Happy 'Studentship' 
आरोग्य

आनंददायी ‘विद्यार्थिवृत्ती’

सकाळ वृत्तसेवा

तू फुलराणी

डॉ. समीरा गुजर-जोशी

नुकतीच गुरुपौर्णिमा झाली. आपल्या गुरूंविषयी आदर व्यक्त करण्याचा हा दिवस. खरंच आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे गुरू आपल्याला लाभतात आणि आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळवून देतात, म्हणून गुरूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे; पण त्याचबरोबर शिकणे ही प्रक्रियासुद्धा किती महत्त्वाची आहे. आपल्या लहानपणी एक सुभाषित अनेकदा शाळेत फळ्यावर लिहिलेलं असायचं, की ‘मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी असतो.’; पण आपण जसजसे मोठे होतो, तसे मात्र ही गोष्ट विसरतो, की आपण विद्यार्थी असायला हवे.

मैत्रिणी, मी कधीच विसरू शकणार नाही असा एक प्रसंग सांगते. मी पीएचडीला ॲडमिशन घेण्यासाठी आवश्यक प्रवेश परीक्षा देत होते आणि त्यावेळेस मी नऊ महिन्यांची प्रेग्नंट होते. अशा अवघडल्या अवस्थेत तीन तास बसून पेपर लिहायचा म्हणून मी थोडीशी टेन्स होते. बेंचवर अधिक सोयीनं कसं बसता येईल, हे तपासत होते. एवढ्यात एक आजोबा माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, ‘‘तू अशा परिस्थितीत परीक्षा देते आहेस. तुझं कौतुकच आहे. तुला काही हवं असेल तर मला सांग.’’ आजोबांना बघून मला वाटलं, की हे कोणाला तरी सोडायला आले असावेत. मी विचारलं, ‘‘तुम्ही कोणाबरोबर आला आहात?’’ तर ते म्हणाले, ‘‘मीही परीक्षा द्यायला आलो आहे.’’ मला इतकं आश्चर्य वाटलं; पण त्यांचा उत्साह बघून माझा आदर दुणावला. मी त्यांना म्हटलं, ‘‘तुम्ही माझं कौतुक करत आहात; पण खरंतर आम्हीच तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे.’’ परीक्षेच्या दरम्यान त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. स्वतःचा पेपर लिहीत असताना त्यांचं माझ्याकडे लक्ष होतं. मला पुरवणी लागली किंवा काहीही तत्सम मदत करायला वर्गातल्या इतर तरुण विद्यार्थ्यांपेक्षा तेच पुढे होते.

परीक्षा संपल्यावर मी त्यांना विचारलं, ‘‘या वयात शिकावं असं तुम्हाला का बरं वाटतं?’’ ते म्हणाले, ‘‘मी कॉलेजमध्ये असताना संस्कृतचा अभ्यास करण्याची इच्छा असूनही करता आला नाही. मग पुढे करिअरही वेगळ्याच क्षेत्रात झालं; पण आता माझं उर्वरित आयुष्य माझ्या आवडीच्या गोष्टीचा अभ्यास करण्यात घालवावं असं वाटतं. गेली दोन वर्षे एमए करत असताना, तर मला पुन्हा एकदा तरुण झालो आहे असंच वाटतं आहे. तुम्हा तरुण मंडळींबरोबर वावरताना किती नवनव्या गोष्टी शिकता येतात. मी संस्कृत फार शिकलो नाही तरी हरकत नाही; पण मी ॲडमिशन घेतली नसती, तर या आनंदाला मात्र मी नक्की मुकलो असतो.’’ पुढे आजोबांनी पीएचडी पूर्ण केलं की नाही मला कळलं नाही; पण त्यांचा हसरा उत्साही चेहरा मात्र कायम लक्षात राहिला.

अशाच आणखी एक सीनियर विद्यार्थिनी मी एमए करत असताना माझ्या वर्गात होत्या. त्या एका बँकेच्या मॅनेजर म्हणून काम करत होत्या; पण सकाळची लेक्चर्स करून मग बँकेत जात असत. त्यांची मुलं तेव्हा कॉलेजमध्ये होती. आपली नोकरी सांभाळून नवं काही शिकण्याची त्यांची ही धडपड थक्क करणारी होती. नोकरीत प्रमोशन हवं असल्यास एखादं सक्तीचं शिक्षण लोक घेतातही; पण अशा पद्धतीनं आपल्या आवडीचं काहीतरी शिकण्यासाठी धडपड करणारे फारच कमी म्हटले पाहिजेत.

खरं तर आपण कळत नकळत अनेक गोष्टी आयुष्यभर शिकत असतो; पण शाळा-कॉलेजच्या दिवसानंतर, खास करून संसारात काही काळ घालवल्यावर, एखादी गोष्ट ठरवून शिकायची म्हटली, की आपल्याला अनेक प्रश्न पडतात. आता या वयात मला हे जमेल का, ही मुख्य भीती असते. कितीतरी गोष्टी करण्याची इच्छा आपल्या मनात असते. एखादीला ड्रायव्हिंग शिकायचं असतं, तर दुसरीला डान्स क्लासला जायचं असतं. कुणाला पुढे शिक्षण घेण्याची इच्छा असते, किंवा एखादी नवी भाषा शिकायची असते. एखादा ऑनलाइन कोर्स करायचा असतो. एखादीला मेडीटेशन कॅम्पला जायचं असतं. असं बरच काही... पण

अनेकदा असा काही विषय निघाल्यास प्रोत्साहन मिळत नाही. उलट, ‘आता या वयात शिकून काय करायचं?, उगीच कशाला नसते उद्योग?, जमणार

आहे का?, उगीच फीचे पैसे वाया जातील...’ असे अनेक सल्ले सहज मिळतात. त्यामुळे मग असला नसलेला उत्साह मावळून, ‘राहूच दे’ असंही वाटतं; पण माझ्या वरील दोन सीनियर

स्नेहींना भेटल्यावर लक्षात आलं, की age is just a number आणि आपण जर आयुष्यभर आपल्यातला विद्यार्थी जपू शकलो, तर त्यासारखं anti-aging दुसरं काही नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT