Nagpur News : मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटीत हृदविकाराच्या ३७ महिला रूग्णांच्या झोपेच्या चक्राचा अभ्यास केला. यात हृदयविकाराने दगावलेल्या ८ व्यक्तींपैकी ७ जणांना किमान महिना ते दीड महिनापूर्वीपासून भयावह स्वप्न पडत होते, असे आढळले.
या स्वप्नांमुळे हृदयाचा रक्तपुरवठा खंडित झाला आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे अभ्यासातून समोर आले. अशी माहिती ज्येष्ठ श्वसनविकार तज्ज्ञ, सुपर स्पेशालिटीच्या पल्मनरी विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेतर्फे १५ मार्च हा जागतिक निद्रा दिवस पाळण्यात येतो. या पार्श्वभूमीवर डॉ. मेश्राम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुपरमध्ये अभ्यास केलेल्या ३७ व्यक्तींपैकी ७ जणांना पहाटे ४ ते ६ या वेळेत हृदयविकाराचा झटका आला.
त्यांची झोपेची गुणवत्ता घसरली होती. त्यांना महिनाभरापासून वाईट स्वप्न पडत होते. त्यामुळे त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावत गेल्या. उर्वरित २९ लोकांना दुपारी हृदयविकाराचा झटका आला. या अवस्थेला गुणवत्तापूर्ण झोपेचा अभाव कारणीभूत असल्याचे अभ्यासातून समोर आले, असे डॉ. मेश्राम यांनी यावेळी नमूद केले.
बॅड स्लिपची हिस्ट्री- ७२ टक्के
उच्चरक्तदाब- ६२ टक्के
मधुमेह -४० टक्के
धूम्रपानाचे व्यसन - १८ टक्के
मद्यपानाचे व्यसन - २४ टक्के
तंबाखूचे व्यसन- २८ टक्के
झोपेचे विकार - २२ टक्के
झोपेची गुणवत्ता -७८ टक्के
पुरेशी झोप रोगाला प्रतिकार करणाऱ्या पेशींची झिजही भरून काढते. झोपेत ‘अम्युलाईड’ रसायन तयार होऊन शरिरातून बाहेर पडल्यास स्मरणशक्तीशी निगडीत पेशी निरोगी राहतात. मात्र झोप अपुरी राहिल्यास हे रसायन शरिराबाहेर पडत नाही तर ते मेंदूत साचते. स्मरणशक्तीच्या पेशींना ते घातक ठरते. कॅन्सरच्या पेशींशी लढणाऱ्या रोगप्रतिकारशक्तीच्या बाबतीतही हेच घडते, असे डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले.
फोन कंपन्या दीड जीबी डाटा देऊन आपल्याला झोपेपासून दूर नेत आहेत. ओटीटीसारखे प्लेटफार्म, सोशल मिडियाने झोपेवर अतिक्रमण केले आहे. कमी झोपणार, तेवढेच आपण अस्वस्थ होणार. आपल्या झोपेचा सौदा होऊ देऊ नका, असे झाल्यास वेळेआधीच वृद्ध व्हाल. आपल्या झोपेला दुसऱ्यांची नाही तर आपलीच नजर लागली आहे. सुखाची झोप घ्या आणि आरोग्य सुदृढ ठेवा.
-डॉ. सुशांत मेश्राम, विभागप्रमुख, श्वसनरोग, मेडिकल-सुपर.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.