मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश): गेल्या नऊ महिन्यांपासून कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या जय जवान, जय किसान असा शेतकरी ऐक्याचा हुंकार आज मुझफ्फरनगरमध्ये उमटला आहे. देशभरातून शेकडो शेतकरी येथील महापंचायतीसाठी उपस्थित असून, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा यात होण्याची शक्यता आहे. आज सकाळी दहा वाजेपासून ही महापंचायत सुरू होत आहे.
केंद्र सरकारच्या विरोधात हे शेतकरी संघटनांचे प्रचंड शक्तीप्रदर्शन आहे. नऊ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. पण सरकार त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाही, मागण्यांवर बोलायला तयार नाहीत, असा शेतकरी नेत्यांचा आरोप होता. म्हणूनच तीनही कायदे रद्द करण्याची त्यांची मागणी आहे.
त्याला आता देशातील शेतकऱ्यांकडून पाठबळ मिळते आहे. महापंचायतीसाठी जमलेली गर्दी ही त्यांचा दाखला आहे.शनिवारपासूनच शेतकरी मुझफ्फरनगर येथे जमू लागले होते. येथील सरकारी इंटर कॉलेजच्या मैदानात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. शनिवार दुपारपासून या मंडपात शेतकरी बसून आहेत. त्यांच्यासाठी जेवण, पाणी, चहा अशा सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मध्यरात्रीनंतरही शेतकऱ्यांचे जत्थे महापंचायत सभा स्थळी येत होते. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जागोजाग स्वयंसेवक तैनात होते. आपापल्या संघटनांचे झेंडे फडकावत मोदी सरकार विरोधी घोषणाबाजी शेतकरी करताना दिसत होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे होणारे दुर्लक्ष हा महापंचायतीमध्ये चर्चेचा मुख्य मुद्दा असणार आहे. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आता कोणती भूमिका घ्यायची याचा निर्णय आज या महापंचायतीमध्ये सर्वानुमते घेतला जाणार आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यादृष्टीने या महापंचायतीमधील शेतकरी ऐक्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणूक रिंगणात शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उतरविण्याचा निर्णय आज भारतीय किसान सभेकडून घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.