कोरोनाच्या निर्बंधांमुळे सायंकाळी चार वाजता लॉक होणारे शहर सोमवारपासून पूर्णतः अनलॉक झाले. गेल्या दीड वर्षापासून जनजीवनासह व्यवसायाची विस्कळीत झालेली घडी सुरळीत झाली. प्रशासकीय सूचनांची अंमलबजावणी करत अन् सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवत लहान-मोठ्या व्यावसायिकांनी एक आश्वासक सुरुवात केली. त्याचा ‘सकाळ’ने घेतलेला धांडोळा...
लक्ष्मी रस्ता ः प्रदीर्घ निर्बंधांनंतर शहरात आता चार वाजल्यानंतरही दुकाने खुली राहणार आहेत. यामुळे व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. येथील एका व्यावसायिकाने चक्क उघडलेल्या कुलुपाचे कटआउट करत १० ते ६० टक्के सूट दिली आहे.तुळशीबाग ः लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने महिलांच्या खरेदीचे केंद्र असलेल्या तुळशीबागेत सोमवारी गर्दी पहायला मिळाली.''आम्ही सर्व हॉटेल व्यावसायिकांनी वेळ वाढवून दिला जावा यासाठी मोर्चे, आंदोलने केली, याला यश मिळाले. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून हॉटेल व्यवसाय करू. ग्राहकांनीही सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून सहकार्य करावे.''
- वर्षा जोशी, हॉटेल मालक, कर्वे रस्ता
''प्रशासनाने घेतलेला निर्णय चांगला आहे. हॉटेल चालू असल्याने घराबाहेर पडता येते. हॉटेलचा वेळ वाढवल्यामुळे गर्दी कमी होईल. हॉटेलही आता चैनीची गोष्ट राहिली नसून, सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांबरोबर हॉटेल व्यवसायालाही दिलासा मिळाला आहे.''
- वेदांत नेमाडे, नागरिक, आयडिल कॉलनी, कोथरूड''वेळ वाढवणे अत्यंत गरजेचे होते. कारण फक्त चारपर्यंत वेळ असल्याने ग्राहकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात होत होती. आत्ता ग्राहकांनाही खरेदी करण्यास पुरेसा वेळ मिळेल व खरेदीही मोठ्या प्रमाणात वाढेल. जरी वेळ वाढली असली तरी कोणीही निष्काळजी राहता कामा नये. आम्हीही योग्य ती काळजी घेऊन ग्राहकांना सेवा देणार आहोत.''
- प्रमोद जैन, कापड व्यावसायिक, लक्ष्मी रस्ता
''वेळ वाढवल्याने आम्हालाही खरेदी करण्यास पुरेसा वेळ मिळेल व पाहिजे तेथे जाऊन खरेदी करता येईल. नाही तर याआधी मिळेल ते कपडे खरेदी करावे लागत होते. खरेदीला यायचे कधी, असा प्रश्न आम्हाला पडलेला असायचा.''
- सूरज ढवारे, ग्राहक ''वेळ वाढवल्याने नक्कीच आम्हाला याचा फायदा होणार आहे. कोरोनाचा सर्वांत जास्त फटका आम्हाला बसला आहे. रात्री आठ वाजेपर्यंत वेळ वाढवल्याने सायंकाळी ग्राहक खरदेसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. त्यामुळे आमच्या छोट्या व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. हाच निर्णय शनिवार आणि रविवारसाठी ठेवावा.''
- हेमंत परदेशी, पथारी व्यावसायिक
''वेळ वाढल्याने आम्हला पाहिजे त्या वस्तू कमी किमतीत खरेदी करता येऊ शकतात. नाही तर एरवी वेळ कमी असल्याने जास्त पैसे मोजून इतर वस्तू खरेदी कराव्या लागत होत्या.''
- समीर चौगुले, ग्राहक''अभ्यासिका कधी सुरू, कधी बंद तर कधी फक्त काही वेळापुरतीच सुरू ठेवावी लागत होती. त्यामुळे विद्यार्थिवर्गाचेही मोठे नुकसान झाले. पुढील महिन्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. जरी वेळ वाढवली असली, तरी आम्ही योग्य ती काळजी घेऊन अभ्यासिका चालवणार आहोत.''
- अरुंधती क्षीरसागर-कार्ले, अभ्यासिका चालक
''किती वेळ घरी अभ्यास करायचा आणि किती वेळ अभ्यासिकेत बसायचे, असा प्रश्न आमच्यासमोर पडला होता. आत्ता वेळ वाढवल्याने सकाळपासून सायंकाळपर्यंत अभ्यासिकेत बसून अभ्यास करता येईल.''
- योगेश बाबर, विद्यार्थी''नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे जिमसाठी वेळ वाढवून मिळणे तितकेच महत्त्वाचे होते. प्रशासनाने चांगला निर्णय घेतला. जिमसाठी अनेक नागरिक रात्री नऊ वाजेपर्यंत येतात. कोरोनाच्या काळात जिम सुरू होणे अत्यंत गरजेचे होते. प्रशासनाने भविष्यात जिमला अत्यावश्यक सेवेत घेतले तर खूप चांगले होईल.''
- प्रशांत आर्गे, जिमचालक, सेनापती बापट रस्ता
''जिमची वेळ वाढवून दिली हे ऐकून खूप छान वाटले. पूर्वी आम्हाला काम सोडून जिमला यावे लागत असे. वेळ वाढवल्यामुळे आता कोणत्याही तणावाखाली न रहता जिमला येता येते. आता आमची धावपळ कमी होईल. प्रशासनाचे आभार.''
- रेहान लाहोट, व्यायामप्रेमी, गोखलेनगर
''ब्यूटी पार्लर बंद असल्याने अडचण निर्माण झाली होती. मात्र आता ती सुरू झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. तरीही काही जण पार्लरला येण्यासाठी घाबरत आहेत. शासनाने अजून वेळ वाढवून रात्री सात ते आठ वाजेपर्यंत करावी. गृहिणी, नोकरदार महिला सायंकाळी घराबाहेर पडतात. त्यामुळे वेळ वाढवून मिळावा.''
- जयश्री खिलारे, मालक, ब्यूटी पार्लर, जनवाडी
''महिलांना रात्री मोकळा वेळ मिळाला की पार्लरला जाता येते. शनिवार, रविवारी पार्लर ठेवले तर जास्त सोयीचे होईल. कमी वेळ असेल तर गर्दी होते. जास्त वेळ असेल तर गर्दी होणार नाही.''
- मयूरा जाधव, विद्यार्थिनी, गोखलेनगर''उद्याने, बागा सुरू झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. अनेक ठिकाणी हास्य क्लब, योगा क्लब सुरू होते. ते बंद झाले आहेत. गेल्या दीड वर्षापासून येरवड्यातील हुतात्मा उद्यानात नेहमी येणारे अनेकांचे मित्र-मैत्रीणी भेटले नव्हते. ते आता भेटणार असल्यामुळे साहजिकच आनंदाचे वातावरण आहे.''
- संपतराव पोळ, नागरिक, हरिगंगा सोसायटी
''विमाननगर येथील स्वामी विवेकानंद उद्यानातील हिरवळ, वृक्ष दीड वर्षापासून नागरिकांच्या प्रतीक्षेत होते. आबालवृद्ध उद्यानात फिरण्यासाठी येणार आहेत. त्याहून दुसरा आनंद काय असू शकतो.''
- दत्ता निकाळजे, व्यवस्थापक, स्वामी विवेकानंद उद्यानमागील एका वर्षापासून सर्व व्यवसाय अडचणीत आहेत. आत्ता निर्बंध कमी केले आहेत. त्यामुळे यापुढे व्यवसाय सुरळीत सुरू होईल, तसेच कामगारांचा पगार आणि भाडे वेळेवर जाईल. शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.
- सागर मोहोळ, सलून व्यवसायिक
निर्बंधांमुळे भाजीपाला विक्रीवर अनेक बंधने आली होती. याआधी चार वाजेपर्यंत विक्रीची वेळ असल्याने ग्राहक गर्दी करून भाजीपाला खरेदी करत होते. आजपासून रात्री आठपर्यंत वेळ दिल्याने नोकरदार घरी जाताना भाजीपाला खरेदी करतील. तसेच यापुढे भाजीपाल्याला योग्य भाव मिळेल.
- प्रकाश ढमढेरे, भाजीपाला विक्रेते''दोन डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश देणे अगदी योग्य आहे. मास्क वगैरे वापरू, स्वतःची काळजी घेऊ. एकाच ठिकाणी सगळे काही मिळणे गरजेचे आहे. मॉलमध्ये जास्त काळजी घेतली पाहिजे. भाजी मार्केटमध्ये गर्दी होते, त्याप्रमाणे गर्दी होऊ नये.''
- अनिता अडसूळ, गृहिणी, जनवाडी
''निर्णय दिलासा देणारा आहे. ग्राहकांना हव्या त्या वेळात खरेदी करता येणार असल्याने आनंद आहे, तसेच व्यावसायिकांचे होणारे नुकसान टळणार आहे.''
- आशिष राठी, स्टेशनरी दुकानदारब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.