चाळीसगाव : तालुक्यातील चितेगाव, पातोंडा, मुंदखेडा, ओढरे येथील धरणग्रस्तांबाबतचा उच्च न्यायालयाचा आदेश सरकार पाळत नसल्याने १ नोव्हेंबरपासून २५० ते ३०० शेतकरी सहपरिवार तापी विकास महामंडळ जळगाव येथे सकाळपासून उपोषणास बसले होते. या उपोषणस्थळी राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील भाजपच्या सर्व खासदार, आमदारांनी भेट दिली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी थेट संवाद साधून बैठकीचा तोडगा काढण्यात आल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
उपोषणार्थी शेतकऱ्यांनी व्यथा मांडताना सांगितले, की गिरीश महाजन जलसंपदामंत्री असताना आमच्या भूसंपादनाच्या २० वर्षांपासून थकलेल्या निधींचा प्रश्न मार्गी लागला आणि त्याचा पहिला हफ्ता देखील आम्हाला मिळाला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयाने आदेश देऊन देखील महाविकास आघाडी सरकारने एक रुपया सुद्धा आम्हाला दिला नाही. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर श्री. महाजन यांनी थेट जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना फोन केला व शेतकरी बेमुदत उपोषणाला बसले असून, जोपर्यंत त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत ते उपोषणावर ठाम आहेत. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर उपोषणाला बसण्याची वेळ येणार असेल व शासन त्यांच्याकडे लक्ष देत नसेल तर आम्ही देखील इथून हलणार नसल्याचे महाजन यांनी मंत्री जयंत पाटील यांना सांगितले.
तेव्हा जलसंपदामंत्री पाटील यांनी दिवाळी सुट्या संपल्यानंतर १० ते १५ नोव्हेंबर दरम्यान गिरीश महाजन व जिल्ह्यातील खासदार, आमदार, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यासह बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन दिले व तत्काळ तापी पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता यांनीदेखील तसे लेखी पत्र दिल्याने शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले. शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी जलसंपदामंत्री यांनी धावून येत विद्यमान जलसंपदामंत्री यांच्याशी संवाद साधून मध्यस्थी केल्याने दिवाळीच्या सणाच्या वेळी सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण टळले. श्री. महाजन यांनी शेतकरी बांधवांना दिवाळीसाठी घरी जा, आम्ही बैठकीत तोडगा काढू व पुढेही आम्ही सोबत आहोत, असे आश्वस्त केले.
आमदार चव्हाणांचा पाठपुरावा
तत्पूर्वी पंचायत समिती गटनेते संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदन आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी यांना दिले होते. दिवाळी असल्याने शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा होऊ नये, यासाठी आमदार चव्हाण यांनी लघु पाटबंधारे विभाग येथील अधिकाऱ्यांना चाळीसगाव येथे बोलावून २८ ऑक्टोबरला दोन तास बैठक घेऊन तजवीज करा, नाहीतर १ तारखेला मी स्वतः उपोषण करेल, असे सांगितले. तसेच जिल्हाधिकारी, अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री, मुख्यमंत्री यांना पत्र देऊन मोबदल्याची सोय करावी, अशी विनंती केली जर उपोषणाने काही मार्ग निघाला नाही तर स्वतः सर्व शेतकऱ्यांना मुंबईला सोबत नेऊन पैसे काढूनच देईल, असे आश्वासनही आमदार चव्हाण यांनी दिले होते.
पालकमंत्र्यांचा काणाडोळा
शेतकरी उपोषणास बसले असता दोनच्या सुमारास पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शेतकऱ्यांच्या समोरून जाताना बॅनर वाचून पुढे निघून गेले. फक्त अधिकाऱ्यांनी तुम्ही म्हाताऱ्या लोकांना आणि महिलांना घरी पाठवा एवढेच सांगितले. तद्नंतर संध्याकाळी गिरीश महाजन यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर धावाधाव करत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उपोषणकर्ते शेतकरी यांना भेट दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.