यक आहे. रोज शांत संगीत ऐकणे, आवड असल्यास आणि शक्य असल्यास संगीत शिकण्याचा औषधासारखा उपयोग होतो. मन शांत झाल्याखेरीज तणाव नियोजन अशक्य आहे. आयुष्यात ताणतणाव असणारच; परंतु त्याचं व्यवस्थापन करणे शक्य आहे.
या गोष्टी आपल्याला चांगलं मानसिक आरोग्य मिळवून देण्यासाठी मदत करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.