Jalgaon Fraud News : अंगणवाड्यांना आहार पुरविण्याच्या प्रकरणात येथील महिलांच्या दोन बचत गटांची फसवणूक झाल्याप्रकरणी भुसावळ पोलिसांत रितसर फिर्याद देऊनही तब्बल १५ महिन्यांपासून दोषींवर गुन्हा दाखल होत नसल्याने संबंधित बचत गटांनी पोलिस महासंचालकांकडे दाद मागितली आहे. या प्रकरणात भुसावळ पोलिसांनी भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही बचत गटांनी केला.
याबाबत माहिती अशी ः शहरात माता माधवी व जय माता दी स्वयंसहाय्यता महिला बचत गट कार्यरत होते. या दोन्ही बचत गटांना माहीत नसताना त्यांच्या नावांचा व सह्यांचा गैरवापर करून या बचत गटांच्या नावाने शहरी भागातील अंगणवाड्यांना गरम आहार पुरविण्याचे काम धुळे येथील गिंदोडिया नामक बनावट पुरवठादारांनी २०१० पासून घेतले होते. (Chalisgaon women self help group cheated jalgaon fraud crime news)
याच बचत गटांचे धुळे येथील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत बनावट खातेही उघडले होते. भुसावळ येथील बालविकास प्रकल्प (नागरी) कार्यालयातील अधिकाऱ्यांसह बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून दरवर्षी लाखो रुपये परस्पर लाटले जात होते. हा प्रकार येथील महिला बचत गटाच्या लक्षात आल्यावर त्यांनी १ नोव्हेंबर २०२१ ला नवी मुंबई येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाच्या थेट आयुक्तांकडेच तक्रार केली.
हा फसवणुकीचा प्रकार असल्याने आयुक्तांनी चौकशीकामी हा तक्रार अर्ज चाळीसगाव पोलिसांना पाठविला. मात्र, संबंधित प्रकल्प कार्यालय हे भुसावळ येथे असल्याने चाळीसगाव पोलिसांनी ५ फेब्रुवारी २०२२ ला हा अर्ज भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याकडे वर्ग केला.
तेथील तत्कालीन निरीक्षक राहुल गायकवाड यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला यांना तपास करण्यास सांगितले. गोंटला यांनी संपूर्ण चौकशी केल्यावर आपला चौकशी अहवाल २१ जुलै २०२२ ला विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास विभाग, नाशिक यांच्याकडे सादर केला. त्याची प्रत संबंधित तक्रारदार बचत गटालाही दिली.
गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
चौकशी अहवालात ‘प्रथमदर्शनी गैरअर्जदारांनी संबंधित दोन्ही बचत गटांच्या कागदपत्रांचा वापर करून बचत गटास मिळणाऱ्या टेंडरचा लाभ घेऊन आर्थिक लाभ करून घेतला असल्याचे दिसून येत आहे,’ असा स्पष्ट उल्लेख केलेला असतानाही भुसावळच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दोषींवर गुन्हा दाखल केला नाही.
त्यामुळे चाळीसगावच्या बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी केल्या. अखेर १२ जुलै २०२३ ला बचत गटांच्या प्रतिनिधीला बाजारपेठ पोलिसांनी संपर्क करून गुन्हा नोंदविण्याकामी भुसावळला बोलावले. त्यानुसार २३ जुलै २०२३ ला बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदार व त्यांचे प्रतिनिधी गेले असता तेथील अधिकाऱ्यांनी सकाळी अकरा ते सायंकाळी पावणेआठपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या तीन फिर्यादी लिहिल्या.
शेवटी ‘आपल्या तक्रारीनुसार, आम्हाला वरिष्ठांच्या परवानगीशिवाय दोषींवर गुन्हा दाखल करता येणार नाही’ असे सांगितले. त्यानंतर १९ सप्टेंबर २०२३ ला ‘एपीआय’ मंगेश गोंटला यांनी पुन्हा चाळीसगावच्या तक्रारदार बचत गटाच्या प्रतिनिधीला फोन करून ‘तुमच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करायचा आहे’ असे सांगून भुसावळला बोलावले.
त्यानुसार, २५ सप्टेंबरला संबंधित बचत गटाच्या अध्यक्षा व त्यांचे प्रतिनिधी गेले असता, सकाळी अकार ते दुपारी अडीचपर्यंत दोघांना बाजारपेठ पोलिसांनी बसवून ठेवले व ‘तुमच्या तक्रार अर्जानुसार आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही’ असे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी सांगितले व ते पोलिस ठाण्यातून निघून गेले.
एकूणच, येथील महिलांच्या बचत गटाच्या नावांचा वापर करून शासनाचीही फसवणूक केल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झालेले असतानाही भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नसल्याने आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी येथील बचत गटांनी केली आहे.
"संबंधित बचत गटांची तक्रार प्राप्त झालेली आहे. आम्ही गुन्हा दाखल करीत नाही, असे नाही. त्यांनी यावे आणि गुन्हा दाखल करावा." - बबन आव्हाड, पोलिस निरीक्षक, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.