फोटोग्राफी

माजी सैनिकाचा नादखुळा! बांबू शेतीतून पिकवले पडीक जमिनीवर सोने

राजेंद्र बाईत

राजापूर : तालुक्यातील सौंदळ येथील माजी सैनिक वासुदेव घाग यांनी देशरक्षणातील योगदानानंतर शेतकरी म्हणून शेतीक्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान देण्याचा ध्यास घेतला. त्यांनी वर्षानुवर्षे पडिक असलेल्या जमिनीमध्ये व्यावसायिकदृष्ट्या विविध प्रकारच्या बांबूची लागवड केली आहे. गेल्या चार वर्षामध्ये सौंदळ येथे बांबू शेतीतून सोनं पिकलं आहे. सद्यःस्थितीमध्ये या लागवडीच्या माध्यमातून दरवर्षी होणारी लाखो रुपयांची उलाढाल पाहता सुरवातीला या लागवडीकडे विनोदाने पाहणार्‍या लोकांच्या नजरा आता उत्सुकता आणि व्यावसायिक दृष्टिकोनामध्ये काहीशा बदलल्या आहेत.

कोकणामध्ये शेताच्या बांधावर काही मोजक्या प्रमाणात बांबू लागवड झाल्याचे चित्र दिसत असताना माजी सैनिक घाग यांनी दिवसरात्र राबत स्वकष्टाने व्यावसायिक दृष्टिकोनातून फुलवलेली बांबूची शेती आणि अन्य शेतीतील केलेले प्रयोग कोकणातील शेतकर्‍यांसाठी शेतीच्या हमखास उत्पन्नाच्यादृष्टीने दिशादर्शक ठरत आहे.
बांबूची कंदमुळे आणि रोपांचे साळींदरांसह रानटी डुक्करांकडून नासधूस केली जाते. या नासधुसीतून घाग यांना लाखो रुपयांच्या नुकसानीला यापूर्वी सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी सुमारे दीड लाख रुपये खर्च करून करंट लागणारे तारांचे कुंपण घातले आहे. त्यातून वन्यप्राण्यांकडून होणार्‍या नुकसानीला आळा बसला आहे.
पडीक जमिन आणली ओलिताखाली सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर घाग यांनी गेल्या कित्येक वर्षापासून वर्षानुवर्षे पडिक असलेली सुमारे दहा एकर जमीन लागवडीखाली आणण्याच्या उद्देशाने खरेदी केली. मुंबईतील घराची विक्री करून जमीन खरेदीसाठी त्यांनी निधीची उभारणी केली.
खरेदी केलेली जागा वर्षानुवर्षे पडिक असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगलवाढ झालेली होती. हे वाढलेले जंगल तोडून त्या ठिकाणी बांबू लागवड केली. लागवड करण्यात आलेली जमीनीमध्ये गांडुळाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे या जमिनीमध्ये अन्य परिसरातील जमिनीच्या तुलनेमध्ये अधिक सुपीकता आहे. त्याचा फायदा बांबूची चांगली वाढ आणि उत्पादन होण्यासाठी झाला.
खरेदी केलेल्या जागेमध्ये काजू लागवड करण्याचा घाग यांचा उद्देश होता. त्या दृष्टीने त्यांनी खड्डे खोदून अन्य नियोजनही केले होते; मात्र, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन नारकर यांची गवाणे (ता. लांजा) येथील बांबू लागवडीचे प्रशिक्षण घेण्याची केलेली सूचना आणि त्यानंतर झालेले प्रशिक्षण बांबू लागवडीसाठी टर्निंग पॉइंट ठरल्याचे घाग सांगतात. त्यानंतर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथील संतोष खोत आणि डॉ. फंड यांची भेट घेतली. फंड यांनी बांबू लागवडीतील सकारात्मक अर्थकारण पटवून दिले.
बांबू लागवडीसाठी अडीच बाय दीड फूट उंचीचा खड्डा खोदण्यात आला. हे खड्डे खोदत असताना दोन रांगांमध्ये २० फूट अंतर राहील याकडे लक्ष देण्यात आले तर, एका रांगेतील दोन खड्ड्यांमध्ये दहा फुटाचे अंतर ठेवण्यात आले. बांबूच्या कंदमुळाची लागवड करताना त्यामध्ये गांडूळ खत टाकण्यात आले. रोपांच्या पोषक वाढीसाठी गांडूळ खत उपयुक्त ठरल्याचे घाग सांगतात. या व्यतिरिक्त कंदाला चांगली मुळे (पालं) पकडणे अधिक सुलभ व्हावे या दृष्टीने खताचाही वापर करण्यात आला.
लागवड करण्यात आलेल्या बांबूच्या कंदांसह रोपांना आवश्यक असलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी बागेमध्ये ठिबक सिंचनची उभारणी करण्यात आली आहे. पाणी उपलब्धततेसाठी बागेमध्ये विहीरही खोदण्यात आली आहे. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून चार दिवसांनी रोपांना पाणी दिले जाते. त्यामध्ये सर्वसाधारणतः प्रत्येक रोपाला आठ लिटर पाणी दिले जात असल्याचे घाग सांगतात.
शेतीचा ध्यास घेतलेले माजी सैनिक वासुदेव घाग यांनी बांबू लागवडीसह अन्य प्रकारची शेती करण्यासाठी दिवसरात्र शेतामध्ये स्वतः कष्ट उपसले आहेत. रोपांची लागवड करण्यासह मशागत करण्यासाठी ते शेतामध्ये स्वतः राबतात. त्यासाठी त्यांना पत्नी वैशाली, सैन्यदलामध्ये कार्यरत असलेला मुलगा विवेक, सून पूजा, मुलगी वेदश्री यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभल्याचे ते सांगतात.
लागवडीनंतर दोन वर्ष बांबूंच्या रोपांची चांगलीच वाढ झाली. त्यानंतर त्याची तोड करण्यात आली. त्यामध्ये आजपर्यंत सुमारे सहा हजार बांबूंची तोड करण्यात आल्याचे घाग सांगतात. बांबू तोड करण्यासह त्याची विक्री करण्यासाठी दलालांचा वा मध्यस्थांची मदत घेण्याऐवजी स्वतःच कामगार लावून तोड केल्याचे ते सांगतात. रोपांची विक्री स्थानिक खरेदीदारांना करण्याऐवजी बाजारपेठेचा शोध घेऊन थेट पैठण, औरंगाबाद येथे मोठ्या खरेदीदाराला स्वतः विक्री केल्याचेही ते सांगतात.
माजी सैनिक घाग यांनी या शेतामध्ये बांबू लागवडीसह तुती लागवडीच्या माध्यमातून रेशीम शेतीचा अनोखा प्रयोगही हाती घेतला आहे. त्यामध्ये सुमारे दीड एकर क्षेत्रामध्ये तुतीची लागवड केली असून या ठिकाणी रेशीम उत्पादन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तुती लागवडीसाठी लागणारी रोपे तयार करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये नर्सरी तयार केली.
"कोकणातील जमिनीमध्ये हिरवं सोनं पिकण्याची क्षमता आहे; मात्र येथील शेतकर्‍यांनी त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत प्रयत्न करणे गरजेचे आहे." - वासुदेव घाग, माजी सैनिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT