World Blood Donor Day : आपले रक्त दुसऱ्याचे जीवन आहे...याच भावनेतून अनेक रक्तदाते रक्तदान करत असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत रक्ताचा तुटवडा रुग्णालयात जाणवत असल्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. कोरोना काळात रक्त, प्लाझ्मा, प्लेटलेट्स या सगळ्यांची किती गरज होती याचा अनुभव आपणा सर्वांनाच आला आहे.
रक्ताचा तुटवडा भासू नये, नागरिकांनी रक्तदान करण्यात पुढाकार घ्यावा यासाठी रक्तदान चळवळ उभी रहात असते. याच रक्तदान चळवळीतील रक्तदाता ही तितकाच महत्वाचा आहे.
14 जून या जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने कोरोना काळात नोकरी सोडून रुग्ण सेवेचा वसा हाती घेत शेकडो रुग्णांना रक्ताची गरज पुरविण्यासाठी पुढाकार घेतलेल्या कल्याण येथील किशोर सातपुते याने रक्तदाताचे महत्व, त्याला काय मिळायला हवे आणि रक्तदान क्षेत्रात काय बदल अपेक्षित आहेत याविषयी मत मांडले आहे.
कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत रक्ताचा तसेच प्लाझ्माचा तुटवडा जाणवत होता. सोशल मिडीयावर रक्ताची गरज आहे असेच संदेश मोठ्या प्रमाणात येत होते. कल्याण येथे राहणारा किशोर हा तसा हाडाचा सामाजिक कार्यकर्ता आहे. कोरोनात रुग्णांना भासणारी रक्ताची गरज लक्षात घेता त्याने त्याच्या नोकरीवर पाणी सोडून याच क्षेत्रात काही तरी करण्याचे ठरविले. रुग्णांना रक्त मिळवून देण्यात तो सहकार्य करत होता.
मित्र ऋषी साबळे याला हाताशी घेत त्याने समाज माध्यमावर एक नेटवर्क तयार करत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आजूबाजूच्या परिसरातील रुग्णालयांची माहिती, रक्तदात्यांची माहिती, रक्तपेढ्यांची माहिती कनेक्ट करुन एक अनोखी रक्तदान चळवळ उभी केली आणि शेकडो रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. कोरोनाचा काळ आता सरला आहे, मात्र रक्ताची गरज आजही रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांना भासत असून किशोर व ऋषी यांनी आपले काम सुरु ठेवले आहे.
आज अनेक तरुणांचे हात त्यांना या चळवळीत येऊन मिळाले आहेत. काम व्यवस्थित सुरु असले तरी किशोरच्या मनात मात्र अनेक प्रश्न असून रक्तदात्याला यातून काही मिळत नसल्याची खंत तो व्यक्त करतो. रक्तदान चळवळीत रक्तदाता हाच महत्त्वाचा दुवा आहे. परंतू प्रमाणपत्र, कार्ड आणि त्याच्या नातेवाईकांना किंवा त्याला गरज भासल्यास एक पिशवी रक्त यापलीकडे त्यांना काही मिळत नाही. समाजातही त्यांना हवी तशी ओळख मिळत नसल्याने त्यांच्यासाठी काही तरी करण्याचा प्रयत्न असल्याचे किशोर सांगतो.
रक्तदात्यांना मिळायला हवी कौतुकाची थाप
किशोर सांगतो आम्ही अपघाताने या क्षेत्रात उतरलो आहोत. परंतू जेव्हापासून काम करत आहोत एकच खंत वारंवार जाणवत आहे. जेव्हा केव्हा रक्ताची गरज लागली आहे मग तो कोरोना काळ का असेना रक्तदात्यांनी कसलीच भीती न बाळगता लोकांचा जीव वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानंतरही अनेक रुग्णांना, रुग्णालयात शस्त्रक्रिये दरम्यान, गरोदर महिला, थॅलेसेमिया, कर्करोग यांसारखे रुग्ण यांना रक्ताची गरज असते.
रक्तदाते सामाजिक भान ठेवत रक्त दान करत असतात. पण त्या बदल्यात त्यांना फारसे काही मिळत नाही. समाजात डॉक्टर, हॉस्पिटल, रक्तपेढी आणि फार फार तर यांच्यात दुवा साधणाऱ्या समाजसेवकांची नाव निघतात. पण रक्तदात्यांचे नाव निघत नाही. रक्तदान करण्यास येणाऱ्या दात्यांना योग्य सोयी सुविधा, वागणूक देखील मिळत नाही. मशीनचा, पावडरचा चहा, छोटा बिस्किटचा पुडा देऊन बोळवण केली जाते.
अपेक्षा फार मोठ्या नाहीत पण त्यांना योग्य तो मान सन्मान नक्कीच मिळालया हवा. आम्ही स्वतः आमच्या 'लढा रक्तदानाच्या चळवळीतुन' रक्तदान शिबिरं घेण्याची सुरुवात केल्यापासून प्रत्येक रक्तदात्याला 'आदर्श रक्तदाता' ह्या किताबाने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करतो. कारण जग कितीही पुढे गेले तरी रक्त मिळवण्यासाठी आजही कोणता पर्याय उपलब्ध झालेला नाही. सरते शेवटी माणसाला माणसाचेच रक्त लागते म्हणून रक्तदाता हा आज व भविष्यातही तितकाच महत्वाचा आहे. समाजाने, शासनाने या दात्यांची दखल घेतली पाहीजे असे वाटते.
रक्तदान क्षेत्रात काही बदल अपेक्षित?
महाराष्ट्र राज्य रक्तदानासाठी आजवर अव्वल क्रमांकावर आहे. कोरोना सारख्या आपत्तीत सुद्धा रक्ताचे मोठ्या प्रमाणावर संकलन करण्याचं सातत्य महाराष्ट्र राज्याने राखलं होतं. त्यामुळे रक्तदान क्षेत्रात अग्रेसर असलेल्या राज्याला आणि या क्षेत्रात कार्यरत असलेल्या यंत्रणेला किंवा कार्यपद्धतीत बदल सुचवण्याइतका अनुभव माझ्या गाठीशी तरी नाही.
तरीही यात उतरल्यानंतर गेल्या दोन तीन वर्षात जो काही अनुभव आला त्यावरून तर एवढं नक्की सुचवावेसे वाटते. रक्तदान शिबीर आयोजन करण्याचे अधिकार आयोजकांकडे न देता ते संबधित विभागातील रक्तपेढ्यांकडे असायला हवेत. आणि नेमकं तस होत नाही.
उदाहरणार्थ - सणावाराला किंवा नेते मंडळी, साहेब किंवा पुढाऱ्यांच्या वाढदिवसा निमित्ताने, 1 मे महाराष्ट्र दिन किंवा महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर एकाच दिवशी आणि सगळीकडेच रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. त्यामुळे या सामाजिक संस्थाच्या आणि राजकीय वर्चस्वाच्या स्पर्धेत बऱ्याचदा जास्तीचे रक्त गोळा होते. त्यामुळे त्याचे नियोजन कसे करायचे हा महत्वाचा प्रश्न असतो.
कारण ठराविक कालावधीनंतर रक्ताची मुदत संपून जाते आणि रक्त वाया जाण्याची शक्यता निर्माण होते. अशा घटना यापूर्वी अनेक ठिकाणी घडल्याचे सर्वांना माहित आहे. म्हणजे एका बाजूला महाराष्ट्रात रक्तदानाचा तुडवडा झाला की रक्तदाते मिळवायला जीवाचं रान करायचं, आणि दुसऱ्या बाजूला सर्रासपणे अश्या पद्धतीने रक्त वाया जाताना दिसलं की खरंच त्रास होतो. यावर सक्तीने रक्त संक्रमण परिषदेचं नियंत्रण असायला हवं असं किशोर सांगतो.
जनजागृती करता येऊ शकते?
कोरोना काळात दाते रक्त देण्यासाठी पुढे आले याचा अर्थ नागरिकांमध्ये सामाजिक जाणीव आजही शिल्लक आहे असे आमचे ठाम मत आहे. शासन जनजागृतीच्या बाबतीत उदासिन दिसते. रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी रक्तदान करणं का गरजेचं आहे, रक्ताची गरज कुठे कधी आणि किती प्रमाणात असते या गोष्टी लोकांपर्यंत जायला हव्यात. आम्ही याच गोष्टींच्या आधारावर 'लढा रक्तदानाचा' या चळवळीतून लोकांमध्ये जनजागृती केली. तरुण पिढी, महाविद्यालयीन विद्यार्थी, जाणती माणसं, सामाजिक संस्था यांना याची माहिती करुन दिली.
अर्थातच 'रक्तदान ही जीव वाचवण्यासाठीची प्रक्रिया आहे आणि जीव वाचवणं नक्कीच सामान्य गोष्ट नाही!' हे घोषवाक्य ओठांवर ठेवत हजारो लोकांकडून रक्तदान करून घेऊ शकलो. शासनाने शालेय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच रक्तदान सारख्या सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवायला हवेत. जर असे उपक्रम राबविले गेले तर भविष्यात कधीच आणि कोणत्याच महिन्यात रक्ताचा तुडवडा निर्माण होणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.