एरंडोल (जि. जळगाव) : औषधे घेऊन जाणाऱ्या भरधाव कंटेनरने समोरून येणाऱ्या टँकरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांवरील चालक ठार झाले. अपघातानंतर कंटेनरने पेट घेतल्यामुळे कंटेनर व त्यामधील औषधी जळून खाक झाली. (Container tanker accident kills drivers of both vehicles jalgaon accident news)
एरंडोल पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. हा अपघात मंगळवारी (ता. २८) पहाटे पाचच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या पिंपळकोठा गावाजवळील हॉटेल नॅशनल पंजाबसमोर झाला. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पिंपळकोठा गावाजवळ असलेल्या पेट्रोलपंपासमोर मंगळवारी (ता. २८) पहाटे पाचच्या सुमारास धुळ्याकडून जळगावकडे जात असलेल्या टँकरला (क्रमांक : एमएच ३४, बीजी ९८३७) जळगावकडून धुळ्याकडे जात असलेल्या कंटेनरने (क्रमांक : एनएल ०१ क्यू ७१५१) समोरून जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर कंटेनरने पेट घेतला.
तसेच अपघातात दोन्ही वाहनाचे चालक बिंदू मेहताब देहारिया व संतोषकुमार राजाराम यादव हे गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना दोन्ही चालकांचा मृत्यू झाला. पिंपळकोठा येथील लहू अभिमन्यू चव्हाण आणि राजेंद्र सुभाष बडगुजर हे सकाळी फिरण्यासाठी गेले असता त्यांना अपघात झाल्याचे व त्यातील एका वाहनाने पेट घेतल्याचे दिसून आले.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
त्यांनी वाहनांवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. तसेच एरंडोल पोलिस ठाण्यास अपघाताची माहिती कळवली. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार काशिनाथ पाटील, आकील मुजावर व त्यांचे सहकारी अपघातस्थळी दाखल झाले व त्यांनी स्थानिक ग्रामस्थ व हॉटेलमधील कामगार यांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनांमधून गंभीर जखमी झालेल्या चालकांना बाहेर काढले आणि एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले.
ग्रामीण रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रवाना केले. उपचार सुरू असताना दोन्ही चालकांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरने पेट घेतल्यामुळे चालक केबिन पूर्णपणे जळून खाक झाली. तसेच कंटेनरमध्ये असलेल्या औषधी व खोक्यांनी पेट घेतला.एरंडोल नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे किरण पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
अपघातानंतर महामार्गावर वाहतूक ठप्प
अपघातग्रस्त कंटेनरमध्ये शासकीय रुग्णालयाची औषधी असल्याचे समजते. अपघात परिसरात सर्वत्र औषधी विखरून पडल्या होत्या. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती. सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत केली.
अपघातग्रस्त कंटेनरच्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चार जेसीबी मशिनची मदत घेण्यात आली होती. याबाबत लहू चव्हाण यांनी दिलेल्या माहितीवरून कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार काशिनाथ पाटील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.