Jalgaon Rain News : शहरासह ग्रामीण भागात शनिवारी (ता. २३) मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. घरांसह शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, पिंपळकोठा खुर्द आणि बुद्रुक तसेच पिंप्री बुद्रुक आणि माळपिंप्री या चार गावांत ढगफुटी झाल्याने शेकडो घरांत पाणी शिरले.
घराचे पत्रे, जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या. आमदार चिमणराव पाटील, प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी पूरग्रस्त गावांना भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना आमदार चिमणराव पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. (Cloudburst in 4 villages including Pimpalkoth Pimpri jalgaon rain news)
तालुक्यात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाल्याने कपाशी, सोयाबीन, ज्वारी यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिंपळकोठा बुद्रुक आणि खुर्द तसेच पिंप्री खुर्द व माळपिंप्री या गावांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने गावालगत असलेल्या नाल्याला आलेल्या पुरामुळे सुमारे ५० घरांमध्ये पाणी शिरले आहे.
घराचे पत्रे, घरातील सामान व अन्नधान्य याचे नुकसान झाले. एका बैलाचा मृत्यू झाला असून, अनेक बकऱ्या व कोंबड्या वाहून गेल्या आहेत. अतिवृष्टीमुळे पिकांचेही नुकसान झाले. मध्यरात्रीच्या सुमारास घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आपद्ग्रस्त ग्रामस्थ रात्रभर पाण्यात बसून होते. गावातील युवक आणि नागरिकांनी सर्वांना सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नाना महाजन, पिंप्रीचे माजी सरपंच एस. आर. पाटील यांच्यासह पदाधिकारी सकाळपासूनच गावात थांबून होते. तहसीलदार चव्हाण यांनी तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांसह गावात जाऊन चर्चा केली. आमदार चिमणराव पाटील यांनी दोन्ही गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त ग्रामस्थांची भेट घेऊन सर्वांना शासनातर्फे मदत देण्यात येईल, असे सांगितले.
आमदार चिमणराव पाटील यांनी मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीची माहिती दिली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी महसूल प्रशासन व कृषी विभागाला दिले.
प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुका संघटक संभाजी पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष एस. आर. पाटील, युवासेनेचे बबलू पाटील, मयूर महाजन यांच्यासह पदाधिकारी, सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.
पिकांची मोठी हानी
तालुक्यात शनिवारी (ता. २३) एरंडोल मंडळात ७७, रिंगणगाव २०, कासोदा ४७ आणि उत्राण येथे ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे तालुक्यात कपाशी, कांदा, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.