डोंबिवली (मुंबई): कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना रविवारपासून लोकलने प्रवास करता येत आहे. मध्य रेल्वे स्थानकातील डोंबिवली हे सर्वात गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर मंगळवारी डोंबिवलीत लोकलला प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र सकाळी 7 वाजले तरी डोंबिवली स्थानक रिकामे होते. आठनंतर तुरळक गर्दी स्थानकात दिसली. स्थानकात गर्दी उसळण्याची शक्यता फोल ठरली असून कोरोनाचे सावट व लसीचा दोन डोस पासून अनेक नागरिक वंचित असल्याचे चित्र स्पष्ट होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नोकरदारांना कार्यालयात आता बोलावले जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लोकलमधील गर्दी पाहता सर्वसामान्य नागरिकांना लोकलने प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
चाकरमान्यांची लोकलसेवा ही जीवनवाहिनी समजली जाते. ठाणे पल्याड राहणाऱ्या नोकरदारांना लोकल प्रवास हा कमी खर्चिक व वेळेची बचत करणारा आहे. कोरोना काळात तो बंद असल्याने अनेक प्रवासी कल्याण शीळ मार्गे रस्ते प्रवास करीत होते. मात्र वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था यामुळे प्रवाशी बेजार झाले असून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा सुरू करा, अशी मागणी जोर धरत होती. रेल्वे प्रवासी संघटनांनी देखील वरिष्ठाच्या भेटी घेत ही मागणी लावून धरली होती.अखेर 15 ऑगस्ट पासून लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. दोन डोसचा कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची पडताळणी करून नंतर त्यांना लोकल पास देण्यात येत आहे. या पडताळणीसाठीही स्थानिक प्राधिकरणांची मदत घेत कार्यतत्परता दाखविण्यात आली.
रविवार पासून लोकल प्रवास करता येणार असल्याने रेल्वे स्थानक पहिल्यासारखी प्रवाशांनी गजबजलेली पहायला मिळतील असे सर्वांनाच वाटत होते. पण 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन व 16 ऑगस्ट पतेतीची सुट्टी या सार्वजनिक सुट्ट्या आल्याने दोन दिवसांच्या सुट्टीनंतर मंगळवारी चाकरमान्यांची गर्दी रेल्वे स्थानकात उसळेल असे बोलले जात होते. मध्य रेल्वे स्थानकातील सर्वात गर्दीचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली स्थानकातही गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र मंगळवारी त्याच्या उलट चित्र डोंबिवली स्थानकात पहायला मिळाले. सकाळी 7.30 पर्यंत रेल्वे फलाट पूर्ण रिकामे होते. 7.30 नंतर स्थानकात हळूहळू प्रवासी संख्या वाढत होती. लोकलच्या वेळेत प्रवासी स्थानकात येत लोकल जाताच फलाटही रिकामे होत होते. अपेक्षेपेक्षाही तुरळक गर्दी मंगळवारी स्थानकात दिसून आली. लोकल प्रवास करण्यास परवानगी मिळाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी लशींची अट मात्र जाचक वाटत आहे. लसींचा तुटवडा व त्यात काही नागरिकांमध्ये लस विषयी गैरसमज असल्याने अनेक नागरिकांनी लस घेतलेली नाही. काहींचा एक डोस झाला आहे मात्र दुसरा डोस झाला नसल्याने तसेच मिळत नसल्याने ते नागरिकही आज लोकल प्रवास करून ऑफिसला जाऊ शकत नाही. लोकल प्रवासास परवानगी मिळाल्यानंतर आता नागरिकांनी लस घेण्यासाठी घाई करताना दिसत आहे. परंतु कमी प्रमाणात लस पुरवठा होत असल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.