childhood fear Sakal
आरोग्य

लहानपणीच्या भीतीवर मात

लहानपणी मनात रुजलेली भीती, न्यूनगंड इत्यादी व्यक्तिमत्त्वविकासाच्या आड येऊ शकतात.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. विद्याधर बापट

लहानपणीच्या भीतीबाबतचे काही पैलू आपण गेल्या आठवड्यात बघितले. लहानपणीच जर अनाठायी, काल्पनिक भीतीची मुळे खुडली गेली तर सकस व्यक्तिमत्त्वाचा वृक्ष भविष्यात नक्की बहरू शकतो. आजच्या काळाची ही गरज आहे.

मोठेपणी मन कणखर, त्याचवेळी भावनिकदृष्ट्या समतोल व्हायला हवं असेल तर लहानपणापासूनच त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. लहानपणी मनात रुजलेली भीती, न्यूनगंड इत्यादी व्यक्तिमत्त्वविकासाच्या आड येऊ शकतात.

त्यामुळे या गोष्टींकडे वेळेवर लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं. लहानपणी बहुतेक सर्वांनाच कसली ना कसली भीती वाटलेली असते. कधी अंधाराची, कधी गोष्टीतल्या किंवा टीव्ही सिरियलमधल्या भुताची; पण कालांतरानं त्या भीतीतला फोलपणा जाणवायला लागतो आणि ती नाहीशीही होते.

मात्र, अतिसंवेदनशील अशा बऱ्याच लहान मुलांच्या बाबतीत हे सहजासहजी घडत नाही. भीती, असुरक्षितता आत खोल रुजून राहिलेली आढळते. नंतर तिचं स्वरूप बदलतं. मोठेपणी व्यक्तिमत्त्वाची, स्वभावाची वीण बनताना तिचा अविभाज्य भाग बनू शकते.

लहानपणी वयानुसार वाटणारी स्वाभाविक भीती म्हणजे-अगदी लहान बाळांना अनोळखी त्रयस्थ व्यक्तीची वाटणारी भीती, दहा महिने ते दीड वर्ष या वयात आई किंवा वडील आपल्यापासून दूर होताना, जाताना बाळाचं अस्वस्थ होणं,

वय वर्षं चार ते सहादरम्यान वाटणारी गोष्टीतल्या भुतांची, राक्षसांची भीती; तसंच अंधाराची भीती, साधारण सात ते दहा या वयात आजूबाजूच्या घडणाऱ्या वास्तव प्रसंग, उदा. मृत्यू, अपघात, घातपात व दहशतवादाच्या बातम्या, चित्रं, दृश्य यांची भीती. या सगळ्या भीती कालांतरानं नाहीशा होणं गरजेचं असतं.

काही अतिसंवेदनशील मुलांच्या बाबतीत काही भीती वा अस्वस्थता व्यक्तिमत्त्वातील असुरक्षिततेचं कारण ठरू शकतात. उदा. शाळेत वर्गात इतर मुलांकडून झालेली टिंगल, शिक्षकांनी चूक नसताना केलेली हेटाळणी, तुला काहीच जमत नाही,

जमणार नाही अशी शिक्षक, नातेवाईक यांच्याकडून सतत केली गेलेली नकारात्मक टिपण्णी. यांतून निर्माण होणारा न्यूनगंड, आपण निरुपयोगी असल्याची भावना पुढे प्रगतीच्या आड येऊ शकते. मुलींच्या बाबतीत न कळत्या वयात अनुभवले गेलेले गलिच्छ स्पर्श यांचाही निकोप विकासावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

अतिरिक्त भीती, अस्वस्थतेची कारणं

१. अनुवंशिकता : ही मुलं अतिसंवेदनशील, हळवी असू शकतात.

२. पालकांपैकी एकजण किंवा दोघेही अस्वस्थ वा असुरक्षित असतात.

३. पालकांनी मुलांची अनाठायी किंवा अतिरिक्त काळजी घेणं ज्यामुळे मुलांना वास्तवातल्या प्रसंगाला, संघर्षाला तोंड देण्याची क्षमता विकसित होत नाही.

४. काही दुर्दैवी प्रसंग उदा. पालकांचा घटस्फोट, घरातील ज्येष्ठांचा मृत्यू, अपघात, रुग्णालयातलं किंवा घरातलं मोठं आजारपण.

भीतीची लक्षणं

चंचलपणा, अधीरता वा उतावळेपणा, मंद हालचाली, कमी झोप किंवा जास्त झोपणं, तळव्यांना सतत घाम, नॉशिया, डोकेदुखी व पोटदुखीची तक्रार व त्यामुळे शाळेत न जाणं; अभ्यासात एकाग्रता होऊ न शकणं व मार्क्स कमी व्हायला लागणं; चिडचिड करणं, प्रमाणाबाहेर रागावणं; एकटं राहणं. इतर मुलांमध्ये न मिसळणं; घरी पाहुणे आल्यास बुजणं; तसंच सार्वजनिक समारंभांत भाग घ्यायचा टाळणं

काही मुलं काल्पनिकता (fantacy) आणि वास्तव (reality) यांत फरक करू शकत नाहीत आणि इथंच भीतीचा उगम होतो. भीती किंवा अस्वस्थता प्रमाणाबाहेर आहे असं वाटलं, तर तातडीनं तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

भीती किंवा अस्वस्थतेचं निवारण करण्याच्या खूप चांगल्या उपचारपद्धती असतात. भीतीचं निर्बलीकरण (Systematic Desensitization) म्हणजे सावकाश, पायरी पायरीनं भीतीवर मात करण्याच्या पद्धती तज्ज्ञ शिकवू शकतात. लहान मुलांसाठी स्वस्थतेची, तणावनियोजनाची तंत्रं असतात. ती उपयुक्त ठरू शकतात.

पालकांनी समजून घ्यायला हवं, की भीती आपल्यासाठी काल्पनिक असली, तरी मुलाला ती खरी भासते. त्यामुळेच त्याला अस्वस्थता येते. अशा स्थितीत खूप आश्वासक, प्रेमळ शब्दात त्याला समजावून सांगावं. रागावू नये किंवा चेष्टा करू नये, भीतीवर मात करण्यासाठी मदत करावी; पण काल्पनिक भीतीला खतपाणी घालू नये.

उदा. रात्री झोपताना मुलांना खोलीबाहेर, दुसऱ्या खोलीत किंवा कपाटात भूत आहे असं वाटतं. त्यावेळी मुद्दाम कपाट उघडून ‘बघ, आत काही भूतबित नाहीये’ असं सांगू नये, कारण त्यामुळे भूत असतं; पण आत्ता आत काही नाहीय असा अर्थ ते काढू शकतात.

त्या ऐवजी भूत नावाची गोष्टच नसते अशा पद्धतीनं समजवावं. तसंच ‘अंधाराला घाबरण्यासारखं काही नसतं. सूर्य मावळला, की प्रकाश नाहीसा होतो. अंधार म्हणजे फक्त प्रकाशाचा अभाव, प्रकाश नसणं’ या पद्धतीनं समजावून सांगावं.

शिक्षकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. शाळेमध्येही मुलांना समजून घेणं, धैर्य देणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं या गोष्टी शिक्षक करू शकतात. मुलांचा बराचसा वेळ शाळेत जातो. त्यामुळे तेथे त्याला आश्वासक वातावरण मिळणे त्याच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने आवश्यक ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT