- डॉ. मालविका तांबे
घरोघरी शारदीय नवरात्राचे आगमन उत्साहात झालेले आहे. देवीचा आशीर्वाद असा तर आयुष्य सदैव धन, धान्य, समृद्धी, ऐश्र्वर्य, बल, आरोग्य, समाधान वगैरे परिपूर्ण असते. देवीच्या पूजेसाठी घरी मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात, घर सजवले जाते, देवीसमोर आरास केली जाते, रोज घरी आरत्या म्हटल्या जातात, महाप्रसाद केला जातो, देवीच्या उपासनेसाठी गरबा केला जातो. भारतीय संस्कृतीत नवरात्रात बरेच नियम पाळण्याची पद्धत असल्याचे दिसते.
असे नियम पाळल्याने आध्यात्मिक फायदा तर होतोच, बरोबरीने शरीर, मन व आत्मा या तिन्हींची शुद्धी व्हायला मदत मिळते. देवीची वेगवेगळी स्तोत्रे नियमाने म्हणणे, पायात चपला न घालणे, केस न कापणे, दाढी न करणे, यज्ञ-होम-यागादी करणे, उपवास करणे, ब्रह्मचर्यपालन करणे, सात्त्विक अन्न घेणे असे वेगवेगळे नियम अनेक जण पाळताना दिसतात. यातील उपवास खूप महत्त्वाचा असतो.
‘उप’ म्हणजे जवळ व ‘वास’ म्हणजे राहणे, अर्थात स्वतःच्या जास्त जवळ राहणे हा खरा उपवास. जेवढे स्वतःबरोबर रमता येईल, स्वतःशी एकरूप होता येईल, तेवढे ध्यानस्थ होणे, सकारात्मक ऊर्जा शरीरात तयार होणे व आरोग्य टिकवून ठेवणे सहज होत जाते. इच्छाशक्ती वाढवायची असेल, शरीरातील चयापचय क्रियांमध्ये आरोग्यपूर्ण बदल हवे असतील, तर स्वतःबरोबर थोडा वेळ शांत घालवणे आवश्यक असते हे आज आधुनिक विज्ञानानेही हे सिद्ध केलेले आहे.
याला मदत करण्यासाठीच आपल्याकडे या वेळात वेगवेगळ्या पोथ्या वाचणे, पुराण वाचणे, एखादे चांगले पुस्तक वाचणे, स्तोत्रपाठ करणे, स्वास्थ्यसंगीत ऐकणे, ध्यान करणे याला खूप महत्त्व दिलेले आहे. सध्याच्या काळात मात्र उपवास हा केवळ खाण्यापिण्याची संबंधित राहिलेला आहे. स्वतःबरोबर थोडा वेळ घालवणे व्यक्तीला जमत नाही. कुठलीही व्यक्ती एकटी असली की मोबाइल काढून सोशल मीडिया वापरताना दिसते.
गरबा करणे हा सुद्धा यातीलच एक प्रकार आहे. स्वतःबरोबर रमून एखाद्या चांगल्या संगीतावर वा गाण्यावर ताल धरून नृत्य करण्याने मनात आनंद व सकारात्मक ऊर्जा तयार व्हायला मदत मिळते. दागिने, कपडे कुठले घालावे व कोणाबरोबर नृत्य करता येणार आहे, याचाच विचार मनात राहिला तर त्याचे परिणाम मनावर फार वेगळे होतील.
लघु भोजनं उपवासो वा लंघनम् ।
आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार केला तर खाण्यापिण्याचा उपवास हा लंघनाचाच एक प्रकार असतो. हलका आहार वा उपवास म्हणजे काहीही न खाणे हे लंघनच असते.
योग्य पद्धतीने उपवास वा लंघन केल्याने विमलेंद्रियता मलानां प्रवृत्तिः गात्रलघुता रुचिः क्षुत्तृषोरेककालमुदयः हृदयोद्गारकण्ठानां शुद्धिः रोगामार्दवमुत्साहः तन्द्रानाशश्र्च ।
1) सर्व इंद्रिये शुद्ध होतात
2) मल-मूत्र-स्वेद या मलांचे शरीराबाहेर उत्सर्जन व्यवस्थित होते
3) शरीरात हलकेपणा जाणवतो
4) तोंडाला रुची येते
5) तहान व भूक व्यवस्थित लागतात
6) येणारा ढेकर शुद्ध असतो
7) घसा मोकळा वाटतो
8) हृदयात हलकेपणा जाणवतो
9) शरीरात रोग असला तर त्याचा जोर कमी होतो
10) उत्साह उत्पन्न होतो
11) तंद्रा (डोळ्यांवर येणारा जडपणा वा झापड) नाहीशी होते.
योग्य प्रकारे उपवास म्हणजे काय?
उपवास करत असताना आपल्याला दोन विकल्प दिसतात. काही व्यक्ती सोसत नसले तरी कडक उपवास करतात तर काही उपवासाच्या निमित्ताने वेगवेगळे पदार्थ खाता येतील यासाठी उपवास करतात. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणे शरीराला त्रासदायक ठरते. त्यामुळे उपवास करतानाही आपल्याला संतुलित पद्धतीने विचार करावा लागतो. आपल्या प्रकृतीला सोसवेल असा उपवास करणे उत्तम.
म्हणून आयुर्वेदिकरीत्या उपवासाच्या वेगवेगळ्या पायऱ्या सांगता येतील.
1) काहीही न खाता राहणे
2) फक्त गरम पाणी पिणे
3) फळांचा रस घेणे
4) फळे खाणे
5) उपवासाला चालेल असा आहार दिवसातून एकदा व दोनदा घेणे
6) एकच प्रकारचे धान्य दिवसातून एकदा वा दोनदा खाणे,
7) रात्रीचे जेवण न घेणे वगैरे अनेक प्रकारे उपवास करता येतात.
उपवास करणाऱ्याला उपरोक्त सांगितलेले सगळे फायदे तर मिळाले पाहिजे पण कुठल्याही प्रकारचा त्रास होणे किंवा थकवा येता कामा नये याचाही काळजी घ्यावी लागते.
उपवासाला काय चालू शकते?-
ताजे फळ - सफरचंद, मोसंबी, डाळिंब, पपई, कलिंगड, संत्री, केळी, वगैरे ताजी फळे चिरून खाता येतात किंवा ज्यांचा रस काढता येतो अशा फळांचे रस घेता येतात. फळांच्या रसात तुळशीच्या बिया, चिया सीड्स टाकून घेणे अधिक उत्तम. आवडत असल्यास नारळाचे पाणी घेतलेले चांगले.
सुका मेवा – बदाम, पिस्ता, काजू, चारोळी, अक्रोड, पिस्ता, खजूर वगैरे सुका मेवा नुसता वा भिजवून चावून खाता येतो किंवा सुका मेवा घालून तयार केलेले मसाला दूध घेता येते. बदामाची खीर, मखाण्याची खीर, मीठ लावलेले काजू-पिस्ता-बदाम-मखाणा खाण्यात ठेवता येतात.
उपवासाच्या दिवशी दूध घेणे चांगले. यामुळे शरीराला ताकद मिळते व पोटाला बराच वेळ आधार राहतो. उपवासाच्या दिवशी स्त्रीसंतुलन कल्प, अनंत कल्प घालून दूध घेणे चालू शकते.
दही, ताक, लोणी हे उपवासाच्या दिवशी घेता येतात. घरी केलेले पनीरही उपवासाला चालू शकते.
उपवासाच्या थाळीत सहसा आपल्याला साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचा वडा, उपवासाचे थालीपीठ, बटाट्याची भाजी, बटाट्याचा कीस हे पदार्थ दिसतात; पण सुरण, लाल भोपळा, रताळे यांचाही वापर उपवासाच्या दिवशी करता येऊ शकतो. थालीपीठ करत असताना त्यात रताळे किसून घालता येते.
भाजी करते वेळी बटाट्याचा रस्सा न करता सुरणाचा रस्सा करता येतो.
रताळे उकडून किंवा ओव्हनमध्ये भाजून त्यावर लिंबू, मीठ, मिरी पूड टाकून खाल्ल्यास चविष्ट लागते.
वरई (भगर-सामो) बऱ्याच लोकांना आवडत नाही; पण खरे म्हणजे उपवासाच्या दिवशी वरईचा भात हा भाताला उत्तम पर्याय आहे. वरईचा भात करत असताना त्यात भाज्या किसून वा चिरून घातल्या तर भाताला उत्तम चव येते. नुसती भगर शिजवून केलेला भाताबरोबर भाज्यांची आमटी करून खाता येतो. असा आमटी-भात पचायला सोपा असतो व यामुळे ताकदही मिळते.
थालीपीठ करताना राजगिऱ्याचे पीठ वापरता येते. राजगिऱ्याच्या लाह्या दुधाबरोबर अत्यंत उत्तम लागतात. एवढेच नव्हे तर फोडणी देऊन राजगिराच्या लाह्यांचा ताकात फांट करता येतो.
दह्यात मिरी व सैंधव घालून केलेले फ्रुट सॅलड अत्यंत उत्तम लागते. यात काही प्रमाणात सुका मेवाही घालता येतो.
काकडी वा लाल भोपळ्याचे रायते, खोबऱ्याची वा दाण्याची चटणी तोंडी लावायला करता येते.
भाजलेले शिंगाडे, शिंगाड्याची खीर, शिंगाड्याचा शिरा उपवासाला चालू शकतो.
आपल्या प्रकृतीचा विचार करून उपवासाच्या दिवशी वेगवेगळे पदार्थ आहारात ठेवता येतात.
काही लोकांना उपवास करायची इच्छा नसते पण तरीही या काळात सात्त्विक आहार ठेवून अग्निसंवर्धन करता येऊ शकते.
या काळात आहार सात्त्विक ठेवावा, अर्थात कांदा-लसूण वगैरेंचा वापर करू नये.
सकाळच्या नाश्त्याला साळीच्या लाह्या, मुगाची धिरडी वगैरे ठेवावी.
भाजलेल्या तांदळाचा भात, ज्वारी-बाजरी-नाचणी वगैरेंची भाकरी, दुधी भोपळा, घोसाळी, पडवळ, परवर, दोडके वगैरे फळभाज्या, मूग, मसूर, तूर डाळीची आमटी, ताजे ताक यांचा आहारात समावेश असावा.
अनेकांमध्ये असा संभ्रम दिसतो की सैंधव मीठ उपवासालाच खावे. पण खरे तर सैंधव मीठ आरोग्यासाठी उत्तम असते. त्यामुळे वर्षभर सैंधव मिठाचा वापर करणे उत्तम असते.
सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे या काळात उपासना करण्याच्या दृष्टीने पोट फार भरलेले नसावे. त्यामुळे भुकेपेक्षा थोडे कमी खाणेच प्रशस्त. एकूणच उपवास किंवा लंघन केले तर शरीरातील दोषांचे असंतुलन कमी व्हायला मदत मिळते, वाढलेल्या दोषांचे पचन होते, शरीराला हलकेपणा येतो, तोंडाला रुची येते, आहार घेण्याची इच्छा होते, मुख्य म्हणजे जाठराग्नी प्रदीप्त होतो. घेतलेल्या आहाराचे पचन व्यवस्थित झाले तर आरोग्याची प्राप्ती होणे व शरीरातील बल व ओज वाढणे क्रमप्राप्त आहे.
त्यामुळे नवरात्रीचे नऊ दिवस आहाराचे संतुलन ठेवले तर आरोग्यप्राप्ती होऊन शक्ती वाढायला नक्की मदत मिळू शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.