शारिरीक सुदृढता जपण्यासाठी कित्येक लोक जिमची मदत घेतात. जिममध्ये विविध व्यायाम प्रकारांच्या मदतीने लोक आपलं शरीर कमावतात. यामुळे शारिरीक तंदुरुस्ती वाढते, तसंच आजारी पडण्याचा धोका देखील कमी होतो.
ज्याप्रमाणे शरीरासाठी जिम असतं. त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यासाठी देखील 'मेंटल जिम'ची गरज सध्या भासू लागली आहे. पाश्चात्य देशांमध्ये ही संकल्पना रुजवली जात आहे. भारतात मात्र याबाबत अद्याप म्हणावी तेवढी जागरुकता नाही. यामुळेच, मानसिक आरोग्यासाठी तुम्ही स्वतःचं मेंटल जिम कशा प्रकारे उभारू शकाल, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
मेंटल जिममध्ये मुख्य गोष्ट म्हणजे तुमच्या मेंदूचा व्यायाम. यासाठी तुम्हाला काही छोट्या-छोट्या गोष्टी करायच्या आहेत. मनामध्ये पॉझिटिव्ह विचार यावेत यासाठी हा व्यायाम महत्त्वाचा आहे. रिसर्चमध्ये असं सिद्ध झालं आहे, की तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आभार मानता, तेव्हा तुमच्या मनामध्ये आपोआप पॉझिटिव्हीटी तयार होते. त्यामुळे दिवसातून केवळ एक मिनिट वेळ काढून एखाद्या गोष्टीबद्दल आभार मानल्यास, तुमच्या मनात सकारात्मकता तयार होईल.
यासोबतच, किमान एक मिनिटं ध्यान केल्याने देखील तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढू शकतं. ही वेळ तुम्ही टप्प्या-टप्प्याने वाढवू शकता. मेंदूच्या व्यायामाचा आणखी एक प्रकार म्हणजे, मेमरी टेस्ट. काही वस्तूंची एक छोटी यादी करा, आणि एका तासानंतर त्यातील किती गोष्टी आठवतात याची चाचणी घ्या. दररोज हा व्यायाम केल्यास तुमची स्मरणशक्ती वाढेल.
मेंदूला तंदुरुस्त ठेवायचं असेल, तर त्याला नवनवीन प्रकारचं खाद्य पुरवणं देखील गरजेचं आहे. 'खाली दिमाग शैतान का घर' ही हिंदी म्हण तुम्ही ऐकली असेलच. यामुळेच मेंदूला दररोज काहीतरी नवीन देणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही एखादं पुस्तक वाचू शकता, डॉक्टुमेंटरी पाहू शकता, ऑनलाईन कोर्स करू शकता, नवीन गोष्ट शिकू शकता किंवा एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला शिकवू शकता. तुम्ही एखादी नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न देखील करू शकता. या सर्व गोष्टींमधून तुम्ही स्वतःच्या मेंदूला पुरेसं खाद्य पुरवाल.
वर्कआउट केल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्या शरीराला रिकव्हरीची गरज असते, त्याचप्रमाणे आपल्या मेंदूलाही दिवसभरानंतर पुरेशा विश्रांतीची गरज असते. यासाठी दोन पर्याय आहेत. एक म्हणजे तुम्ही मेडिटेशन करुन मेंदूलाा विश्रांती देऊ शकता. अतिविचार न करणे, कामातून ब्रेक घेणे, निसर्गाच्या सानिध्यात शांतपणे बसून राहणे या गोष्टी तुम्ही करू शकता.
याचा दुसरा पर्याय मात्र सर्वात फायदेशीर आणि गरजेचा आहे. तो म्हणजे, पुरेशी झोप घेणे. 'दररोज आठ तासांची झोप' हे समीकरण जरी प्रसिद्ध असलं, तरी प्रत्येकाची झोपेची गरज वेगळी असू शकते. 14 ते 17 वर्षे वयोगटातील लोकांना 8 ते 10 तासांची झोप गरजेची असते. 18 ते 64 वयोगटातील व्यक्तींना 7 ते 9 तासांची झोप गरजेची असते. तर, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना 7 ते 8 तास झोपेची गरज असते.
यातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकालाच लागू होईल असंही नाही. काहींना गाणी ऐकून रिलॅक्स वाटू शकतं, तर काहींना लिखाण करून. काही जण दररोज एक पान लिहिण्याचा किंवा एक पान वाचण्याचा व्यायाम करू शकतात. तुम्हाला काय योग्य आहे हे तपासण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला विविध प्रकारचे मेंटल व्यायाम करून पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे सूट होतंय, ते पुढे कायम करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.