जळगाव : पावसाळ्याचे कारण पुढे करत रस्त्यांच्या कामाबाबत चालढकल करणाऱ्या महापालिकेने पावसाळा संपून तीन आठवडे होऊनही एकाही रस्त्याच्या कामाला साधी सुरवातदेखील केली नाही. दिवाळीपूर्वी रस्त्यांची कामे सुरू करू, अशा महापौर, उपमहापौरांच्या वल्गना फोल ठरून जळगावकरांनी यंदाची दिवाळीही खड्ड्यातच जाणार आहे.
गेल्या सात-आठ वर्षांपासून जळगावकरांना रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. या सात वर्षांत महापालिकेने तीन सत्ताकाळ, पाच महापौर, उपमहापौर, चार आयुक्त अनुभवले. पण, शहरातील रस्त्यांची समस्या आहे तशीच कायम आहे. उलटपक्षी, ती अधिकच बिकट बनली आहे. प्रत्येक महापौर, आयुक्तांच्या कार्यकाळात रस्त्यांच्या कामांबाबत केवळ आश्वासने तेवढी मिळाली, काम एकाही रस्त्याचे झाले नाही ही वस्तुस्थिती आहे.(Diwali Update Road Construction work not started after rain stop muncipal coorporation not get Jalgaon News)
यंदाची दिवाळी खड्ड्यातच
२०२० व २०२१ अशी दोन वर्षे कोरोनाच्या भीषण महामारीत गेली. या दोन वर्षांपैकी जवळपास सहा महिन्यांहून अधिक काळ लॉकडाउन होते, तर उर्वरित दीड वर्षापैकी जवळपास सहा महिने अंशत: लॉकडाउन होते. त्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट असूनही वापर कमी असल्याने नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला नाही. आता मात्र स्थिती हाताबाहेर गेल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
शिव्यांची लाखोली वाहून वापर
शहरातील सर्व प्रमुख रस्ते, उपरस्ते तसेच गल्लीबोळातील रस्ते या ना त्या कारणास्तव खोदून ठेवण्यात आले. धड चालणेही कठीण व्हावे असे निम्मेअधिक रस्ते आहेत. वाहने चालविणे अशक्य असे बहुतांश रस्ते आहेत. चारचाकी शहरातील एकाही रस्त्यावर व्यवस्थित चालू शकत नाही. अर्थात, त्याला खड्ड्यांसोबतच रस्त्यांवरील बेशिस्त वाहतूक, अतिक्रमणेही कारणीभूत आहेत. मात्र, घरातून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर येताच सामान्य नागरिक नगरसेवक, महापालिका, लोकप्रतिनिधींना शिव्यांची लाखोली वाहूनच त्याचा प्रवास सुरू होतो.
सात वर्षांत प्रगती नाहीच
सहा-सात वर्षांपासून शहरात अमृत योजनेचे काम सुरू आहे. पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेसाठी अख्खे शहर नियोजनशून्य पद्धतीने खोदून ठेवले. परंतु खोदलेल्या रस्त्यांवर थुंकी लावल्यासारख्या डागडुजीशिवाय चांगली दुरुस्ती झालेली नाही. गेल्या दोन वर्षांत तर हे रस्ते आणखीच खराब झाले. जळगाव शहराने तत्कालीन सुरेशदादा जैन गटाची, नंतर भाजपची पूर्ण बहुमताची व आता भाजपच्या बंडखोरांच्या पाठिंब्याने शिवसेनेची अशी तीन सत्तांतरे तीनच वर्षांत अनुभवली. पण एकाही सत्तापक्षाने जळगावकरांना न्याय दिलेला नाही.
टोलवाटोलवी सुरूच
रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेले २५ व नंतरचे १०० कोटी, तत्कालीन व आताच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीतून दिलेला १०८ कोटी असा सुमारे दोनशे कोटींहून अधिक निधीचा विनियोग केवळ ‘राजकारण’ करणाऱ्या महापालिका पदाधिकारी, नगरसेवकांना करता आलेला नाही. मनपा ‘अमृत’ योजनेवर लक्ष ठेवणाऱ्या मजीप्रा, योजनेचा मक्तेदार, सार्वजनिक बांधकाम विभाग व मक्तेदाराच्या नावाने बोंब मारते, तर हे मक्तेदार महापालिका प्रशासनाच्या आडमुठे धोरणावर बोट ठेवतात. केवळ टोलवाटोलवी करण्यापलीकडे या यंत्रणा काहीच करीत नाहीत.
पाऊस संपला, रस्ते नाहीच
महापौर जयश्री महाजन यांनी पावसाळा सुरू असताना दर महिन्याला पाऊस संपताच रस्त्यांची कामे सुरू करू, अशा वल्गना केल्या. आयुक्तांनी केवळ पदाधिकाऱ्यांच्या ‘हो’शी ‘हो’ केले; परंतु संपूर्ण शहरात किमान प्रमुख रस्त्यांची कामे सुरू होतील, यासाठी कुणीही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे आता पावसाळ्याचे नियमित वेळापत्रक संपूनही रस्त्यांच्या कामांना सुरवात झालेली नाही.
रस्ते खोदणे सुरूच
मार्च, एप्रिल महिन्यात शहरातील सहा रस्त्यांची कामे एकाच मक्तेदाराकडे सोपविली. त्याने कशीबशी ती आटोपली; परंतु या कामांचा दर्जा निकृष्ट आहे. शिवाय या सहापैकी काही रस्ते अपूर्णच सोडले. एकीकडे रस्त्यांची कामे सुरू नसताना प्रमुख रस्त्यांवर काही ना काही कारणाने खोदकाम सुरूच आहे.
कोर्टासमोरील रस्त्यावर
नेमके काय सुरू आहे?
गेल्या महिनाभरापासून कोर्टासमोरील रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. तिथे नेमके काय सुरू आहे व किती दिवस चालणार आहे, हे कुणीही सांगत नाही. या रस्त्यावरील वाहतूक अन्य उपरस्त्यांवरून वळविण्यात आल्याने नागरिकांची प्रचंड तारांबळ उडत आहे. एकूणच नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.