पुणे : ‘‘डाएट म्हटलं की सॅलड, वाफवलेल्या भाज्या, नावडते पदार्थ, हिरव्या भाज्या, तूप आणि तेल नको, असे चित्र डोळ्यासमोर येते. डाएट म्हणजे कमी खाणे नव्हे, तर तुमचा आहार सकस आणि प्रथिनयुक्त असणे गरजेचे आहे. वजन कमी करण्यापेक्षा शरीरातील अनावश्यक ‘फॅट’ कमी करण्यावर भर द्या. तुमचा आहार जितका साधा तितके तुमचे आरोग्य चांगले राहील. डाएट म्हणून आहारात कोणत्याही फॅन्सी पदार्थांचा समावेश करण्याची गरज नाही. तुम्ही जे नियमित खाता तेच खाणे योग्य, फक्त आपला आहार अधिकाधिक प्रथिनयुक्त असायला हवा,’’ असा सल्ला आहारतज्ज्ञ आणि न्यूट्रिशियनिस्ट नुपूर पाटील यांनी दिला.
डाएटचे फायदे
शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढेल, हाडे मजबूत होतील
कायम ताजेतवाने वाटेल
त्वचा, केसांचे आरोग्य सुधारेल
तुम्ही तरुण दिसायला लागाल
अनावश्यक फॅट कमी करण्यावर भर द्या
डाएट म्हणून ‘फॅन्सी’ पदार्थ खाण्याची गरज नाही
असा असावा रोजचा ‘डाएट’
सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यावे (गरम पाणी आणि लिंबूदेखील घेता येईल)
पोटभर नाश्ता करावा (पोहे, इडली, डोसा, अंडी असे पदार्थ असावेत)
नाश्त्यानंतर दहा मिनिटांनी तुम्हाला सवय असेल तर चहा, कॉफी घ्यायला हरकत नाही
दुपारचे जेवण : पोळी-भाजी (पोळी/भाकरी/भात यापैकी एक), सॅलड, ताक किंवा दही
सायंकाळी सुकामेवा, घरगुती चिवडा खाऊ शकता
रात्रीचे जेवण : दररोज नियमित जेवतो तसेच जेवण करा. पण झोपण्याच्या दोन तास आधी जेवावे.
पाटील यांनी दिलेल्या १० टिप्स
दिवसभरात तीन लिटर पाणी प्यावे
झोपण्यापूर्वी आणि झोपताना सोबत कोणतेही डिवाइज असू नये (उदा. मोबाईल, टिव्ही, लॅपटॉप)
दररोज किमान ३० ते ४० मिनिटे व्यायाम करावा (चालणे, योगासने किंवा घरात राहून व्यायाम)
तुमचे जेवण संतुलित करा
दररोज आणि आयुष्यभर करता येईल असेच ‘डाएट’ स्वीकारा
‘फॅन्सी डाएट’च्या मागे लागू नका
प्रथिनयुक्त आहारावर भर द्या
कोणतेही ‘डाएट’ करा; पण त्यात सातत्य आणि शिस्त पाळा
चांगला आणि सकस आहारच तुम्हाला निरोगी ठेवेल.
‘डाएट’साठी विदेशी पदार्थांचे अनुकरण करण्याची गरज नाही
‘सकाळ’च्या ‘स्वास्थ्यम’ उपक्रमात पाटील यांनी ‘रिअल मीनिंग ऑफ डाएट’ विषयावर संवाद साधला. ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी पाटील यांचे स्वागत केले. पाटील म्हणाल्या, ‘‘वजन कमी करण्यासाठी नागरिक ‘डाएट’चे वेगवेगळे प्रकार स्वीकारतात आणि मग त्याचा काहीच परिणाम होत नाही. ‘डाएट’च्या नावाखाली अन्नालाच शत्रू बनविले जाते, परिस्थितीला दोष दिला जातो. एवढंच नव्हे तर डाएट म्हणून पाश्चात्त्य, विदेशी पदार्थच खाल्ले जातात. पण भारतीय आहारामध्ये असणारी प्रथिनांची कमतरता भरून काढून आपला आहार प्रथिनयुक्त करण्यावर भर द्यायला हवा.’’
‘‘आपण योग्य प्रकारे आहार न घेतल्यास आपली प्रतिकारशक्ती कमी होईल, हाडे ठिसूळ होतील, हार्मोन्स असंतुलित होतील. त्यामुळे दररोजच्या आहाराकडे लक्ष द्या,’’ असेही पाटील यांनी सुचविले. चांगला आहार न घेतल्यास आरोग्यावर होणारा परिणाम, चांगले डाएट कसे असावे, कोणते डाएट अजिबात स्वीकारू नये, याबाबत पाटील यांनी माहिती दिली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत पाटील यांनी टाळ्यांच्या कडकडाटात नागरिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.