पाचोरा (जि. जळगाव) : पोलिस, खाकी व पोलिस खाक्या यासंदर्भात अनेक समज गैरसमज व उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असल्याचे आपण पाहतो, ऐकतो अथवा अनुभवतो देखील. पोलिसांना सततची ड्यूटी व ताण तणावामुळे सामाजिक संवेदना व सामाजिक जाणीवा नसतात, असाही आरोपात्मक सूर व्यक्त होतो. (Assistant Police Inspector Mahendra Waghmare and Sunita Waghmare guides students about study in city jalgaon news)
असे असताना पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील पोलिस ठाण्यात नियुक्तीस असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे व त्यांच्या अर्धांगिनी सुनीता वाघमारे यांनी मात्र गावातील शालेय विद्यार्थी व विविध प्रकारच्या भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना मार्गदर्शनासह विविधांगी प्रकारची मदत करून आपला वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
जणू काही खाकीतून शिक्षण व संस्काराचा झरा वाहत असल्याची अनुभूती वाघमारे दांपत्याच्या कार्यातून येत आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून गेल्या वर्षभरापूर्वी महेंद्र वाघमारे यांची नियुक्ती झाली. पोलिस व जनता यांच्यात योग्य तो समन्वय राखून शांतता सुव्यवस्था राखत गुंडगिरी व अवैध धंदे नेस्तनाबूत करण्यात वाघमारे यशस्वी ठरले असले तरी त्यांची वेगळी सामाजिक जाणीव व संवेदना मात्र साऱ्यांनाच अचंबित करणारी आहे.
पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या आपल्या शासकीय निवासस्थानाच्या प्रांगणात रोज सायंकाळी भरणारी शाळा पाहून प्रत्येकाकडून त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. महेंद्र वाघमारे यांच्या अर्धांगिनी सुनीता वाघमारे यादेखील उच्चशिक्षित असून, त्या मोठ्या शहरातील व श्रीमंत कुटुंबात वावरणाऱ्या आहेत.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
परंतु त्याचा कोणताही बडेजाव त्यांच्याठायी नाही. पोलिस ठाण्याच्या आसपास असलेल्या वस्तीत अनेक मुले तासनतास फिरत असल्याचे व शिक्षणापासून दुरावत असल्याचे पाहून त्यांनी या मुलांना एकत्रित करण्याचा विचार केला.
सुनिता वाघमारे उच्चशिक्षित असल्याने त्यांनी आपल्या संकल्पनेला मूर्त स्वरुप दिले व सुरवातीला दोन विद्यार्थिनींना शिकवायला सुरवात केली. अल्पकाळात मुली व मुलांची संख्या प्रचंड वाढत गेली. सध्या त्यांच्याकडे ५० मुले दररोज सायंकाळी शिक्षण व संस्काराचे धडे गिरवण्यासाठी उपस्थिती देत आहेत. वाघमारे यांच्या शासकीय निवासस्थानाच्या प्रांगणात दररोज सायंकाळी या विद्यार्थ्यांची अक्षरशः शाळा भरते.
खडू फळा तसेच विविध प्रकारच्या चार्टचा वापर करून महेंद्र वाघमारे व सुनीता वाघमारे विविध विषयांची मोफत शिकवणी घेतात. त्यासोबतच संस्काराचे धडेही देतात. गावातील पोलिस व संरक्षण दलाच्या विविध भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवकांना देखील एकत्रित करून त्यांना लेखी, मैदानी, तोंडी परीक्षा या संदर्भात महत्त्वपूर्ण टिप्स देऊन त्यांचा उत्साह व ऊर्जा वाघमारे दांपत्य वाढवत आहेत. या विद्यार्थ्यांना विविध प्रकारची पुस्तके, शालेय साहित्य, अभ्यासिका उपलब्ध करून देऊन आपले दातृत्व देखील त्यांनी सिद्ध केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.