Symptoms of Colon Cancer : जेवण जेवल्यानंतर काही जणांना एकापाठोपाठ एक ढेकरे येण्याची सवय असते. नैसर्गिक प्रक्रिया म्हणून काही जण याकडे दुर्लक्ष करतात. पण लागोपाठ चार ते पाच ढेकर येण्याची समस्या वारंवार घडत असेल तर मंडळींनो सतर्क व्हा.
या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. एक 24 वर्षीय तरुणी देखील वारंवार ढेकर येण्याच्या समस्येमुळे त्रस्त होती. ही समस्या कमी व्हावी म्हणून जेव्हा तिनं वैद्यकीय उपचार घेण्याचा विचार केला त्यावेळेस किरकोळ आजार समजून डॉक्टरांनीही तिला गॅस आणि अॅसिडिटी कमी करण्यासाठी औषधे दिले.
पण काही महिन्यांनंतर या तरुणीला ढेकरांसह उलट्या व मळमळण्याचाही त्रास होऊ लागला. यानंतर तिला काही दिवस शौचासच झाले नाही आणि पोटदुखीचाही त्रास वाढू लागला. जेव्हा ही समस्या अतीगंभीर स्वरुप गाठू लागली, तेव्हा तिनं काही वैद्यकीय तपासण्या केल्या असता जीवघेणा कोलन कॅन्सर झाल्याचे निदान झाले. दरम्यान ढेकर येण्यामुळे कोलन कॅन्सर होण्याचे प्रकरण फार दुर्मिळ असले, तरीही या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते.
TOI ने डेलीमेलच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ही तरुण एक नर्स आहे. ढेकरे येण्याची ही समस्या तिला किरकोळ वाटली म्हणून तिनं स्वतःहूनच यावर औषधोपचार करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा शारीरिक वेदना वाढू लागल्या तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली.
यानंतर तिच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या, तेव्हा कोलनजवळ अतिरिक्त चरबी असल्याचे निदान झाले आणि बायोप्सीमध्ये तिला कोलन कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झाले. यानंतर शस्त्रक्रियेद्वारे कर्करोगाच्या पेशी काढण्यात आल्या.
12 आठवड्यांपर्यंत तिला कीमोथेरपी देण्यात आली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आता कोलन कॅन्सरमुळे ढेकर येणे अतिशय मोठे लक्षण असल्याची माहिती या प्रकरणाद्वारे समोर आली आहे.
कोलन कॅन्सरची लागण झाल्यास पोटाच्या कार्यप्रणालीमध्ये असामान्य बदल पाहायला मिळतात. याव्यतिरिक्त गुदद्वारातून रक्तस्त्राव होणे, पोट व ओटीपोटात दुखणे आणि पेटके येणे, गॅस होणे, शारीरिक थकवा जाणवणे, अशक्तपणा येणे आणि शरीराचे वजन जलदगतीने कमी होणे, इत्यादी ही कोलन कॅन्सरची लक्षणे आहेत.
‘Centre's for Disease Control and Prevention’च्या मते, कोलन कॅन्सरची लागण होऊ नये, यासाठी सर्वप्रथम आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष देण्याची गरजेचं आहे. पौष्टिक खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे कोलन कॅन्सरपासून शरीराचे संरक्षण केले जाऊ शकते.
यासह नियमित व्यायाम करणेही आवश्यक आहे. तसंच मद्यपान- धूम्रपान करणे टाळावे. तसंच शरीराचे वजन देखील नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे, कारण यामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. रिपोर्टनुसार, मांसयुक्त आहाराचे अधिक सेवन करू नये. याऐवजी ताजी फळे आणि हिरव्या भाज्यांचे सेवन अधिक प्रमाणात करावे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.