वेळा अमावास्या अर्थात येळवस हा मूळ कर्नाटकी पण महाराष्ट्रातील उस्मानाबाद, लातूर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यात साजरा होणारा कृषिप्रधान उत्सव आहे. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. नैसर्गिक संकट कितीही आले तरी काळ्या आईची (लक्ष्मीची) पूजा करण्याच्या परंपरेत शेतकऱ्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. आज रविवारी (ता. दोन) नवीन वर्षाच्या प्रारंभीच येळवसचा योग आल्याने शेतकरी कुटुंबात मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे. (Vela Amavasya)
जेवळी (ता.लोहारा) व परिसरात वेळा अमावस्या सण उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकरी कुटुंबांनी शिवार गजबजून गेले होता. शेतकऱ्याने आपल्या सग्या-सोयऱ्ंयासह वनभोजनाचा आनंद घेतला. या वर्षी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पडलेल्या चांगल्या पावसाने नदी-नाले भरून वाहिले असून पाण्याच्या उपलब्धतेमुळे शिवार रब्बी पिकांनी बहरले असल्याने वेळा अमावस्या हा सण द्विगुणित झाला.कर्नाटक राज्याच्या या सीमावर्ती भागात मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या ही वेळा अमावस्या म्हणून अनेक वर्षांपासून शेतकरी परंपरिक पध्दतीने साजरी करतात. या भागात वेळ अमावास्येला शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी गावागावात संचार बंदी सारखी स्थिती पाहायला मिळते. रविवारी वेळ अमावास्या निमित्त शेतकरी कुटुंबांनी शिवार फुलून गेला होता. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सहकुटुंब जाऊन वेळ अमावस्या हा सण साजरा केला. आपल्या सग्या- सोयरयासह वनभोजनाचा आनंद घेतला. शेतकऱ्यांनी शनिवारी (ता.१) रात्रीच सणाचा सर्व स्वयंपाक उरकून रविवारी (ता.दोन) सकाळी बैलगाडी, ट्रॅक्टर व विविध वाहनांनी आपल्या शेताकडे रवाना झाले. घरातील बुजूर्ग शेतकरी आपल्या डोक्यावर अंबिलाचे गाडगे घेत पायी गेले. शिवारात विधिवत पाचपांढव, लक्ष्मी, शिवारातील देव-देवतांची पूजा करुण्यात आली. या नंतर फडातील पिकांची पूजा व पिकात फिरुन अंबिल, उंडे शिंपडण्यात आले. या नंतर नातेवाईक, मित्र परिवारासह वनभोजनाचा आनंद घेतला. सायंकाळी कडब्याच्या पेटत्या पेंड्या हातात घेऊन 'हेंडगा' घेऊन शेताला प्रदक्षिणा घालतात. यावेळी हार- हार महादेव, बळीराजाचा चांगभलचा जयघोष करण्यात येतो. शेवटी सजविलेली लक्ष्मी प्रतीमा वाजत गाजत गावाकडे नेण्यात येतात. या वर्षी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पडलेल्या चांगल्या पावसाने नदी-नाले भरून वाहिले असून पाण्याच्या उपलब्धतेमुळे शिवार रब्बी पिकांनी बहरला असल्याने वेळा अमावस्या हा सण मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला यातच आज रविवारची सुट्टी असल्याने गर्दीत भर पडली.
जळकोट (जि.लातूर) : सकाळपासूनच ग्रामीण भागात शेतकरी 'येळवस ' घेऊन शेताकडे निघाल्याने गावागावातील शिवार रस्ते फुलल्याचे चित्र होते. एकिकडे कोरोनाचे संकट पुन्हा डोकेवर काढत असताना चिंता आहे. रविवारी ग्रामीण भागात शेतात कुटुंबासह मित्रमंडळींना सोबत घेऊन येळवशीला भजी-आंबिलीवर सर्वांनी ताव मारला. प्रथेप्रमाणे शेतकरी आपापल्या शेतात कडब्याची कोप (खोपी) तयार करुन त्यात लक्ष्मीची पूजा केली. चार दिवसांपासूनच येळवशीची मोठी तयारी सुरु होती. तर रविवारी सकाळपासूनच शेतकरी पूजेसह जेवणाचे साहित्य घेऊन शेताकडे जातानाचे चित्र पाहावयास मिळत होते.वेळा अमावस्येचे वैशिष्ट्य म्हणजे तुरीच्या शेंगापासून तयार केलेली भज्जी (भाजी) व ताकापासून तयार केलेली आंबिल हे आहे. परंतु या वर्षी तुरीवर मर रोग येऊन वाळून गेल्याने शेंगा मिळणे कठिण झाले. एका मडक्यात ही आंबिल डोक्यावर घेऊन कपाळावर नामपट्टा ओढून शेतकरी घरुन निघतात. मग त्याबरोबर खास केलेली भज्जी, भाकरी खिर यासह पूजेचे साहित्य आदींसह ही मंडळी शेतावर जातात. त्यात बच्चे कंपनीचा उत्साह पाहावयास मिळतो. हिरव्यागार रब्बी शेतीत लक्ष्मीची पूजा करुन भोजनाचा आस्वाद घेण्याची प्रथा आहे.शेतात रब्बी पीकात कडब्याच्या पेंढ्यापासून कोपी तयार करुन त्यात मातीपासून लक्ष्मीमूर्ती करुन पूजा मांडून मनोभावे पूजा केली जाते. त्यासाठी जांब, बोरे आदी फळांसह भजी, आंबिल नैवेद्य दाखवण्यात येतो. शेतकरी पती-पत्नी ही पूजा करुन भरपूर धन धान्य पिकू दे अशी प्रार्थना करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.