Yoga esakal
आरोग्य

विश्वशांती ध्यान

दहावा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ काल (ता. २१) साजरा झाला. योग ही अतिशय प्राचीन अशी भारतीय परंपरा आहे.

सकाळ वृत्तसेवा

- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ

दहावा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ काल (ता. २१) साजरा झाला. योग ही अतिशय प्राचीन अशी भारतीय परंपरा आहे. भारतानं घेतलेला पुढाकार आणि परिश्रम यामुळे संयुक्त राष्ट्रांनी २०१५ पासून दरवर्षी जागतिक योग दिन साजरा करायला सुरुवात केली. त्यामुळे तब्बल १७५ देशांत योगसाधनेचं बीज रोवलं गेलं. विश्वातल्या प्रत्येक माणसामध्ये त्यानिमित्तानं योगाविषयी एक आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. एका अर्थानं यालाच ‘विश्वशांती ध्यान’ म्हणायला हवं.

जन्माला येणारा प्रत्येक जीव हा आनंदाच्या शोधात असतो. आयुष्यभर हा धांडोळा घेताना कमीअधिक प्रमाणात ध्यानाचा अनुभव त्याला येतोच. ‘आता विश्वात्मके देवे’ असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांनी ‘प्रत्येक प्राणिमात्राच्या अंतःकरणात विश्वमनाच्या अनुभूतीचा प्रकाश उजळावा’ यासाठी पसायदान मागितलं.

या सातशे वर्षांच्या तपस्येचं फळ म्हणूनच ‘विश्वशांती ध्याना’ची कल्पना योगदिनाच्या रूपाने प्रत्यक्ष साकार झाली आहे. हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषींनी वेद आणि उपनिषदांमधून अनुपम सुंदर असे शांतीमंत्र रचले. या मंत्रांच्या अर्थाची भावना सदोदित मनात तेवत ठेवली, तर कुणालाही हे विश्वशांती ध्यान सहज करता येईल. या प्रार्थनांमधले खाली दिलेले सुंदर भाव मनात आणत विश्वशांती ध्यान करावं :

संपूर्ण पृथ्वीतलावर शांतता असावी.

जगात जिथेजिथे पाण्याचे साठे आहेत तिथे शांतता असावी. सगळ्या वनौषधी, झाडं, वेलींमध्ये सामंजस्याचं राज्य नांदावं.

संपूर्ण विश्वात सुसंवादाचा प्रवाह सुखद झऱ्याप्रमाणे वाहावा.

माणसं आणि समस्त जीवांमधे सद्‌भाव, समरसता काठोकाठ भरून जावी. शांती आत आणि बाहेरही असावी. सर्व काही अंतर्बाह्य शांततेनी तृप्त असावं.

सगळ्यांचं कल्याण व्हावं. सारं काही शांत आणि पूर्ण असावं.

आपण सारेजण एकत्र पुढे जाऊया. आपलं शिक्षण, विकास हा तेज, ओजाने भरलेला असू देत!

बाहेरचं जग पूर्ण आहे; तसंच आतलं जगही दिव्य चेतनेनं परिपूर्ण आहे. या अद्‍भुत चेतनेच्या परिपूर्णतेतूनच विश्व साकारलं आहे.

हे ईश्वरा, या कानांना नेहमी शुभ ऐकू यावं. डोळ्यांनी सदैव सुंदर असंच पाहावं. सगळी इंद्रियं स्थिर, सदोदित टवटवीत, प्रसन्न असावी.

इंद्र, वरूण, प्रजापती, बृहस्पती या देवता नेहमीच आमचं कल्याण करोत, आम्हाला सदैव सुरक्षित ठेवोत.

आपल्या पूर्वजांनी याच भावना व्यक्त करत उपनिषदांतून परमेश्वराजवळ मागणं मागितलं आहे :

ॐ असतो मा सद्गमय।

तमसो मा ज्योतिर्गमय।

मृत्योर्मा अमृतं गमय।

हे भगवंता, असत्याकडून वैश्विक सत्याकडे आम्हाला घेऊन चल. अंधकाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे आमची वाटचाल होत राहो. आम्ही क्षणभंगुरतेकडून अमरत्वाकडे जात राहू.

वर लिहिलेले सगळे भाव, भावना प्रकट करण्याची अफाट ताकद ज्ञानोबांच्या एकाच काव्यपंक्तीत आहे :

विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले।

थोर वैज्ञानिक आईनस्टाईन यांचे काही उद्‌गार वाचताना डोळ्यांसमोर मूर्तिमंत ज्ञानेश्वरच उभे राहतात. आईनस्टाईन म्हणतात, ‘‘काही भारतीयांचे अनुभव हे अतिंद्रिय पातळीवरचे आणि साक्षात्काराच्या स्वरूपाचे असतात. त्यात भावनेची अगाध खोली आणि सौंदर्याच्या अनुभवाची परिसीमा आढळते. त्यामुळे फक्त मानवी बुद्धीच्या कक्षेत येतं, त्यालाच विज्ञान म्हणता येणार नाही.’’

विश्वयोगदिनाच्या शुभमुहूर्तावर प्रत्येकाच्या मनात या ‘विश्वशांती ध्याना’चं बीज रुजावं, अंकुरावं, तयाचा वेलू गगनावरी जावा हीच माउलींच्या चरणी प्रार्थना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT