- विकास सिंह
आपण आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी प्रयत्नशील आहोत आणि हे साध्य करण्याचा एक महत्त्वाचा घटक आहे आरोग्यपूर्ण हृदय. आपण अत्यंत सोप्या, मात्र परिणामकारक खाण्याच्या सवयींतून हृदयाचे आरोग्य सुधारू शकतो. हृदय आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठीच्या खालील टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील.
कॅलरीचा समतोल आणि व्यायाम
हृदयाचे आरोग्य सांभाळण्यासाठी वजनावर नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही घेत असलेल्या कॅलरीज आणि त्या प्रमाणात तुम्ही किती व्यायाम करता, यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सातत्यपूर्ण व्यायाम, त्याच्या जोडीला विचारपूर्वक खाणे यांतून तुम्ही आदर्श वजनाचे ध्येय साध्य करू शकता.
फळे व भाज्यांची ताकद ओळखा
विविध प्रकारच्या भाज्या आणि फळांनी युक्त आहार हृदयाचे आरोग्य सांभाळण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. यांमध्ये महत्त्वाची पौष्टिक तत्त्वे, फायबर, ॲन्टिऑक्सिडंट्सचा समावेश असतो आणि ते हृदयाचे आरोग्य सांभाळण्यासाठी उपयुक्त ठरतात.
संपूर्ण धान्ये आणि फायबर
गहू, ओट्स, राई, बार्ली, ब्राऊन राइस, कडधान्ये, शिंगाडा, क्विनोआ या संपूर्ण धान्यांच्या माध्यमातून तुमच्या रोजच्या जेवणाचा पाया रचला गेला पाहिजे. या अत्यंत पौष्टिक पर्यायांतून कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करणे व रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचे काम केले जाते.
जेवणात ‘ओमेगा ३’चा समावेश
‘ओमेगा ३’ फॅटी ॲसिड्स तुमच्या शरीरातील लो डेन्सिटी लिपोप्रोटिनचे (एलडीएल) प्रमाण कमी करून कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात. त्यांच्या मदतीने रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले किटण साफ केले जाते व त्यातून हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये सुधारणा होते. सॅलमन आणि ट्युना हे दोन मासे ‘ओमेगा ३’चे सर्वांत मोठे स्रोत आहेत. जवस, चियाच्या बिया आणि अक्रोड या वनस्पतीजन्य स्रोतांमध्येही ओमेगा ३ विपुल प्रमाणात असते.
प्रथिनांचा समावेश
मासे, चिकन, बिन्स, लो-फॅट किंवा फॅट फ्री दूध आणि दही व सुकामेवा यांतून मिळणाऱ्या प्रथिनांचा समावेश तुमच्या जेवणात करा. यांतून तुमच्या शरीराला आवश्यक पौष्टिक घटक मिळतील व त्यांमध्ये लाल मांसाच्या तुलनेत कमी प्रमाणात संतृप्त फॅट्स असतील.
कमी प्रमाणात खा
ताटात कमी प्रमाणात अन्न वाढून घ्या आणि अति प्रमाणात खाण्यापासून स्वतःचा बचाव करा. छोट्या ताटामध्ये अन्न वाढून घ्या, त्यामुळे अन्न कमी प्रमाणात खाल्ले जाईल व तुम्हाला पोटभर जेवल्यासारखेही वाटेल.
मिठाचे प्रमाण कमी करा
मिठाच्या वाढत्या प्रमाणामुळे रक्तदाब वाढतो व त्यातून हृदयविकार होऊ शकतो. त्याचबरोबर प्रक्रिया केलेल्या व पॅकबंद अन्नापासून दूर राहा. अन्न शिजवताना ताज्या वस्तूंचा वापर करा.
धूम्रपान सोडा
तुम्ही धूम्रपान करीत असल्यास ते ताबडतोब सोडणे हा तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्याचा सर्वोत्तम मार्ग असले. त्यासाठी समुपदेशकांची मदत घ्या.
भरपूर पाणी प्या
शीतपेयांचा वापर जपून करा. मोठ्या प्रमाणात साखर असलेल्या पेयांपेक्षा पाणी, हर्बल टी किंवा इतर कमी प्रमाणात साखर असलेल्या पर्यायांचा विचार करा.
मद्यपान मर्यादित हवे
तुम्ही मद्यपान करीत असल्यास त्याचे प्रमाण नियंत्रणात हवे. अति मद्यपानामुळे हृदयावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
रक्तदाब नियमित तपासा
तुमचा रक्तदाब घरामध्येच नियमित मोजा व तुमच्या डॉक्टरांना त्याची माहिती देत राहा. लक्षात ठेवा, पौष्टिक अन्न आरोग्याचा केवळ एक भाग आहे. नियमित व्यायाम, ताणावर नियंत्रण व तंबाखूजन्य पदार्थ टाळणे हृदयाच्या आरोग्यासाठी तेवढेच महत्त्वपूर्ण आहे.
त्याचबरोबर तज्ज्ञांना नियमित सल्ला घेणे, डाएटसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणेही गरजेचे आहे. त्यासाठी आजच खाण्याच्या चांगल्या सवयी लावून घेत तुमच्या हृदयावर ताबा मिळवा. तुमचे हृदय नक्कीच धन्यवाद देईल!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.