Stomach pains sakal
आरोग्य

आरोग्य पोटाचे

काय काय नाही केले माणसाने पोट साफ व्हावे म्हणून! कमी जेवून पाहिले, जास्त जेवून पाहिले, जमालगोट्याचीही कमाल काही दिसली नाही.

सकाळ वृत्तसेवा

काय काय नाही केले माणसाने पोट साफ व्हावे म्हणून! कमी जेवून पाहिले, जास्त जेवून पाहिले, जमालगोट्याचीही कमाल काही दिसली नाही. आयुर्वेदाने रेचनीय व पोट साफ होण्यासाठी अनेक औषधे सुचवली. काही कंपन्यांनी तर औषधाला नावच असे दिले की त्यावरून लक्षात यावे की बद्धकोष्ठता (कॉन्स्टिपेशन) कधीच जाणार नाही व औषध कायमच घ्यावे लागेल.

तेही करून पाहिले, पण बद्धकोष्ठ तसेच! मनुष्य जेवतो, त्यानंतर त्यातील सारभाग स्वीकारला जाऊन मलभाग टाकून द्यावा, ही योजना असते. पण जीवन संतुलित नसले आणि वागण्या-बोलण्यात केवळ स्वार्थप्रेरित स्वभाव ठेवला की त्यातून उत्पन्न होते संग्रहाची आवड.

वस्तूंचा अतिसंग्रह केला की जसे कशाचाच उपयोग होत नाही, तसेच मलसंग्रह वाढवत नेला की अन्नातील कुठलीच शक्ती मिळत नाही आणि पोटाची पिशवी मात्र फुगत राहते. शौचाला साफ होण्याचे सुख माणसाच्या चेहऱ्यावर तर लगेच दिसून येते. तसेच ते इतर प्राण्यांच्या वागण्यात पण दिसते. पोट साफ झालेला घोडा रेसमध्ये पहिला येतो म्हणतात.

पचन जाठराग्नीवर अवलंबून असते. हे अग्निदेव संपूर्ण स्वतंत्रपणे स्वयं इच्छेने कार्य करतात. रस्त्यावर वाटसरूंसाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करून ठेवली तरच गरज पडल्यास व इच्छा असल्यास मनुष्य तेथे जाऊन पाणी पितो. पाणी पिणे, न पिणे हे त्याच्या इच्छेवर असते आणि जरी तहान लागली व त्याची इच्छा असली तरी अस्वच्छ व योग्य व्यवस्था नसलेले पाणी तो पिणार नाहीच.

तसेच मनुष्याने खाण्या-पिण्याचे बंधन पाळून योग्य वागण्याने चांगले मानसिक वातावरण पुरवले तर हा जाठराग्नी प्रसन्न होऊन सर्व पचन व पर्यायाने इतर सर्व शरीरक्रिया चांगल्या तऱ्हेने पार पाडतो. माणसाच्या हातात त्या अग्नीला आमंत्रण देणेच फक्त असते. श्रीमद्‌भगवद्‌गीतेत ह्या अग्नीला ‘वैश्‍वानर’ हे नाव दिले आहे. प्राण-अपानाच्या साहाय्याने तो सर्व प्रकारचे अन्न पचवतो असे श्रीकृष्ण परमात्म्याने सांगून ठेवले आहे.

मलावष्टंभाचे दोन प्रकार असतात.

केवळ वातामुळे होणारा मलावष्टंभ - यात मल कडक, सुकलेला, खड्यासारखा किंवा गाठीप्रमाणे घट्ट असतो. या प्रकारात मलप्रवर्तन होताना दुखते, कडक मळामुळे गुदभागी जखम होऊन रक्तही पडू शकते. अत्यंत तीव्र अवस्थेत अक्षरशः हाताने मल काढून टाकावा लागतो किंवा एनिमा दिल्याशिवाय मलप्रवर्तन होत नाही.

आमाचा आणि कफाचा संबंध असलेला मलावष्टंभ - यात मल चिकट, चिखलासारखा असतो. या प्रकारात फार वेळ कुंथावे लागते. एकाच वेळेस पोट साफ झाले अशी भावना कधीच वाटत नाही. कैक वेळा चिकट्याच्या स्वरूपात प्राकृत कफ शरीराबाहेर जाऊ लागल्यास मलप्रवृत्तीनंतर थकवा येतो. काही व्यक्तींना तर नंतर झोपावेच लागते.

मलावष्टंभ फार दिवस राहिल्यास त्याचा परिणाम म्हणून बाकीही समस्या उद्भवू शकतात. उदा. डोके दुखणे, मूळव्याध, फिशर-फिश्‍च्युला, हर्निया, निद्रानाश, निरुत्साह, आळस, सर्वांग जड होणे, अंग दुखणे वगैरे.

परमेश्‍वर म्हणजेच प्रकृती! तेव्हा प्रकृतीस काय पचवता येईल आणि कोठा कसा आहे हे पाहून प्रत्येक माणसाने खाणे आवश्‍यक असते. मात्र मनाच्या चंचल व लोभी वृत्तीमुळे आणि संग्रहाच्या सवयीमुळे माणसे भलतेच अन्न व तेही अयोग्य प्रमाणात खातात.

लहानपणापासून घेतलेली पोटाची काळजी; साप्ताहिक विरेचन; मधुर-स्निग्ध द्रव्यांचे योग्य सेवन; सूर्यनमस्कार, पश्‍चिमोत्तानासन आदि व्यायाम; पोटावर तेल लावून शेकणे; त्रिफळा चूर्ण, सुखसारक चूर्ण वगैरे सर्व घेऊनही पचन व पोट साफ होणे हे परमेश्‍वरी इच्छेवरच म्हणजेच स्व-भावावर अवलंबून असते. ‘स्वभावाला औषध नाही’ हे आपल्याला माहितच आहे पण बद्धकोष्ठतेवर मात्र काही अंशी इलाज होऊ शकतो.

अर्थात केवळ पोट साफ होण्यासाठी औषध घेणे किंवा पोट साफ व्हावे म्हणून सकाळी ३-४ लिटर पाणी पिणे म्हणजे मलावष्टंभावर उपचार केला या भ्रमात न राहणेच चांगले होय. कारण अशा उपचारांनी मूळ मलावष्टंभात भर पडत असते व दिवसेंदिवस मलावष्टंभाची तीव्रता वाढत जाऊन असहाय अवस्थेला आमंत्रणच मिळत असते. उकळलेले गरम पाणी पिणे हे कोणत्याही प्रकारच्या मलावष्टंभात एक उत्तम सहायक उपाय आहे.

याशिवाय घरी बनवलेले साजूक तूप हेही यासाठी एक वरदानच होय. कारण ते अग्नीची ताकद वाढवते, समान वायूला संतुलित करून त्याची शक्ती वाढवते व अपान वायूला अनुलोमनाची गती देते त्यामुळे आहारात तर साजूक तुपाचा समावेश करावाच शिवाय रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप व दोन चिमूट सैंधव मीठ टाकून प्यावे.

वातप्रधान मलावष्टंभ असल्यास स्निग्ध द्रव्यांचा वापर करावा उदा. एरंडेल तेल, बहावा, मनुका, निशोत्तर वगैरे. सौम्य मलावष्टंभ असल्यास अविपत्तिकर चूर्ण, भिजवलेल्या मनुका, अंजीर वगैरे गोष्टी कामास येतात. तर तीव्र मलावष्टंभ असल्यास गंधर्वहरीतकी, सुखसारक चूर्ण वगैरे औषधांची मदत घ्यावी लागते.

आम व कफाचा संबंध असणाऱ्या मलावष्टंभात आमपचनापासून सुरुवात करावी लागते, त्यासाठी हिंग्वाष्टक चूर्ण, शंखवटी, आमपाचक वटीचा वापर केला जातो. तसेच आतील चिकटा काढून टाकण्यासाठी पिच्छिल म्हणजे बुळबुळीत द्रव्यांची मदत घेतली जाते. उदा. इसबगोल, अहळीव वगैरे. बरोबरीने त्रिफळा, हिरडा, सोनामुखी वगैरे मलप्रवर्तन करणाऱ्या वनस्पतीही वापरल्या जातात.

पोटावर हलक्या हाताने तेल चोळल्यास व वरून पोट शेकल्यास वात सरून पोट साफ होण्यास मदत होते.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोट साफ होणे हे वाताचे कार्य आहे हे आपण जाणतोच. तर मलप्रवर्तनाचे कार्य वाताच्या काळात जेवढे चांगले व पूर्णतः होईल तेवढे इतर वेळी होणार नाही हे नक्की. वाताचा काळ म्हणजे रात्रीचा अंतिम भाग व भल्या पहाटेचा सूर्योदयाच्या आसपासची वेळ. सकाळी ६-६.३० पर्यंत उठून शौचाला जाण्याची सवय शरीराला लावली तर आपोआपच वाताच्या वेळात वाताचे कार्य होऊन जाईल. यामुळे मलाष्टंभाचा त्रास उद्भवणारच नाही. मलाष्टंभाचा त्रास असणाऱ्यांनीही ही सवय लावून घ्यावी आज ना उद्या त्याचा निश्‍चित फायदा होईल.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ! माजी मंत्र्याने घेतली माघार, आता मुलगा लढणार

Eknath Shinde And Ajit Pawar: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे शक्तीप्रदर्शन! अजित पवार बारामती तर एकनाथ शिंदे 'या' मतदारसंघातून भरणार अर्ज

Dhanteras 2024 Rangoli Design: धनत्रयोदशीला अंगणात काढा सुंदर रांगोळी, जाता-येता लोक करतील कौतुक

Latest Maharashtra News Updates : दिवाळी सणावर पावसाचे सावट! पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता

Assembly Election 2024 : शेवटचे दोन दिवस, पण अंतिम यादी गुलदस्त्यात! महाविकास आघाडी, महायुतीतील तिढा कायम

SCROLL FOR NEXT