- डॉ. मालविका तांबे
संपूर्ण देशभरात शारदीय नवरात्राचा उत्साहाने साजरा केला जातो आहे. या नऊ दिवसांत देवीच्या विविध शक्तीची नऊ विविध रूपांमध्ये उपासना केली जाते. देवीच्या पूजेत हळद, कुंकू, फुले, चंदन, नारळ, महानैवेद्य वगैरे बऱ्याच गोष्टी वापरल्या जातात. त्यात एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे देवीचा शृंगार.
देवीच्या शृंगाराकरता फळे, फुले, साड्या, पोशाख, सुवर्ण, रजत (चांदी) व वेगवेगळी रत्ने वापरली जातात. प्रत्येक जण आपापल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे देवीच्या शृंगाराकरिता वेगवेगळ्या वस्तू वापरत असतो. देवी आपल्याला समृद्धी, भरभराटीचा आशीर्वाद देते, तिला दागिने घालण्याची पद्धत आहे. नऊ दिवस देवीची उपासना झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी सुवर्णदानाला खूप महत्त्व दिलेले आहे.
आयुर्वेदातही सुवर्ण, रत्न यांना आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व दिलले आहे. आज आपण नवरात्र व दसरा या निमित्ताने त्याबद्दल काही माहिती बघू या.
रत्न अर्थात पृथ्वीतून मिळालेले आकर्षक मिनरलचे दगड, ज्याला व्यवस्थित पैलू पाडले, पॉलिश केले तर त्यांचे आभूषणात उपयोग करता येतो. आयुर्वेदात रसशास्त्रात आपल्याला रत्नांचा उल्लेख सापडतो.
रसे रसायने दाने धारणे देवतार्चने ।
सुलक्ष्याणि सुजातीनि रत्नयुक्तानि सिद्धये ।।
सुलक्षणी अर्थात चांगल्या प्रतीची रत्ने पारदावर कार्य करण्यासाठी, रसायन म्हणून, दान करण्याकरिता व देवांची पूजा करण्यासाठी वापरली जातात.
माणिक्य, मुक्ताफळ (मोती), विद्रुम (प्रवाळ), पन्ना (तार्क्ष्य-पाचू), पुष्कर (टोपॅझ), हीरक (हिरा), नीलम (सफायर), गोमेद (झिरकॉन), वैडूर्य (कॅटस् आय) ही नऊ रत्ने आहेत. ही नऊ रत्ने शरीरात वापरण्यासाठी त्याची बायो ॲव्हेबिलिटी वाढवण्यासाठी त्यांच्यावर काही प्रक्रिया गेल्या जातात, ज्यांना शोधन व मारण असे म्हटले जाते.
रत्नांवर काम करताना लक्षत ठेवणे आवश्यक असते की रत्ने शीतल गुणधर्माची असतात, उष्णतेचा त्यांच्यावर लगेच चुकीचा प्रभाव (हीट सेन्सेटिव्ह) होतो. त्यामुळे रत्नांचे शोधन व मारण करत असताना रत्नांना गुलाबपाणी, गोमूत्र, गोदुग्ध, वनस्पतींचे काढे वगैरेसारख्या द्रवांबरोबर संस्कारित केले जाते. यामुळे त्यांच्या अणूंचा आकार इतका सूक्ष्म होतो की तो शरीराच्या आत पेशींपर्यंत जाऊन काम करू शकतो. त्याचे शोषण व सात्म्यीकरण व्यवस्थित होऊ शकेल पण त्यांची कार्यक्षमता कमी होणार नाही.
माणिक : माणिक चवीला मधुर, स्निग्घ व वृष्य (वीर्यवृद्धी करणारे) गुणाचे, हृदयाला बल देणारे, पचन सुधवरणारे, मेधा वाढविणारे, शरीराला बल देणारे , कायाकल्प करणारे अर्थात रसायन गुणाचे, रोगांना कमी करणारे, वात-पित्ताचे शमन करणारे असते. यात प्रामुख्याने ॲल्युमिनियम ऑक्साइड, क्रोमियम व टिटॅनियम असते. याचा उपयोग ध्वजभंग, क्षय वगैरेंत रसायन व वाजीकरणाकरता केला जातो.
मुक्ता : म्हणजे मोती. हे मधुर रसप्रधान, लघु व शीतवीर्याचे असतात. कफ व पित्ताचे शमन करतात. मोती कांती सुधरवायला मदत करतात, अग्नीची वृद्धी करतात, विष कमी करतात, वीर्य वाढवतात, दीपन व पाचन कर्म करतात, दुखणे, कास, श्र्वास कमी करतात, आयुष्यवृद्धी करणारे, डोळ्यांसाठी उत्तम, शरीरातील दाह कमी करणारे, जीर्णज्वर वगैरैंत अत्यंत उपयोगी, अस्थी व दात यांचे विवर्धन करणारे, हृद्य, मेहहर (मधुमेह व प्रमेह कमी करणारे) असतात.
त्यामुळे बऱ्याच औषधी योगांमध्ये मोत्यांचा उपयोग होताना दिसतो. चक्षुष्य गुणामुळे संतुलन सॅन अंजन क्लिअरमध्ये मोत्यांचा वापर केला जातो. तसेच संतुलन प्रवाळपंचामृत मोतीयुक्त हे सुद्धा रसायन म्हणून अनेक आजारांमध्ये चांगला परिणाम करताना दिसते. मोती स्वतः तर आकर्षक असतोच, पण मोत्याची माळ घातल्यावर चेहऱ्यावर एक वेगळाच लोभसपणा दिसतो तसेच मोती घातल्यानंतर राग कमी होणे, मूड स्विंग्ज कमी होणे वगैरे परिणाम झाल्याचे दिसते.
प्रवाळ : प्रवाळ समुद्रात मिळते व रंगाने लाल असते. प्रवाळ आयुर्वेदानुसार नैसर्गिक कॅल्शियमचा स्रोत आहे. क्षय, रक्तपित्त, कास या तिन्ही रोगांमध्ये प्रवाळ उत्तम असते. प्रवाळ दीपन, पाचन, लघु, विषघ्न, मूत्रल असते. प्रवाळ डोळ्यांसाठी अत्यंत उत्तम समजले जाते. प्रवाळ त्रिदोषशामक व शीतल गुणधर्माचे असते. त्यामुळे आयुर्वेदातील अनेक औषधांमध्ये याचा उपयोग केला जातो. प्रवाळाचे बरेच प्रकार असतात.
तसेच प्रवाळाचा कुठला भाग वापरला जात आहे त्यावरूनही त्याचे गुण कमी-जास्ती होतात. संतुलनच्या पित्तशांती, प्रवाळपंचामृत गोळ्या तसेच गुलंकद स्पेशलमध्ये याचा आवर्जून वापर केला जातो. औषधीकरणासाठी लाल रंगाचे, वर्तुळाकार, वेडेवाकडे नसलेले, स्निग्ध, लांब व स्थूल अशा प्रकारचे प्रवाळ वापरायला सांगितलेले आहे. तरच प्रवाळाचे औषधी उपयोग चांगल्या प्रकारे होताना दिसतो.
तार्क्ष्य : म्हणजे पाचू. पाचू रंगाने हिरवा असतो. पाचू हा सिलिका, बेरेलियम व ऑक्सिजन यांच्यापासून बनलेले संयुग असतो. पाचू शरीरात ओजवृद्धी करतो, ताप-उलट्या, अति तहान लागणे, ॲसिडीटी, श्र्वास घ्यायला त्रास होणे, खोकला, ॲनिमिया, पोट साफ न होणे, प्रमेह, मधुमेह वगैरे रोगांमध्ये उपयुक्त असतो. हा स्मृती वाढवतो, व आयुष्याची वृद्धी करतो. वेगवेगळ्या रसौषधींमध्ये याचा वापर केला जातो.
पुष्पराग, पुष्कराज : हा अग्निवृद्धी करतो. विषाचा निचरा करण्यास उत्तम, कफ-वात संतुलित करणारा, दाह व कुष्ठरोग कमी करायला मदत करणारा आहे.
वज्र, हिरा, हीरक –
आयुष्प्रदं झटिति सद्गुणञ्च वृष्यं दोषत्रयप्रशमनं सकलामयघ्नम् ।
सूतेन्द्रबन्धवधसद्गुणकृत् प्रदीपनं मृत्युञ्जयं तदमृतोपममेव वज्रम् ।।..रसरत्नसमुच्चय
सगळ्या महारत्नांमध्ये हिरा सगळ्यांच्या आवडीचा असतो. पांढरा व स्वच्छ हिरा अत्यंत उत्तम समजला जातो. हा आयुष्यवृद्धी करणारा, त्रिदोषांना हरण करणारा असून उत्तम रसायन आहे, हिरा शरीराला बल देतो, शोष, क्षय, भगंदर, प्रमेह, पांडू व शोथ या रोगांवर उत्तम काम करतो. हिरा योगवाही गुणाचा असून यात सहाही रस स्थित असतात. किंवर, मधुमेह, टीबी, हृदयाचे वेगवेगळे त्रास, डोळ्यांशी संबंधित आजार या सगळ्यांमध्ये चांगल्या प्रकारे बनविलेले हीरक भस्म उपयोगी ठरू शकते. त्रैलोक्यगर्भचिंतामणी रस, वसंतकुसुमाकर रस वगैरे औषधांमध्ये हीरक भस्म वापरले जाते.
नीलम : नावाप्रमाणे हे महारत्न रंगाने निळे असते. याच्यात प्रामुख्याने ॲल्युमिनियम व ऑक्सिजन असतो. हे त्रिदोषघ्न, वृष्य, बल्य, बुद्धिवर्धन, हृद्य व रसायन गुणांचे असते.
गोमेद (झिरकॉन) : हा कफपित्तशामक असतो. रक्ताल्पता, अपचन, अरुची, त्वचाविकार इत्यादींमध्ये उपयुक्त असतो. तसेच हा बुद्धिवर्धन करतो.
वैडूर्य (कॅटस् आय) : वैडूर्य मांजरीच्या डोळ्यांच्या रंगासारखा असतो. रक्त, पित्ताच्या त्रासांमध्ये, माल ॲब्सॉर्बशनमध्ये, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, डोळ्यांचे आजार वगैरेंत याचा चांगला उपयोग होताना दिसतो.
सुवर्ण : नऊ ग्रहांना महत्त्व असले तरी जसे नऊ ग्रह सूर्याला प्रदक्षिणा करतात तसे नवरत्नांना कितीही महत्त्व असले तरी त्यांची आभूषणे तयार करायला किंवा औषधांमध्ये वापर करायला कुठे ना कुठे सुवर्णाची मदत नक्कीच लागते. सुवर्ण चवीला मधुर व कषाय असते, वीर्याने शीत असते, गुणांनी लघु असते, शरीरात वीर्य वाढवते, मेध्य गुणाचे असते. यक्ष्मा, त्रिदोष, विष या सगळ्यांना कमी करायला मदत करते. जन्म झाल्यावर लगेच रसायन म्हणून देण्याची उपयुक्तता सुवर्णाचीच आहे.
संतुलनमध्ये लहान मुलांना सुवर्णप्राशन संस्कार करण्यासाठी संतुलन बालामृतसारखे रसायन तयार केले आहे, जे द्यायला अगदी सोपे असते. तसेच वर्षापेक्षा मोठ्यांसाठी संतुलन अमृतशर्करा हा सुवर्णयोग पंचामृत किंवा दुधात घालून प्रत्येकाला घेणे चांगले असते. कुठल्याही दीर्घ आजारामधून बरे होत असताना, गर्भसंसंस्कारासाठी पुरुष व स्त्री आरोग्याची तयारी करत असताना, वाढत्या वयातील मुलांच्या विकासासाठी असा अनेक ठिकाणी पंचामृत घ्यावे, असा सल्ला श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे देत असत.
आपल्या संस्कृतीत असलेली प्रत्येक गोष्ट आयुर्वेदाच्या कसोटीवर पारखून घेता येते. आयुर्वेदशास्त्र हे जीवनाचे शास्त्र असल्यामुळे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचे मार्गदर्शन मिळणे सोपे जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.