Eknath Shinde Cabinet Expansion esakal
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आज पहिल्या टप्प्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आज पहिल्या टप्प्याचा (9 ऑगस्ट) मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. त्यासाठी राजभवन सज्ज झालं आहे. सकाळी 11 वाजता राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काही नेत्यांचा घेतलेला आढावा..संजय राठोड (Sanjay Rathore) : राठोड यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं. संजय राठोड यांनी वयाच्या 21 व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वयाच्या 27 व्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनी केली. 2009 मध्ये दारव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यातून दारव्हा मतदार संघ रद्द होऊन दिग्रस मतदार संघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी तत्कालीन क्रीडा मंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला. राठोड यांनी 2014 मध्ये आमदारकीची हॅटट्रिक साधली. राष्ट्रवादीचे नेते वसंत घुईखेडकर यांचा त्यांनी पराभव केला. 2019 मध्ये संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्यापुढं होत. असं असतानाही तब्बल 60 हजार मताधिक्यांनी ते विजयी झाले.
गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) : गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. 5 जून 1966 रोजी जन्मलेल्या गुलाबराव पाटलांचा मंत्रिपदाचा प्रवास रंजक आहे. 1999 – विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. 2004 – विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी. 2009 – विधानसभेला पराभव, शिवसेना उपनेतेपदी निवड 2014 – विधानसभा निवडणुकीत विजयी. 2016-2019 – फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्री म्हणून कामकाज. 2019 – विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा विजय जानेवारी 2020 – ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली होती.दादा भुसे (Dada Bhuse) : प्रवाहाविरुद्धचं राजकारण करणारा नेता, अशक्य ते शक्य करून दाखवणारा नेता.. अशी दादा भुसे यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे. दादाजी दगडू भुसे यांचा जन्म 6 मार्च 1964 रोजी नाशिकच्या मालेगावमध्ये झाला. त्यांनी डीसीए पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यांना दोन मुलं आहेत. मालेगाव बाह्य हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. भुसे हे राजकारणात आहेतच. पण, त्यांची पत्नी अनिता या सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तर त्यांचे चिरंजीव अजिंक्य आणि अविष्कार हे युवासेनेत सक्रिय आहेत.संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) : औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड सारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील संदिपान भुमरे यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८२ मध्ये पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्यात 'स्लिप बॉय' (उसांच्या गाड्यांचे पावत्या फाडण्याचे काम) म्हणून नोकरी सुरू केली. १९८८ मध्ये पाचोड येथे शिवसेनेची शाखा स्थापन करत संदिपान भुमरे यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८९ मध्ये पाचोड ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड, १९९२ मध्ये पंचायत समिती सदस्य व पंचायत समितीचे उपसभापतिपद मिळवले. १९९३ मध्ये ते संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक झाले. शिवसेनेचे पैठण येथील आमदार बबनराव वाघचौरे यांनी छगन भुजबळ यांच्यासोबत बंडखोरी केली होती. त्यामुळे १९९५ मध्ये पैठणमधून कोणाला उमेदवारी द्यायची हा पेच शिवसेनेला पडला होता. त्यावेळी दिवंगत मोरेश्वर सावे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, बाहेरचा उमेदवार म्हणून सावे यांना मोठा विरोध झाल्याने तत्कालीन पंचायत समिती उपसभापती संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली. ही निवडणूक जिंकून १९९६ मध्ये ते कारखान्याचे अध्यक्ष झाले होते.अब्दुल सत्तार (Abdul Sattar) : अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. अब्दुल सत्तार अब्दुल नबी हे त्यांचे पूर्ण नाव आहे. 1 जानेवारी 1965 साली सत्तार यांचा जन्म औरंगाबादच्या सिल्लोड गावातल्या एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी सिल्लोडमधून बीएपर्यंतचे त्यांचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयापासून राजकारणाची आवड असलेल्या सत्तार यांच्या राजकीय कारकिर्दीला 1984 पासून सुरूवात झाली. घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना 1984 साली ग्रामपंचायतची निवडणुक लढवून ते जिंकून आले. 2001 साली अब्दुल सत्तार हे विधानपरिषदेवर निवडून गेले. 2004 साली अब्दुल सत्तार हे अतिशय कमी फरकाने विधानसभा निवडणूक हरले. 2009 साली ते पहिल्यांदा सिल्लोडमधून विधानसभा निवडणूक जिंकून आले. 2014 साली (विधानसभा निवडणूकांआधी) कॉंग्रेसच्या मंत्रीमंडळात ते काही महीने कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर विधीमंडळात विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडताना ते चर्चेत राहीले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) : शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांना पाटण विधानसभा मतदार संघाचे तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. सन 2004 मध्ये शिवसेनेतून निवडणूक लढवून ते पहिल्यांदा निवडून आले होते. सन 2009 मध्ये त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर देसाई यांनी पुन्हा सन 2014 व सन 2019 मधील निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून येण्याची किमया साधली. गेल्या वेळी विधानसभा तालीका अध्यक्षपदावर पाचवेळा देसाई यांनी काम केलंय.दीपक केसरकर (Deepak Kesarkar) : सावंतवाडीतील गर्भश्रीमंत असलेल्या नगरशेठ वसंत केसरकर यांचे दीपक केसरकर हे पुत्र. त्यांचे वडील सक्रिय राजकारणात नसले, तरी सावंतवाडीच्या एकूणच समाजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची असायची. दीपक केसरकर हे मात्र अगदी तरुणपणापासून राजकारणात सक्रिय झाले. त्यांची सुरुवात काँग्रेसमधून झाली. दीर्घकाळ ते काँग्रेसी विचारसरणीचा पुरस्कार करत राजकारणात एक एक पायरी चढत गेले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. तद्नंतर ते शिवसेनेत दाखल झाले. आता ते शिंदे गटात आहेत. तानाजी सावंत (Tanaji Sawant) : तानाजी सावंत हे मूळ सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रहिवासी आहेत. 2015 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झाले. खासगी साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट अशी त्यांची ओळख आहे. उस्मानाबादच्या राजकारणावर त्यांची चांगली पकड आहे, असं म्हटलं जातं. ‘लक्ष्मी’पुत्र अशी शिवसेनेमध्ये खासगीतील ओळख आहे. राष्ट्रवादीचे बबन शिंदे यांच्याविरोधात तीनवेळा निवडणूक लढवली होती. शिवसेनेकडून दोनवेळा निवडणूक लढवली. अपक्ष म्हणून एकदा विधानसभा निवडणूक लढवली. राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील गटाचे ते समर्थक म्हणून ओळखले जातात.उदय सामंत (Uday Samantha) : सामंत हे एक भारतीय राजकारणी आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. आता ते एकनाथ शिंदे यांच्या गटात कार्यरत आहेत.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.