कष्टाशिवाय सहज काहीही मिळणार नाही, असा जणू काही शापच या राशीला आहे. त्यामुळे मकर राशीची माणसे जोपर्यंत राबत असतात, तोपर्यंत त्यांचे नशीब त्यांना साथ देत असते.
-आनंद एस. मत्तीकोप-कुलकर्णी बेळगाव.
Annual Horoscope 2024, Capricorn Horoscope : मकर ही निसर्गचक्रातील दहावी महत्त्वाची रास. अत्यंत धोरणी, मुत्सद्दी, रूप सौंदर्य, विद्या यापेक्षा सांपत्तिक स्थितीला अधिक महत्त्व देणारी, कष्ट करण्यात कुणाला न ऐकणारी, वाईटातून चांगली गोष्ट कशी काढावी, याचा शोध घेणारी ही रास. कष्ट, कठोरपणा, स्थैर्य, निराशा, मानसिक तणाव या बाबी या राशीत प्रकर्षाने दिसून येतात. कष्टाशिवाय सहज काहीही मिळणार नाही, असा जणू काही शापच या राशीला आहे. त्यामुळे मकर राशीची माणसे जोपर्यंत राबत असतात, तोपर्यंत त्यांचे नशीब त्यांना साथ देत असते. कष्ट व संकट म्हणजे काय, हे या राशींच्या (Makar Rashi) लोकांपासून शिकावे.
जानेवारी ः ध्येय आणि अपेक्षापूर्ती यांच्यात योग्य समन्वय साधल्यास उत्तम यश मिळेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना वर्षभर सतत पैसा मिळत राहील, तर धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना प्रवासाचे योग येतील. सरकारी नोकरदारांनी काही बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे.
फेब्रुवारी ः कमाई आणि खर्च यांचा ताळमेळ राहणार नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. मानसिक अस्वस्थता वाढविणाऱ्या काही घटना घडतील. पडझड, अपघात, घरगुती मतभेद यांमुळे मनस्ताप होण्याची शक्यता आहे. ऐन महत्त्वाच्या कामाच्या वेळी कोणी काहीतरी बोलल्याने मन विचलित होईल. त्यामुळे काही गोष्टींबाबत गुप्तता राखणे आवश्यक समजावे.
मार्च ः विवाह, परदेश प्रवास, नवीन व्यवसायाचा प्रारंभ, संतती लाभ, धार्मिक कार्ये, नोकरी व्यवसाय या दृष्टीने हा महिना उत्तम ठरेल. आतापर्यंत ज्या काही समस्या असतील, त्या यापुढे आपोआप सुटू लागतील. शत्रू स्वतःहून चांगले वागू लागतील. नवीन नोकरी मिळण्याचे योग. साडेसाती असली, तरी त्याचा विशेष प्रभाव जाणवणार नाही.
एप्रिल ः वाहन, घरदार किंवा तत्सम् किमती वस्तू खरेदी करण्याचे योग किंवा बोलणी सुरू होतील. नोकरीसाठी केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. देवाधर्माच्या कार्यात भाग घ्याल. त्याचा चांगला फायदाही मिळेल. अन्नदानासारखे पुण्य तुमच्या हातून घडण्याची शक्यता आहे. पूर्वी जर काही व्यवहार केला असाल, तर या महिन्यात पूर्ण होऊ शकतात; पण कागदपत्रे व्यवस्थित ठेवावी लागतील.
मे ः महत्त्वाची कामे होण्यासाठी काहीजण तुम्हाला प्रलोभने दाखवतील; पण सावध राहा. सरकारी कामात यश मिळेल. चित्रपट क्षेत्र, नाट्यसंगीत, गायन-वादन या क्षेत्रांत असाल, तर चांगले यश मिळवाल. सरकार दरबारी महत्त्वाची कामे मिळतील. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा ठेवू नका. अति उष्णता व पित्त यांचा त्रास होण्याची शक्यता आहे.
जून ः घरगुती सुधारणा करण्यावरून किरकोळ मतभेद होतील. नातेवाईकांच्या विचित्र वागण्यामुळे पेचात सापडाल. कोणतेही व्यवहार जपून करावेत. नोकरी व्यवसायात घोटाळे होतील. नव्या ठिकाणी रुजू होताना पूर्वीच्या लोकांनी काही चुका केलेल्या आहेत का, त्याची चौकशी करून मगच ते पद ताब्यात घ्या. परदेश प्रवासाच्या संधी येतील. काहीजणांना अचानक नोकरीत उच्च पद मिळण्याची शक्यता आहे.
जुलै ः प्रवासातील ओळखीचा फायदा होईल. एखादा व्यवसाय बंद पडला असेल, तर सुरू करू शकता; पण कोणतेही धाडस करताना विचारपूर्वक करा. अपघात, बाधा, शत्रुत्व, मशिनरी बिघडणे, वाहनाचे ब्रेक फेल होणे, किरकोळ चुकीतून मोठे वादंग, त्यातून गैरसमज असे प्रकार होऊ शकतात. सावध राहणे आवश्यक.
ऑगस्ट ः काही अडलेले व्यवहार या महिन्यात पूर्ण होतील. मुलांच्या शिक्षणाकडे आणि त्यांच्या वागण्याकडे लक्ष ठेवावे लागेल. प्रेमप्रकरण वगैरे असतील, तर अधिक सावध राहा. अमावास्येदरम्यान काही महत्त्वाची कामे होतील, पण घरगुती बाबतीत कोणतेही वादंग माजू देऊ नका. घराची कागदपत्रे आणि सरकारी फाईली योग्य ठिकाणी ठेवा.
सप्टेंबर ः नवीन कामे आणि नवीन ऑर्डर मिळतील. पूर्वीच्या कामात जरासा बदल करून कमी वेळेत मोठी कामे करून दाखवाल. सहली, प्रवास करताना महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याचे मन या महिन्यात दुखवू नका अथवा त्यांच्याकडे दुर्लक्षही करू नका. त्यांच्यामुळे तुम्ही एखाद्या मोठ्या संकटातून वाचण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर ः पूर्व जन्मातील अथवा पूर्वजांच्या कृत्याचा परिणाम या महिन्यात प्रकर्षाने जाणवेल. वाहन जपून चालवा. शक्यतो कुणालाही तुमचे वाहन देऊ नका अथवा लोकांचे वापरू नका. आर्थिक बाबतीत हात आखडता घ्यावा लागेल. बँकांचे आणि संस्थांचे काही व्यवहार अत्यंत काळजीपूर्वक करावे लागतील. पूर्वी जर कोणाला रक्कम दिली असेल, तर या महिन्यात ती वसूल होऊ शकेल.
नोव्हेंबर ः कोणत्याही बाबतीत स्वतःला कमी लेखू नका. तुमच्याकडे बरेच चांगले गुण आहेत. त्यांचा वापर केल्यास सर्व कार्यात मोठे यश मिळवाल. आलेली कोणतीही संधी दवडू नका, त्याचा पुढे चांगला फायदा होणार आहे. एखादे न होणारे काम मित्रमंडळींच्या सहकार्याने पूर्ण करू शकाल. वाहन घेण्याची इच्छा पूर्ण होईल. धार्मिक गोष्टींची आवड असेल, तर या महिन्यात ती पूर्ण होईल.
डिसेंबर ः गेल्यावर्षी झालेला त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होईल. भांडणे अथवा इतर प्रकरणात कोणत्याही प्रकारची मध्यस्थी करू नका. निष्कारण शत्रुत्व ओढवून घ्याल. कारण, साडेसाती सुरू आहे. जर कोणाशी मतभेद असतील, तर ती प्रकरणे परस्पर मिटवा. कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार यशस्वी होतील.
राशी स्वामी शनि हा ग्रहमालेचा न्यायाधीश आहे. न्यायनिवाडा करणारा हा ग्रह आहे. चंद्र, शनि, मंगळ, रवी या परस्परविरोधी तत्त्वाच्या ग्रहांचे वर्चस्व या राशीवर आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही. या राशीला भूमितत्त्वाची रास असेही म्हणतात. यावर्षी गुरूचे भ्रमण तुम्हाला शुभ फलदायी ठरणार आहे. परीक्षेचे शेवटचे वर्ष असेल, तर यश मिळेल. स्वतःची वास्तू होणे, लग्नकार्य, दैवीकृपा, धनलाभ, प्रतिष्ठा आदी तुम्हाला गुरू मिळवून देईल. मित्रमंडळी आणि नातेवाईकांचे उत्तम सहकार्य मिळेल. भाग्योदयातील अडथळे कमी होतील.
राशी स्वामी शनीचे भ्रमण उत्पन्नाचे एखादे कायमस्वरूपी साधन मिळवून देईल. स्वतःची इस्टेट किंवा जागा अथवा वाहन वगैरे घेण्यास अनुकूल काळ. जर कर्ज वगैरे काढणार असाल, तर मिळू शकेल; पण प्रमाणाबाहेर काढू नका. राहू-केतूचे फेरे सर्व कार्यात मोठे यश देणारे ठरणार आहे. मानसन्मान होईल. सरकारी क्षेत्रातून काहीतरी मोठे काम अथवा कंत्राट मिळण्याची दाट शक्यता. जे काम हाती घ्याल, ते पूर्णत्वास न्याल; पण नियोजन आणि कार्यक्षमता याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. हर्षलचे फेरे यावर्षी नवीन काहीतरी चमत्कार घडवतील. जीवनाला निराळी कलाटणी मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.