जून महिना म्हटले की शाळेचे वेध लागणे स्वाभाविक असते. नवीन पुस्तके, नवीन वह्या, नवीन शिक्षक, नवा अभ्यासक्रम यांचे अप्रूप सर्वांना असते. सध्या शिक्षणाचा परीघ खूपच विस्तारलेला दिसतो, पण सर्व शिक्षणाचा पाया असतो तो शालेय शिक्षण. शाळेमध्ये अभ्यास सर्वांत महत्त्वाचा असतोच, पण शाळेतल्या इतर मुलांबरोबर मिळून-मिसळून वागणे, शिक्षकांबद्दल मनात आदर बाळगणे, अभ्यासाबरोबरीने खेळ, वक्तृत्व, संगीत वगैरे विषयांत प्रगती साधणे, यांसारख्या गोष्टीही अपेक्षित असतात. शिस्त व अनुशासनाचा पायाही शाळेतच पक्का होत असतो. हे सर्व जमण्यासाठी, हे सर्व साधण्यासाठी ‘आरोग्य’ सर्वांत महत्त्वाचे.
आयुर्वेदाच्या ग्रंथांमधून प्राचीन काळच्या शिक्षणाबद्दलही माहिती मिळू शकते. गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेताना सर्वप्रथम शास्त्राची म्हणजे विषयाची, सध्याच्या भाषेत प्रोफेशनची निवड सर्वप्रथम करायला सांगितली आहे. त्यानंतर शास्त्र शिकविणारे आचार्य म्हणजे शिक्षक शिकविण्यासाठी सक्षम आहेत का नाही हे पहायला सांगितले आहे. त्यानंतर शिक्षण ज्या जागी घ्यायचे, ज्या पद्धतीने घ्यायचे त्याकडे लक्ष द्यायला सांगितले आहे आणि यानंतर विद्यार्थी शिक्षण घेण्यास सक्षम आहे की नाही हे पाहून शिक्षणाला सुरुवात करायला सांगितले आहे.
गुरुकुल पद्धतीतील सर्वच गोष्टी आजच्या आधुनिक काळातल्या शिक्षण संस्थेत आचरणात आणता येणार नाहीत, पण काळ बदलला, विषय बदलला तरी काही मुख्य, मूलभूत गोष्टी तशाच राहतात. शालेय जीवनात सक्षमता उत्तम ठेवण्यासाठी आजही आपण त्यांचा आधार घेऊ शकतो. शाळेची, शाळेतील विद्यार्थ्यांची सक्षमता वाढवायची असेल तर सर्वप्रथम शिक्षक उत्तम गुणांनी युक्त असायला हवेत. शिक्षक ‘पर्यवदातश्रुत’ म्हणजे विषयातील सर्व मर्मे चांगल्या प्रकारे ज्ञात असलेले हवेत. त्यांना फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर त्याचे प्रात्यक्षिक पाहिलेले, केलेले असलेले हवे. शिक्षकांकडून अपेक्षित असणारी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ‘शिष्यवत्सल’ म्हणजे सर्व विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे, सर्वांनाच मनापासून शिकवण्यात तत्पर असणारे असावेत. तसेच शिक्षक ‘ज्ञानसमर्थ’ म्हणजे विषय समजवण्यात चतुर असावेत. विद्यार्थ्यांच्या मनात विषयाबद्दल उत्सुकता निर्माण होईल आणि ते मनापासून विषय समजून घेण्याचा प्रयत्न करातील अशा प्रकारे शिकविणारे असावेत.
यानंतर अध्ययन विधीमध्ये सर्वात महत्त्वाचे सांगितले, ‘प्रातरुत्थाय’ म्हणजे विद्यार्थ्याने सकाळी लवकर उठावे. लहान वयात सकाळी लवकर उठण्याची सवय लागणे सोपे असते व नंतर ही सवय आरोग्याच्या दृष्टीने आयुष्यभर मदत करणारी असते. सकाळी लवकर उठण्याने मल-मूत्रविसर्जन क्रिया व्यवस्थित होते, त्यामुळे पचन चांगले राहते आणि ओघानेच आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. सकाळी केलेला अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहतो हे तर सर्वज्ञात आहेच.
यानंतर सांगितले, ‘शुचौ देशे सुखोपविष्टः’ म्हणजे स्वच्छ ठिकाणी सुखपूर्वक बसून अभ्यास करावा. स्वच्छ जागा शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाची असतेच, पण अभ्यास करताना मन शांत असणेही आवश्यक असते व स्वच्छ, शांत ठिकाणी मन अधिक चांगल्या प्रकारे एकाग्र होऊ शकते आणि बुद्धी अधिक चांगल्या प्रकारे ज्ञान ग्रहण करू शकते. या ठिकाणी स्वच्छता ही फक्त वर्गापुरती मर्यादित नाही. एकंदर शाळेचा परिसरच स्वच्छ असण्याकडे लक्ष द्यायला हवे. बऱ्याचदा वर्ग, मैदान वगैरे जागा स्वच्छ केल्या जात असल्या तरी स्वच्छतागृह, मुले डबा खातात ती जागा अस्वच्छ असू शकते. परिसर स्वच्छ राहावा, शुद्ध राहावा यासाठी संपूर्ण शाळेत सुगंधी, हवा शुद्ध करण्याची क्षमता असणाऱ्या द्रव्यांचा धूप करत आला तर उत्तम. वारंवार सर्दी-खोकला-ताप येऊन शाळा बुडण्याचे प्रमाण यामुळे निश्चित कमी होईल.
शिक्षणप्रक्रियेतला सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी. विद्यार्थ्याने ‘ब्रह्मचारिणा’ म्हणजे ज्ञानसंपादन हेच एकमेव लक्ष्य ठेवावे. इतर इंद्रियांच्या आहारी जाणे टाळावे. मनात उत्तेजना उत्पन्न करून वीर्यनाश होईल असे चुकीचे विचार येतील असे वाचन, दृश्य यापासून कटाक्षाने दूर राहावे. विद्यार्थिदशेत ‘अमांसादेन’ राहावे, म्हणजे मांसाहार वर्ज्य करावा. अभ्यास करणे, ज्ञानार्जन करणे हे मेंदूचे, बुद्धीचे काम असते. बुद्धी तल्लख हवी असेल तर त्यासाठी सात्त्विकता हवी. खूप चमचमीत, जड, मांसाहारासारखा तामसिक आहार केला तर शरीर जड होते, तसेच बुद्धीही मंदावते. याचा विद्यार्थिदशेत अडथळा निर्माण होऊ शकतो.
मांसाहार करू नये, उलट विद्यार्थ्यांनी ‘मेध्यसेविना’ म्हणजे मेधा-स्मृतिवर्धक द्रव्यांचे सेवन करावे. यात दूध, लोणी, घरचे साजूक तूप, पंचामृत, सुवर्णसिद्ध जल, रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम, ब्राह्मी, वचा वगैरे मेधा-स्मृतिवर्धक द्रव्यांनी संस्कारित केलेले ब्रह्मलीन घृत किंवा सिरप वगैरेंचा समावेश होतो. या सर्व वस्तू नियमितपणे आहारात अंतर्भूत केल्या तर त्याचा शालेय जीवनातील सक्षमता वाढविण्यासाठी नक्कीच उपयोग होतो. विद्यार्थ्यांनी ‘अनन्यमनसा’ म्हणजे एकाच वेळी अनेक प्रकारच्या विषयात रुची ठेवू नये. विरंगुळा म्हणून थोडा वेळ कुठल्या तरी हलक्या फुलक्या विषयात मन रमविणे वेगळे, पण शिक्षण चालू असताना डोक्यात मुख्य विषय ज्ञानार्जनच असावा. इतर गोष्टींमध्ये मन गुंतले तर मुख्य विषयातील कार्यक्षमता कमी होईल यात शंका नाही.
शाळेतील सक्षमता वाढवायची असेल तर मनाची एकाग्रता वाढविणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी सूर्यनमस्कारासारखी योगासने करण्याचा उपयोग होतो. नियमितपणे ॐकार गुंजन करण्याचाही फायदा होतो. लहानपणी सुवर्णप्राशन संस्कार केलेला असला तर मनाची एकाग्रता अधिक चांगल्या प्रकारे साधता येते असे आढळते. बऱ्याचदा सर्दी, घसादुखी, खोकला, ताप यांसारख्या तक्रारींमुळे मुले शाळेत जाऊ शकत नाहीत आणि याचा परिणाम अभ्यासावर होतो. असे होऊ नये म्हणून मुलांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहील याकडे लक्ष द्यायला हवे. दूध, लोणी, तुपासारख्या गोष्टी नियमित आहारात ठेवणे उत्तम असतेच, शिवाय अंगाला नियमितपणे तेलाचा अभ्यंग करण्यानेही मुलांची प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत मिळते. च्यवनप्राशसारखे रसायन घेण्याचा, दुधात टाकून चैतन्य कल्प घेण्याचाही उत्तम फायदा होताना दिसतो.
प्रतिकारशक्ती चांगला राहिली की सर्दी-ताप येणारच नाही, पण तरीही एखाद्या वेळी सर्दी होते आहे, घसा दुखणार आहे असे वाटले तर लगेच सितोपलादिसारखे प्रतिकारशक्ती वाढविणारे चूर्ण घेणे; ज्येष्ठमध, बेहडा, अडुळशाची पाने यांचा काढा घेणे किंवा गवती चहा, दालचिनी, पुदिना, आले यांचा चहा करून घेणे यांसारखे साधे उपाय करणेच चांगले. छोट्या कारणासाठी खूप तीव्र, तीक्ष्ण औषध घेतल्याने लगेच बरे वाटेल असे वाटले तरी त्यामुळे मूळ प्रतिकारशक्ती कमी होऊन पुन्हा पुन्हा त्रास होण्याची शक्यता वाढते.
शाळेतील सक्षमता उत्तम राहण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देण्याची मोठी गरज असते. त्यासाठी आहार-रसायनांची मदत घ्यायला हवीच पण अवास्तव अपेक्षांच्या ओझ्याखाली मूल दबत नाही ना याकडेही लक्ष ठेवायला हवे. जन्मतः मुलांमध्ये आलेली आवड, निसर्गतः आलेले गुण अजून खुलतील याकडे घरातल्यांनी, शिक्षकांनी लक्ष दिले तर मुलांची फक्त शाळेतीलच नाही तर भावी आयुष्यातली सक्षमता वाढेल हे नक्की.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन,
व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.