BSF Head Constable Dadasaheb Toraskar esakal
दहिवडी (सातारा) : अतिशय दुर्दैवी घटनेत प्राण गमवावा लागलेल्या सीमा सुरक्षा दलातील (Border Security Force) जवान व कोळेवाडीचे (ता. माण) सुपुत्र हेड कॉन्स्टेबल दादासोा सोपान तोरसकर (वय ४९) यांना साश्रूपुर्ण नयनांनी धीरगंभीर वातावरणात अंतिम निरोप देण्यात आला. वीर जवानाच्या अंत्यदर्शनासाठी कोळेवाडीत जनसमुदाय लोटला होता.पंजाब (Punjab) राज्यातील अमृतसर (Amritsar) जिल्ह्यातील खासा येथील बी.एस.एफ.च्या मुख्यालयात १४४ बी.एन. या युनिटमध्ये युनिटमधीलच सहकाऱ्याने केलेल्या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल (Head Constable) दादासोा तोरसकर (Dadasaheb Sopan Toraskar) यांचा रविवारी मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच कोळेवाडीकरांवर दु:खाचा डोंगर कोसळला. कोळेवाडीसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. त्यानंतर सर्वांचे डोळे वीर जवान दादासोा यांच्या पार्थिवाकडे लागले होते. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास पार्थिव गावात आल्यानंतर कुटुंबीयांसह, आप्तेष्टांनी दु:खा वेगाने हंबरडा फोडला.त्यानंतर सकाळी सव्वा नऊच्या सुमारास वीर जवान दादासोा यांच्या पार्थिवाची सजविलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अंत्यदर्शनासाठी आबालवृद्धांसह महिलांचा जनसमुदाय लोटला होता. उपस्थितांच्यातून 'दादासोा तोरसकर, अमर रहे' तसेच 'भारतमाता की जय'चा जयघोष सुरु होता. सकाळी दहाच्या सुमारास अंत्यसंस्कारासाठी तयार करण्यात आलेल्या मोकळ्या रानात पार्थिव आणण्यात आले. यावेळी प्रशासनाकडून प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, परिविक्षाधिन तहसीलदार रिचर्ड यानथन, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर, बी.एस.एफ.चे अधिकारी, आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच बी.एस.एफ असोसिएशनचे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले पदाधिकारी व सदस्य यांनी वीर जवान दादासोा यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली.बी.एस.एफ. तसेच सातारा पोलिस दल यांच्याकडून बिगुल वाजवून व थ्री राऊंड फायर करुन मानवंदना देण्यात आली. नंतर वीर जवान दादासोा यांच्या पार्थिवावर ठेवलेला तिरंगा ध्वज त्यांची पत्नी वनिता आणि मुले सुधीर व सुशांत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी भावनावेगाने उपस्थितांना हुंदका अनावर झाला. सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर वीर जवान दादासोा यांच्या पार्थिवास मुलगा सुधीर याने मुखाग्नी दिला. त्यावेळी अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.