Jalgaon News : तालुक्यात गेल्या पंधरा महिन्यांत २९ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आत्महत्या केल्या. यात सर्वाधिक घटनांमध्ये कर्जबाजारीपण हे महत्त्वाचे कारण आहे. पंधरा महिन्यात २९ याचा अर्थ प्रत्येक पंधरा दिवसाला एक आत्महत्या झाल्याची दिसून येते.
चिंचगव्हाण येथे सर्वाधिक पाच आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे शासन दरबारी मदतीसाठी पात्र ठरली असून, संबंधित कुटुंबांना शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे. त्यातील काहींना मदत मिळाली आहे तर पाच अपात्र झाली असून, काही प्रकरणे आजही प्रलंबित आहेत. (29 farmer suicides in 15 months jalgaon news)
तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीप हंगामातील पेरणीचा खर्च केल्यानंतर पावसाचा खूप मोठा खंड पडला. शेतकऱ्यांनी हात उसनवारीतून कर्ज काढून पेरण्या केल्या. मात्र या पेरणी करून हाती काहीही आले नाही. त्यामुळे शेतकरी हताश झाला आहे.
आपला घरातील रोजच्या जगण्याचा खर्च कसा भागवायचा, या विवंचनेने शेतकरी दिसून येत आहेत. गेल्या पंधरा महिन्यात तब्बल २९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली असून मदतीसाठी १५ पात्र ठरले तर पाच अपात्र असून यातील पाच तालुकास्तरावर प्रलंबित आहेत. चार बैठकीत ठेवण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
शेतकऱ्यांच्या पिकाला बाजारात योग्य भाव मिळत नाही किंवा दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून अपेक्षित असलेली मदत मिळत नाही. तसेच नैसर्गिक आपत्तीत शेतीचे नुकसान होते. अशावेळी शेतकऱ्यांना नैराश्य येते व त्यातूनच आत्महत्येचा मार्ग काही जण पत्करतात. नापिकी, कर्ज, मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न अशा विविध कारणांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडला गेला आहे.
कागदपत्रांअभावी ठरताहेत अपात्र
आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यावर त्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीचे होते. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारी मदतीसाठी जाचक कागदपत्रे जमा करावी लागतात. ही कागदपत्रे गोळा करताना नाकीनऊ येते. बहुतांश शेतकरी कुटुंब निरक्षर असल्याने किंवा घरात अशी मदत करण्यास कोणी नसले, तर कागदपत्रांची पूर्तताच केली जात नाही. परिणामी, काही प्रकरणे केवळ आवश्यक त्या कागदपत्रांअभावी अपात्र ठरतात. त्यामुळे या जाचक अटी वगळाव्यात, अशी मागणी होत आहे.
"गेल्या पंधरा महिन्यात २९ शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. यातील मदतीसाठी १५ प्रकरणे पात्र ठरली तर पाच अपात्र असून, यातील पाच तालुकास्तरावर प्रलंबित आहेत. चार प्रकरणे बैठकीत ठेवण्यात आली आहेत." - जितेंद्र धनराळे, नायब तहसीलदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.